आकाशात उडत्या तबकड्या दिसल्याचा दावा : आयर्लंडमध्ये तपास सुरू

द आयरीश एव्हिएशन अॅथॉरिटी ( IAA ) आयर्लंडच्या नैऋत्य किनारपट्टी परिसरात उडत्या तबकड्या दिसल्याच्या दाव्यांचा तपास करत आहे. काही पायलटनी आकाशात चमकणाऱ्या वस्तू दिसल्याचं कळवल्यानंतर हा तपास सुरू करण्यात आला आहे.

आयर्लंडच्या स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी (9 नोव्हेंबर) सकाळी 6.47 वाजता ब्रिटिश एअरवेजच्या महिला पायलटने आकाशात लख्ख चमकणाऱ्या वस्तूं दिसल्याची माहिती दिली. त्यांनी आयर्लंडमधल्या शॅनोन एअर ट्रॅफिक कंट्रोलला आकाशात लष्करी कवायती सुरू आहेत का याची विचारपूस केली. त्या वस्तू अतिजलद गतीने जात होत्या, असं त्यांनी कळवलं. पण अशी कोणतीही लष्करी कवायत होत नसल्याचं अॅथॉरिटीने पायलटला कळवलं.

संबंधित विमान हे कॅनडाच्या मॉन्ट्ररियल शहराकडून इंग्लंडच्या हिथ्रोकडे जात होते. लख्ख चमकणाऱ्या वस्तू विमानाच्या डावीकडून येऊन उत्तरेकडे नाहीशा होत आहेत, अशी महिती पायलटने दिली. त्या वस्तू विमानाची धडकतील असं वाटत होतं. पण, तसं झालं नाही.

दुसरीकडे व्हर्जिन विमानाच्या पायलटलाही असाच अनुभव आला. आधी उल्का पृथ्वीच्या वातावरणात येत आहे त्यांना वाटलं.

चमकणाऱ्या अनेक वस्तू एक सारख्या वेगाने जात असल्याचं, व्हर्जिन विमानाच्या पायलटने सांगितलं. त्या वस्तूंचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा दुप्पट होता, असं या पायलटने सांगितलं आहे.

"आकाशात संशयास्पद वस्तू आढळल्याचं काही विमानांनी निदर्शास आणून दिलं आहे, त्यानंतर याबाबत IAA अधिक तपास करत आहे," असं IAAच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यत आलं आहे.

या घटनेचा गोपनीय पातळीवर तपास केला जाईल, असं IAAने म्हटलं आहे. सध्या या घटनेचा तपास चालू असल्याने याबाबत अधिक माहिती देता येणार नाही असं शॅनोन विमानतळाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)