फक्त स्मरणशक्तीच नाही, अक्रोड-बदाम खाल्ल्याने तुमच्या वीर्याची शक्तीही वाढेल

अक्रोड बदाम

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अॅलेक्स थेरिन
    • Role, हेल्थ रिपोर्टर, बीबीसी न्यूज

शाळेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आठवत नसलं की मॅडमचं एक वाक्य ठरलेलं असायचं - "बदाम खात जा रं बाबा, स्मरणशक्ती वाढेल, लक्षात राहील!"

पण तुम्ही अक्रोड बदाम खाण्याचे फायदे तुमच्या पुढच्या पीढीला होतात, हे तुम्हाला कदाचित माहिती नसावं.

अक्रोड-बदाम खाण्यामुळे स्पर्म म्हणजेच शुक्राणूंची गुणवत्ता वाढते, असं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

दोन्ही हातांच्या मुठीभरून बदाम, अक्रोड दररोज सलग 14 आठवडे खाणाऱ्या व्यक्तीच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढल्याचं वैज्ञानिकांना आढळून आलं आहे.

खाण्याच्या सवयी, धूम्रपान आणि प्रदूषण यामुळे पाश्चिमात्य जगातील लोकांमधील स्पर्मची संख्या कमी होत असल्याचं या अभ्यासात समोर आलं आहे. दर सात जोडप्यांपैकी एका जोडप्यातील महिलेला प्रसूतीत अडचणी येत असल्याचं आढळून आलं आहे. तर 40-50 टक्के पुरुषांमध्ये प्रजननाशी संबंधित समस्या आढळल्या.

मात्र, सकस आणि पोषक आहार घेतल्यामुळे यात बदल करता येऊ शकतो, असं संशोधकांना दिसून आलं.

कसा झाला अभ्यास?

स्पेनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ रोविरा आय वर्जिली इथे हा अभ्यास करण्यात आला. 18 ते 35 वयोगटातील चांगलं आरोग्य असलेल्या 119 जणांची वैज्ञानिकांनी अभ्यासासाठी दोन गटांत विभागणी केली होती. यातल्या एका गटाला त्यांच्या रोजच्या आहाराबरोबर 60 ग्रॅम अक्रोड, बदाम घेण्यास सांगण्यात आलं. तर दुसऱ्या गटाच्या सवयींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

ज्यांनी रोजच्या आहारासोबत अक्रोड, बदाम घेतले त्यांच्या स्पर्ममध्ये वाढ दिसली. स्पर्म काउंट 14 टक्क्यांनी, त्यांची क्षमता 4 टक्क्यांनी, हालचाल 6 टक्क्यांनी आणि त्यांचा आकार एक टक्क्याने वाढला.

स्पर्मची गुणवत्ता मोजण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलेल्या नियमावलीप्रमाणेच गुणवत्ताही तपासण्यात आली आहे. स्पर्मची गुणवत्ता ही पुरुषाच्या प्रजनन क्षमतेवर आधारलेली असते.

आहारातल्या ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि बी विटॅमिन फोलेट या पोषक घटकांमुळे प्रजनन क्षमतेत वाढ होत असल्याचंही या अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

अक्रोड, बदाम या पदार्थांमध्ये या पोषक घटकांसह अन्य पोषक घटकही असतात.

शुक्राणूंचं काल्पनिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

या अभ्यास प्रकल्पाचे प्रमुख डॉ. अॅल्बर्ट सॅलासह्युतोस सांगतात, "आरोग्याच्या संदर्भात पुस्तकांमध्ये आढळलेल्या पुराव्यांवरून हे दिसून येतं की, आरोग्यदायी जीवनशैली आणि पोषक आहारामुळे प्रजनन क्षमतेत वाढ होते."

अभ्यासानंतर चिंताही

मात्र, या अभ्यासानंतर संशोधकांना एक चिंता सतावते आहे. कारण ज्या पुरुषांचा गट या अभ्यासात सहभागी झाला होता, त्या गटातील सगळ्याच पुरुषांचं आरोग्य चांगलं होतं आणि ते प्रजननक्षमही होते. त्यामुळे ज्या पुरुषांना प्रजनन क्षमतेत अडचणी आहेत, अशांना या संशोधनातील निष्कर्ष कितपत लागू होतील, याबाबत वैज्ञानिक साशंक आहेत.

या अभ्यासात सहभागी नसलेले आणि युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डमध्ये अँड्रोलॉजीचे प्राध्यापक असलेल्या अॅलन पेसी यांनी या अभ्यासाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "या पुरुषांनी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी इतर काही उपाय केले असतील. त्याचा उल्लेख किंवा त्यातून झालेले फायदे हे या अभ्यासात कदाचित गृहित धरलेले नसावेत."

लंडनमधल्या गाईज हॉस्पिटलमध्ये काम केलेल्या डॉ. व्हर्जिनिया बोल्टन यांनी शैक्षणिदृष्ट्या हा अभ्यास रोचक असल्याचं सांगितलं. पण यामुळे थेट प्रजनन क्षमतेत वाढ होईल, हे म्हणणं धाडसाचं ठरेल.

डॉ. बोल्टन म्हणातात, "पण या सगळ्याची ठोस उत्तरं मिळेपर्यंत आपण आपल्या रुग्णांना दारू पिण्यापासून आणि धूम्रपान करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. तसंच अशा प्रकारचं पोषक अन्न खाण्याचा कायम सल्ला दिला पाहिजे."

बार्सिलोना इथल्या 'European Society of Human Reproduction and Embryology' च्या वार्षिक बैठकीत या अहवालावर चर्चा करण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)