स्मरणशक्ती वाढवण्याचे 5 उपाय

    • Author, डेविड रॉबसन
    • Role, बीबीसी फ्यूचर

आपण स्वतःला कितीही हुशार मानलं तरीही बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या बुद्धीचा योग्य तऱ्हेने वापर करू शकत नाही.

अनेक सर्व्हेंमधून असं लक्षात आलं की अनेक विद्यार्थ्यांना गोष्टी कशा लक्षात ठेवाव्या याची योग्य पद्धत माहीत नाही. योग्य प्रकारे स्मरणशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मग चुकीचे उपाय केले जातात.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सल्ले देणारे कमी नसतात. जितक्या जास्त व्यक्ती तितक्या वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले.

आई-वडील एक सांगतात, शिक्षक एक आणि मित्र काहीतरी भलतंच.

हेही कमी की काय म्हणून शास्त्रज्ञ त्यांच्या अभ्यासावर आधारित आणखी काही सल्ले देतात.

याचा परिणाम अस होते की आपल्या मनातला गोंधळ वाढतो नेमकी स्मरणशक्ती वाढवायची तर कशी?

आता चिंता नको.

एका मानसशास्त्राशी संबंधित मासिकाने अभ्यास करायच्या आणि स्मरणशक्ती वाढवायच्या पाच बरोबर आणि पाच चुकीच्या पद्धतींची पडताळणी केली. त्या लेखाचं सार इथे देत आहोत.

1) चुकीची पद्धत : घोकंपट्टी

नवे शब्द किंवा भाषा शिकताना सहसा ते लक्षात ठेवण्यासाठी पाठ करण्यावर भर दिला जातो. पण मानसशास्त्रज्ञांच्या मते घोकंपट्टी करणं चुकीचं आहे.

कारण तसं केलं तरी आपल्या मेंदूच्या लक्षात या गोष्टी राहतीलच असं नाही.

योग्य पद्धत : अभ्यासाच्या वेळांमध्ये अंतर ठेवा

एखादा विषय किंवा मुद्दा लक्षात ठेवायचा असला तर त्याचा अभ्यास थोड्या थोड्या वेळाने करावा. त्यामुळे स्मरणशक्ती उत्तम राहील.

एखाद्या पुस्तकातला एक धडा वाचावा मग दुसरं काहीतरी वाचायचं.

काही काळाने आधी जो धडा वाचला आहे तो परत वाचावा. तो धडा परत एका तासाने वाचू शकता, एका दिवसाने किंवा एका आठवड्यानेही.

अभ्यास झाल्यानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की, वाचलेल्यापैकी किती कळलं. त्याने मेंदूला या विषयाची चांगली ओळख होईल.

2) चुकीची पद्धत : महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करणं

घोकंपट्टीसारखीच ही पद्धतही फार सामान्य आहे. यात काही वाईट नाही. वाचताना जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात ते अधोरेखित करण्यास काही हरकत नाही.

पण मानसशास्त्रज्ञांच्या मते ही पद्धत दरवेळेस यशस्वी होईलच असं नाही. अनेक विद्यार्थी तर पूर्णच्या पूर्ण परिच्छेद अधोरेखित करतात. असं केलं तर महत्त्वाचे मुद्दे आणि बिनमहत्त्वाचे मुद्दे यांच्यात फरक करणं कठीण होऊन बसतं.

योग्य पद्धत : शांतपणे विचार करा

मानसशास्त्रज्ञ सल्ला देतात की आधी कोणत्याही विषयाचं पुस्तक पूर्ण वाचा. मग त्यातले मुद्दे अधोरेखित करा.

संपूर्ण वाचल्यानंतर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केल्याने त्या विषयाचा शांतपणे विचार करायला वेळ मिळतो. प्रत्येक वाक्य अधोरेखित करत बसायची गरज नाही.

3) चुकीची पद्धत : भारंभार नोट्स काढणं

कोणत्याही लायब्ररीत, वर्गात गेलात तर विद्यार्थी नोट्स काढताना दिसतील. अतिउत्साहात शुल्लक गोष्टींच्याही नोट्स काढल्या जातात. नंतर त्यांचा काहीच उपयोग नसतो.

योग्य पद्धत : छोट्या आणि मोजक्या शब्दांतल्या नोट्स बनवा

सगळ्या प्रकारच्या अनुभवाअंती असं लक्षात आलं आहे की विद्यार्थी जितक्या कमी नोटस काढतील तितकंच त्यांच्या लक्षात राहील. कारण जेव्हा मोजक्या शब्दांत नोट्स काढल्या जातात, तेव्हा त्या विषयाबद्दल जास्त विचार करावा लागतो.

जास्तीत जास्त आशय कमी शब्दांत कसा मांडायचा यासाठी प्रयत्न करावे लागतात. असं करत असताना मेंदू त्या विषयाची आपोआप उजळणी करतो. त्यातले महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवतो. सहसा जर लिहून नोट्स काढल्यात तर त्याचा जास्त फायदा होतो.

लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जर टाईप केलंत तर त्याचा फारसा फायदा होत नाही.

4) चुकीची पद्धत : सिलॅबसमधल्या फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणं

बरेचसे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की ज्या विषयाची तयारी करत आहेत त्या विषयातले IMP मुद्दे काढा. त्या मुद्द्यांचाच अभ्यास करा.

बऱ्याचदा शिक्षकच असे IMP देतात आणि सांगतात की यांचा अभ्यास करा.

योग्य पद्धत: विषयाचा सखोल अभ्यास करा

अभ्यासाची एक निश्चित रूपरेखा तयार करून अभ्यास केला तर विषय नीट समजायला मदत होते. महत्त्वाच्या विषयांचा तक्ता बनवू शकता म्हणजे तुम्ही ते विसरणार नाही.

महत्त्वाच्या लेक्चर्सचे बुलेट पॉईंटही बनवू शकता. जितक्या कमी शब्दात लिहाल तितकं चांगलं.

5) चुकीची पद्धत : सतत स्वतःची परीक्षा घेणं

काही विद्यार्थी अभ्यास झाला की नाही ते तपासण्यासाठी स्वतःचीच परीक्षा घेतात. पण नुस्ती घोकंपट्टी करून परीक्षा घेतली तर त्याला अर्थ नाही.

योग्य पद्धत : सखोल अभ्यास तपासा

फक्त प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा आपला एखाद्या विषयाचा किती सखोल अभ्यास झाला आहे ते तपासून पाहा. त्यामुळे स्मरणशक्ती वाढेल.

अतिआत्मविश्वास नको

अनेकांना त्यांच्या स्मरणशक्तीच्या मर्यादा लक्षात येत नाहीत. ते स्वतःला खूप स्मार्ट समजतात. पण खरंतर ते तेवढे हुशार नसतात. अशा परिस्थितीत अतिआत्मविश्वास नडू शकतो.

कारण त्यामुळे जितक्या गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे तितक्या गंभीरपणे तो होत नाही. अतिआत्मविश्वासी लोकांना वाटतं की त्यांना सगळं लक्षात आहे, पण ऐनवेळेस ते महत्त्वाचे मुद्दे विसरतात.

म्हणूनच एकदा अभ्यास केल्यानंतर काही काळाने आपण कुठे आहोत हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)