राफेल : 'ओलांद यांच्या जोडीदाराच्या सिनेमासाठी रिलायन्सचा पैसा का?'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शशांक चौहान
- Role, बीबीसी प्लॅनिंग एडिटर, भारतीय भाषा
भारत खरेदी करत असलेल्या राफेल विमानांसंदर्भात फ्रान्सच्या माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे भारतात राजकीय भूकंप आला आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी फ्रान्समधील Mediapart या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये राफेलच्या व्यवहारात अनिल अंबानी यांच्या कंपनीच नाव खुद्द भारत सरकारने सुचवले असल्याचा दावा केला आहे. या वेबसाईटने अनिल अंबानी यांनी ओलांद यांच्या जोडीदाराच्या सिनेमात केलेल्या गुंतवणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ओलांद यांच्या या दाव्यामुळे भारतात विरोधी पक्ष सरकारवर करत असलेल्या आरोपांना बळ मिळाले आणि त्यांनी सरकारवर जोरदार हल्ले करायला सुरुवात केली आहे.
ओलांद यांनी दावा केला आहे की राफेल विमान निर्मितीच्या 58 हजार कोटींच्या व्यवहारात भारत सरकारने अनिल अंबानी यांच्या ग्रुपच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीचे नाव सुचवले होते आणि फ्रान्सकडे या संबंधी दुसरा पर्याय नव्हता.
ओलांद यांचा हा दावा भारत सरकारने यापूर्वी दिलेल्या माहितीच्या विरोधात जाणारा आहे. भारत सरकारचं मत असं आहे की फ्रान्सची कंपनी दसो एव्हिएशनने स्वतःच अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड केली आहे.
ओलांद यांची ही मुलाखत Mediapartच्या दोन पत्रकारांनी घेतली. त्यातील एक पत्रकार एंटॉन रॉगेट यांच्याशी बीबीसीने संवाद साधला.

फोटो स्रोत, Getty Images
एंटॉन यांनी या संदर्भात दिलेली माहिती अशी.
राफेल विमानांच्या खरेदीच्या संदर्भात काही मुद्दे अस्पष्ट आहेत. यावर फ्रान्सचे राजकारण आणि माध्यम विश्वात कोणातेच मुद्दे येत नव्हते.
परंतु दसो एव्हिशनने या क्षेत्रात काहीच अनुभव नसलेल्या रिलायन्स कंपनीची निवड का केली याचं अनेकांना आश्चर्य वाटले.
आम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. ही बातमी करत असताना आम्ही बरीच काळजी घेतली आहे.
रिलायन्ससमोर अनेक प्रश्न
ओलांद यांची जोडीदार ज्युली गायेट अभिनेत्री आहेत. त्यांच्या एका चित्रपटासाठी अंबानी यांच्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. ज्युली गायेट, ओलांद आणि माय फॅमिली या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील रिलायन्सची भागीदारी आणि राफेल करार यांचा काही संबंध नाही, असा खुलासा केला आहे.
पण या संदर्भांत 2 प्रश्न निर्माण होतात, ज्याचं उत्तर रिलायन्सने द्यायला हवीत.
राफेलच्या विक्रीसाठी भारतात आलेले तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओलांद यांच्या दौऱ्याच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी 2016ला अनिल अंबानी यांनी चित्रपटात गुंतवणुकीची घोषणा का केली?

फोटो स्रोत, AFP
दुसरा मुद्दा म्हणजे ज्या चित्रपटात भारताचा काही संबंध नाही, जो चित्रपट भारतात कधी दाखवला जाणार नाही त्यात रिलायन्स एंटरटेनमेंटला रस का होता?
काही तांत्रिक आणि सुरक्षेशी संबधित प्रश्न दसोने रिलायन्सची भागीदार म्हणून निवड का केली याच्याशी संबंधित आहेत.
हे लक्षात घेतलं पाहिजे की राफेलची विक्री फ्रान्समध्ये मोठा राजकीय मुद्दा होता. फ्रान्समधील सर्वच राजकीय पक्ष या विमानांच्या निर्यातीसाठी प्रयत्न करत होते.
निर्यात अधिकाऱ्यांच्या समावेश
बऱ्याच कालावधीत राफेलला निर्यातीसाठी अयोग्य मानलं जात होतं. पण 2012-2017मध्ये ओलांद राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर यांची विक्री सुरू झाली.
फ्रान्सच्या कायद्यानुसार तात्त्विक पातळीवर दसोला भारतीय भागीदार निवडण्याची मोकळीक होती. पण फ्रान्समध्ये हे सर्वांनाच माहिती आहे की या निर्णयात फ्रान्समधील अधिकारीही सहभागी होते. याशिवाय आता ओलांद यांनी म्हटलं आहे की त्यांच्या समोर दुसरा पर्याय नव्हता. याचाच अर्थ असा की 126 विमानांच्या खरेदीची ऑर्डर रद्द झाल्यानंतर या निर्यातीला अंतिम स्वरूप देण्यासाठी फ्रान्स प्रयत्नशील होता. या संदर्भात आमचा शोध अजूनही सुरू आहे.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








