You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियाच्या अंतराळयानाला छिद्र; घातपाताचा संशय
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील रशियाच्या सोयुज अंतराळयानाला पडलेले छिद्र हे ड्रिलिंग मशीनने पाडले असावे असा दावा रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेनं केला आहे. हे छिद्र जाणीवपूर्वक पाडलं असावं असाही या संस्थेचा कयास आहे.
रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी या संदर्भातील माहिती दिली.
बुधवारी सोयुझ अंतराळयानाला छिद्र पडल्याचं अंतराळवीरांच्या लक्षात आलं. या अंतराळयानातील हवेचा दाब कमी झाला होता. हा प्रकार नेमका काय असावा, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अंतराळवीरांनी घेतला असता, त्यांना यात एक छिद्र असल्याचं लक्षात आलं.
" त्याठिकाणी ड्रिलिंगचे अनेक प्रयत्न झाले होते, असं दिसतं," असं दिमीत्री रोगोझिन यांनी सांगितलं. हे छिद्र पाडताना संबंधिताचे हात थरथरत असावेत, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.
उल्का किंवा अंतराळातल्या कचऱ्याच्या धडकेमुळे छिद्र पडल्याची शक्यता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या ISSमध्ये एकूण 6 अंतराळवीर आहेत आहेत. त्यापैकी 3 अमेरिकन, 2 रशियन आणि 1 जर्मन आहे.
हे कुणी केलं याचा शोध घेतला जाईल, असं रोगोझिन म्हणाले. सोयूझ अवकाशयान तयार करणाऱ्या रशियन कंपनीच्या 'प्रतिष्ठेची बाब' आहे असं ते म्हणाले.
सोयुजचा उपयोग अंतराळवीरांना पृथ्वीवर माघारी आणण्यासाठी केला जाणार नाही.
छिद्र पडल्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या पसरत आहेत.
कझाकिस्तानमधल्या बायकोनूर कोस्मोड्रोम येथे सोयुजच्या चाचणीवेळी ही घटना घडली असावी, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी रशियाच्या Tass state news agencyला दिली. प्राथमिक तपासणीनंतर त्यावर डागडुजी केली असावी.
कुणीतरी छेडछाड केली असावी आणि घाबरून ते छिद्र बंद केलं असावं, सोयुज पोहोचल्यावर हे छिद्र उघडं झालं असावं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)