केंब्रिज अॅनलिटिका - फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांची कबुली : 'आमच्याकडून चूक झाली'

फोटो स्रोत, Mark Zuckerburg/Facebook
केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लीक प्रकरणावर फेसबुकने पहिल्यांदाच अधिकृत भाष्य केलं आहे. फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या हातून चूक घडली, अशी कबुली दिली आहे. फेसबुकच्या अंदाजे पाच कोटी युजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर करून केंब्रिज अॅनालेटिकाने 2016च्या निवडणुकीवर प्रभाव टाकला, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर झुकरबर्ग यांनी पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं आहे. "या प्रकरणात विश्वासघात झाला आहे," असं त्यांनी एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
फेसबुकवर अशा अनेक अॅप्स आहेत ज्याद्वारे युजर्सची माहिती त्या अॅप बनवणाऱ्यांना मिळते. अशा अॅप्सला चाप बसवण्यासाठी कठोर पावलं उचलू, असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.
"तुमच्या डेटाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. जर आम्ही त्याचं संरक्षण करू शकलो नाही तर तुम्हाला सेवा देण्यास आम्ही पात्र नाही, असं समजू. मी फेसबुकची स्थापना केली, म्हणून या प्लॅटफॉर्मवर जे काही होईल, त्यासाठी मी जबाबदार आहे," असं ते म्हणाले.
आता फेसबुक काय करणार?
- 2014च्या आधी अस्तित्वात असलेल्या अॅप्सच्या हाती खासगी माहिती मोठ्या प्रमाणात असायची. त्या सर्व अॅप्सची चौकशी करण्यात येईल. 2014नंतर या अॅप्सबाबत मार्गदर्शक तत्त्वं बदलण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे पोहोचणाऱ्या डेटाचं प्रमाण खूप घटलं होतं.
- एखाद्या अॅपवर संशय आला तर त्या अॅपवर पाळत ठेऊन त्यांची तपासणी करू.
- जर एखादी कंपनी आमच्या चौकशीला सहकार्य करत नसेल तर त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल.
- ज्या डेव्हलपर्सनी लोकांच्या खासगी माहितीचा गैरवापर केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि संबंधित लोकांना त्याबद्दल कळवलं जाईल.
फेसबुक भविष्यात...
- डेव्हलपर्सला अल्प प्रमाणात डेटा अॅक्सेस मिळावा या दृष्टीनं पावलं उचलणार.
- जर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ एखाद्या युजरने संबंधित अॅप वापरलं नसेल तर संबंधित अॅप डेव्हलपरला त्या युजरच्या डेटाचा अॅक्सेस असणार नाही.
- एखादं अॅप कमी प्रमाणात माहिती देऊन कसं वापरता येईल याचा विचार करणार. नवं अॅप वापरायचं असेल तर नाव, प्रोफाइल फोटो आणि इमेल अॅड्रेसचाच अॅक्सेस लागेल. या व्यतिरिक्त इतर माहिती देण्याची आवश्यकता असणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येईल.
- युजर्सच्या पोस्टचा अॅक्सेस हवा असेल तर डेव्हलपर्सला फेसबुकसोबत करार करावा लागणार आहे.
भविष्यात केंब्रिज अॅनालिटिकासारखी प्रकरणं होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल. पण याआधी जे घडलं त्यामध्ये आता बदल करता येणार नाही, असं झुकरबर्ग म्हणाले. "आम्ही आमच्या चुकातून शिकू आणि भविष्यात फेसबुक अधिक सुरक्षित करू," अशी ग्वाही त्यांनी दिली.
केंब्रिज अॅनालिटिकावर नेमके आरोप काय?
"तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते जाणून घ्या," अशी पर्सनॅलिटी टाईप जाणून घेण्यासाठी निमंत्रण देणारी एक क्विझ 2014मध्ये फेसबुकवर टाकण्यात आली होती. ही क्विझ केली केंब्रिज विद्यापीठाचे अलेक्झांडर कोगन यांनी (विद्यापीठाचा केंब्रिज अॅनालिटिकाशी काहीही संबध नाही).
त्या वेळी अॅप्स आणि गेम्सचा वापर सर्रासपणे होत असल्यानं केवळ या क्विझमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीची नव्हे तर त्यांच्या मित्रांचीही संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ही क्विझ डिझाइन करण्यात आली होती.
डेटा डेव्हलपर अशा पद्धतीनं माहिती मिळवू शकणार नाही, याकरिता नंतरच्या काळात फेसबुकने बरेच बदल केले.

फोटो स्रोत, Getty Images
केंब्रिज अॅनालिटिकासोबत काम केलेले ख्रिस्तोफर विली यांनी हे उघडकीस आणत आरोप केला की, या क्विझमध्ये 2.70 लाख लोकांनी सहभाग घेतल्यानं त्यांच्या फेसबुक फ्रेंड्ससह जवळपास पाच कोटी लोकांची, विशेषतः अमेरिकेतील लोकांची, माहिती त्यांच्या मित्रांच्या नेटवर्कमधून मिळवण्यात आली होती, तेही त्यांची संमती न घेता.
फेसबुकचं म्हणणं आहे की ही माहिती केंब्रिज अॅनालिटिकाने कायदेशीररीत्या मिळवली असली तरी ती त्यांनी वेळेवर डिलीट केली नाही.
आम्ही तो डेटा डिलीट केला, अशी सफाई केंब्रिज अॅनालिटिकाने दिली आहे. कंपनीचे प्रमुख अलेक्झांडर निक्स यांना निलंबित करण्यात आलं आहे.
पण या माहितीचा वापर काय? या लोकांच्या आवडीनिवडी तपासून केंब्रिज अॅनालिटिकाने ट्रंप यांच्या बाजूने, त्यांची प्रशंसा करणाऱ्या गोष्टी त्यांच्या फेसबुक फीडमध्ये ढकलण्यास सुरुवात केली.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रंप यांना मदत केल्याचं श्रेय या कंपनीला दिलं जातं.
"मी हे ठामपणे सांगतो की, केंब्रिज अॅनालिटिका लाच किंवा हनीट्रॅप सारख्या प्रकरणांमध्ये कुणाला अडकवत नाही. चुकीच्या गोष्टीला स्थान देत नाही. ते कोणत्याही उद्देशासाठी असत्य सामग्रीचाही वापर करीत नाही," असं निक्स यांनी सांगितलं.
बीबीसी टेक्नॉलॉजी प्रतिनिधी डेव्ह ली यांचं विश्लेषण
फेसबुकने जाहीर केलेल्या स्टेटमेंटमध्ये मला एक गोष्ट निश्चितपणे कळली आहे - फेसबुकने माफी मागितली नाही. त्यांच्या हातून जे काही घडलं त्याचा आरोप ते आपल्यावर घेण्यास तयार नाहीत.
झुकरबर्ग पश्चात्ताप करत नाहीत आणि यावेळीही ते काही फार वेगळे वागताना दिसत नाही आहेत. त्यांनी फेसबुक युजर्सची, कर्मचाऱ्यांची आणि गुंतवणुकदारांची माफी मागितली नाही. त्या वेळच्या डेटा पॉलिसीमुळे हे प्रकरण कसं घडलं, त्याबद्दलही त्यांनी काही सांगितलं नाही.
अॅप्सने डेटा लीक केला, असं फेसबुकचं म्हणणं आहे. त्यांनी 2014नंतर ही चूक सुधारली, असंही ते म्हणाले. मग मुळातच अशा डेव्हलपर्सला इतका अॅक्सेस देण्याची गरज काय होती? ते अॅप्स तेव्हाच का बंद करण्यात आले नाहीत?
डेटा लीक झाला असावा आणि त्यातून त्यांच्या डेटाचा गैरवापर करण्यात आला असावा, याबाबत ते युजर्सला कल्पना देऊ शकले असते, पण त्यांनी तेही केलं नाही. तांत्रिकदृष्ट्या अजूनही हे झालं नाही.
झुकरबर्ग यांचे हे शब्द काही स्पष्टीकरण नाही. हे स्टेटमेंट केवळ एक राजकीय आणि कायदेशीर बचावाचा पवित्रा आहे. वेगवेगळ्या स्तरावर त्यांना लढाईला सामोरं जावं लागणार आहे, याची त्यांना जाणीव झाली आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








