असा वापरतात ऑनलाइन कंपन्या आपला डेटा

फोटो स्रोत, iStock
- Author, टॉम काल्वर आणि जो मिलर
- Role, बीबीसी रिसर्च टीम
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर 'डेटा ब्रीच' किंवा 'डेटा चोरणं' हा शब्द आपल्या कानावर वारंवार पडू लागला. आपल्या सुरक्षेच्या कारणासाठी आपला डेटा सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी या टेक कंपन्या आपल्या डेटाचं नेमकं काय करतात हे जाणून घेणं गरजेचं ठरतं.
"आमच्या जवळ लपवण्यासारखं आहे तरी काय?" असं काही लोक म्हणतात. किंवा "आमचा डेटा चोरून या कंपन्यांना काय फायदा होणार आहे?" असाही एक सूर असतो.
थांबा! पुन्हा एकदा विचार करा. तुमचा डेटा या कंपन्या थर्ड पार्टी कंपन्यांना विकतात ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?
आश्चर्य वाटलं ना ऐकून? हे कसं होत असेल असा विचार आला ना मनात?
जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन वेबसाइटवर जाता तेव्हा प्रामुख्यानं तीन कारणांसाठी परवानगी मागितली जाते. आपण ती जाणते-अजाणतेपणे देऊन टाकता. पण ही गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित राहत नाही.
वेबसाइटचा वापर करण्यापूर्वी एकदा प्रायव्हसीबाबतच्या आमच्या अटी वाचून घ्या. त्या मान्य असतील तरच पुढे साइन अप करा असं या कंपन्या म्हणतात. त्या अटी अतिशय क्लिष्ट भाषेत असतात. त्या समजून घेणं खूप कठीण काम असतं.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीच्या रिसर्च टीमनं 15 लोकप्रिय अॅप्स आणि वेबसाइट्सनं दिलेल्या अटींचा अभ्यास केला. त्यांची भाषा वाचली तर असं लक्षात आलं की अटींचा पूर्ण अर्थ समजण्यासाठी चांगलं शिक्षण आणि पदवीच्या स्तराचं इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
या अटी तयार करताना मुद्दामहून अवघड, पल्लेदार आणि सर्वांना गोंधळात पाडणाऱ्या शब्दांचा वापर केला जातो. पण जर या अटी काळजीपूर्वक ऐकल्या तर काही धक्कादायक गोष्टी समोर येतात.
1. लोकेशन ट्रॅकिंग
तुम्ही तुमच्या फोनचं लोकेशन ऑन ठेवा अथवा नका ठेऊ. तुम्ही परवानगी द्या अथवा नका देऊ तुमचा मोबाइल त्या कंपन्यांकडून ट्रॅक केला जातो. फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्या इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेसच्या मदतीनं लोकेशन ट्रॅकिंग करतात.
2. सहकारी कंपन्यांसोबत डेटा शेअर करणं

फोटो स्रोत, Getty Images
असे अनेक अॅप असतात ज्यांना तुम्ही माहिती दिलेली असते. हे अॅप तुमची माहिती त्यांच्या सहकारी कंपन्यांना तुमच्या परवानगी शिवाय देतात. त्या कंपन्यांचं असं म्हणणं असतं की योग्य सेवा पुरवण्यासाठी आम्ही डेटा शेअर करतो.
'योग्य व्यक्तीपर्यंत योग्य जाहिरात जावी,' म्हणून आम्ही हे करतो असं स्पष्टीकरण या कंपन्या देतात. टिंडर ही कंपनी त्यांच्या युजर्सची माहिती ओके-क्युपिड, प्लेंटी ऑफ फिश किंवा मॅच डॉट कॉम सारख्या इतर अॅप्ससोबत शेअर करते.
3. थर्ड पार्टीला परस्पर डेटा देणं
अमेझॉनचं असं म्हणणं आहे की ते डेटा थर्ड पार्टी अॅप्सला शेअर करतात. अॅमेझॉननं हे स्पष्ट लिहिलं आहे की आमच्या अटी काळजीपूर्वक समजून घेऊनच साइन अप करा. अॅपल ही कंपनी असंच करते. युरोपिअन युनियननं नुकतीच डेटा प्रोटेक्शन संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यातही कंपन्यांनी थर्ड पार्टी पार्टनर्सची लिस्ट जाहीर करावी, असं बंधन टाकलेलं नाही. कंपन्यांनी आपला डेटा थर्ड पार्टींना देणं हानीकारक आहे असं कायदेतज्ज्ञांना वाटतं. विकिपिडिया मात्र आपल्या युजर्सची माहिती थर्ड पार्टीला देत नसल्याचं समजतं.
4. टिंडरचं डेटा शेअरिंग
टिंडर ही कंपनी आपल्या युजर्सची माहिती गोळा करते. युजरचे नाव, वय आणि त्याच्या लोकेशनची माहिती त्यांच्याकडे असते आणि ती ते इतर डेटिंग साइटना देतात.
फक्त इतकंच नाही, तुम्ही फोनचा अॅंगल कसा ठेवला किंवा फोन वापरताना फोनची किती हालचाल केली ही माहिती देखील ते स्टोअर करतात. या माहितीचा ते काय उपयोग करतात याचं उत्तर कंपनीकडे नाही.
5. फेसबुक सर्च
फेसबुकवर तुम्ही काय सर्च केलं हे डीलिट करण्याचा ऑप्शन आपल्याकडे असतो. पण सर्च डीलिट केल्यानंतरही कंपनीकडे ते रेकॉर्ड सहा महिन्यांसाठी राहतं.

फोटो स्रोत, Getty Images
6. ऑफलाइन ट्रॅकिंग
तुमच्या फोनमध्ये फेसबुक अॅप असेल आणि तुम्ही फेसबुकवर लॉग इन जरी केलेलं नसलं तरी तुमच्या ऑनलाइन हालचालींवर फेसबुकची करडी नजर असते. फेसबुकच्या डेटा पॉलिसीनुसार, युजर्सच्या हालचालींवर बिजनेस टुलनं नजर ठेवली जाते. कंपनीनुसार तुम्ही कोणती वेबसाइट बघितली, तुमच्याकडे कोणता फोन आहे. तुम्ही काय काय गोष्टी विकत घेतल्या याची माहिती कंपनीकडे असते.
7. खाजगी मेसेजे
जर अजूनही तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रायव्हेट मेसेज फक्त तुम्हीच पाहू शकता तर तो तुमचा गैरसमज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
असं म्हटलं जातं की ऑटोमॅटिक स्कॅनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीनं लिंकडिन तुमचे मेसेज चेक करतं. आपल्या मेसेजचा डेटा ट्विटरकडे असतो. युजरसोबत कोणी संपर्क साधला याची माहिती आमच्याकडे असते. पण त्या मेसेजमध्ये कुणी काय लिहिलं आहे हे तपासलं जात नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
8. सातत्याने बदल
अॅपलचं म्हणणं आहे की 18 वर्षाखालील युजर्सनं कंपनीच्या पॉलिसी आपल्या पालकांच्या मदतीनं अथवा कुणा मोठ्या व्यक्तीच्या मदतीनं समजून घ्यायला हव्यात. अॅपलच्या अटी पूर्ण वाचायला किमान 40 मिनिटं लागतात. अल्पवयीन मुलं 40 मिनिटं संयमाने त्या अटी वाचू शकतील का? अॅमेझॉनचं म्हणणं आहे की, युजर्सनी पॉलिसी अधून-मधून चेक करायला हव्या कारण त्यांच्यामध्ये सातत्याने बदल होतात.
दरम्यान, गुगल आणि फेसबुक असा दावा करतात की त्यांची धोरणं, नियम आणि अटी ते अत्यंत सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतात.
डेटा प्रोटेक्शनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे की, ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यातही लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजून म्हणावी तितकी ठोस पावलं उचलली गेली नाहीत. या कंपन्यांचे प्रयत्न पुरेसे पडत नसल्याचं स्वयंसेवी संस्थांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









