फादर्स डे स्पेशल : फुटबॉलमधले बापसे सवाई बेटे

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

जून महिन्यातला तिसरा रविवार हा जगभरात फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि सध्या क्रीडा जगतात फुटबॉल वर्ल्ड कपची धूम सुरू आहे. त्या निमित्ताने बघूया फुटबॉलचं मैदान गाजवलेल्या बाप-मुलांच्या जोड्या. यातले रिवाल्डो आणि रिवाल्डिनिओ तर एका मॅचमध्ये एकत्र खेळले आहेत.

1. झिनेदिन झिदान - एन्झो झिदान (फ्रान्स)

अगदी अलीकडचे हे उदाहरण. त्याच्या काळातला सगळ्यात आक्रमक मिडफिल्डर ही झिनेदिन झिदानची ओळख. १९९८मध्ये फ्रान्सला वर्ल्ड कप जिंकून दिल्यावर तो देशात सुपरस्टार पदावर पोहोचला.

त्यानंतर रियाल माद्रिदबरोबर ७ कोटी ७० लाख पाऊंडचा केलेला करार हा नंतरची आठ वर्षं सर्वाधिक रकमेचा करार होता. वर्ल्ड कप, युएफा कप आणि वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू असे तीन मानाचे पुरस्कार पटकावणाऱ्या मोजक्या फुटबॉलपटूंपैकी एक झिदान आहे.

त्याचा मोठा मुलगा एन्झो त्याच्या पावलांवर पाऊल टाकतो आहे. एन्झोचं नाव ठेवलं आहे जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू एन्झो फ्रान्सिस्कोलीच्या नावावरून.

खेळाची त्याची शैली म्हणजे प्रति झिनेदिन वाटावी अशीच आहे. फ्रान्ससाठी तो १९ वर्षांखालील मुलांचा वर्ल्ड कप खेळला आहे. गंमत म्हणजे एन्झोने क्लब फुटबॉलला सुरुवात केली तेव्हा त्याचा पहिला कोच होता साक्षात झिनेदिन झिदान.

त्यानंतर मात्र वडिलांच्या छत्रछायेतून बाहेर पडून एन्झो ल्युझान स्पोर्ट या स्वीस क्लबकडून खेळतो आहे. फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांचं नागरिकत्व त्याच्याकडे आहे. एन्झोचे इतर तीन भाऊही फुटबॉल खेळतात.

2. पीटर श्माईकेल - कॅस्पर श्माईकेल (डेन्मार्क)

झिदान आणि एन्झो जसे दोघंही मिडफिल्डर आहेत, तसंच श्माईकेल बाप-लेकांचं आहे. दोघंही गोलकीपर. आताच्या डॅनिश टीममध्ये ३१ वर्षांच्या कॅस्परला स्थान मिळालेलं नाही.

पण, राष्ट्रीय टीमसाठी तो ३०च्या वर मॅच खेळला आहे. फुटबॉलवर क्लब पद्धतीचं वर्चस्व असताना राष्ट्रीय स्तरावरची ही कामगिरी भरीव म्हटली पाहिजे.

पीटर आणि कॅस्पर दोघंही मिळालेल्या संधीमुळे इंग्लिश क्लबमध्ये जास्त रमले. सध्या कॅस्पर लिसेस्टर सिटीकडून खेळतो आहे. आणि त्याची जर्सी आहे १ नंबरची.

त्याची सुरुवात मॅन्चेस्टर सिटीपासून झाली. आणि तिथली त्याची कामगिरी बघून इंग्लंडला तो आपल्याकडून खेळायला हवा होता. पण, कॅस्परने डेन्मार्कचं नागरिकत्व सोडलं नाही. आणि इंग्लंडचं निमंत्रण नाकारलं.

वडील पीटर श्माईकेल यांनी तर गोली म्हणून आपला काळ गाजवला आहे. १९९२ आणि ९३मध्ये सलग दोन वर्षं त्यांना सर्वोत्तम गोलकीपरचा मान मिळाला.

मॅन्चेस्टर युनायटेड या प्रथितयश क्लबकडून खेळताना त्यांनी टीमची कप्तानीही केली. इंग्लंडमध्ये ते विशेष लोकप्रिय होते. १९९२मध्ये युएफा युरो कप जिंकलेल्या डॅनिश टीमचे ते सदस्य होते.

3. पाओलो मालदिनी - ख्रिस्तियन मालदिनी (इटली)

झिदानला जे स्थान फ्रान्सच्या राष्ट्रीय टीममध्ये आहे. तेच पाओलो मालदिनी यांना १९९०च्या दशकात इटलीच्या टीममध्ये होतं. रेकॉर्ड १२६ मॅच ते इटलीच्या राष्ट्रीय टीमसाठी खेळले.

त्यातली आठ वर्षं त्यांनी राष्ट्रीय टीमचं नेतृत्व केलं. ते बचावफळीत खेळायचे, म्हणजे डिफेन्डर. त्यामुळे एवढ्या मोठ्या कारकीर्दीत त्यांच्या नावावर ७ गोल होते. मिलान या इटालियन क्लबसाठी ते शेवटपर्यंत खेळले. बफॉनचा उदय होईपर्यंत मालदिनी हे नाव इटलीतल्या फुटबॉलप्रेमींसाठी देवासारखं होतं.

ख्रिस्तियन ही मालदिनी घराण्यातली फुटबॉल खेळणारी तिसरी पिढी आहे. २२ वर्षांचा ख्रिस्तियनही बचाव फळीत खेळतो. आणि सुरुवातीची काही वर्षं मिलान टीमबरोबर घालवल्यानंतर त्याने फाँडी क्लबशी अलीकडे करार केला आहे. यंदा इटली टीम वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेली नाही. त्याचा छोटा भाऊ डॅनिएलही फुटबॉल खेळतो.

4. दिएगो साईमवन - जिओनी साईमवन (अर्जेंटिना)

अर्जेंटिना या लॅटिन अमेरिकन देशात खेळला जाणारा फुटबॉल मूळातच आक्रमक आणि शैलीदार आहे. देशाला फुटबॉलची मोठी पंरपरा आहे. आणि दिएगो आणि जिओनी या परंपरेचे पाईक आहेत. दिएगो मिडफिल्डर तर जिओनी सेकंड फॉरवर्ड आहे.

दिएगो २००२ पर्यंत अर्जेंटिनासाठी शंभरच्या वर मॅच खेळले आहेत. त्यात तीन वर्ल्ड कपही आले आणि १९९६च्या ऑलिम्पिकमधलं सिल्व्हर मेडलही. त्यानंतर स्पेनमध्ये स्थायिक होत अटलेटिको माद्रिद टीमचे कोच म्हणून ते स्थिरावले.

मेस्सीचा दबदबा असलेल्या काळात जिओनीचं नावही प्रतिभावान खेळाडू म्हणून घेतलं जातं. तो स्ट्राईकर आहे आणि मैदानावर संधी निर्माण करून गोल करण्याची त्याची हातोटी आहे.

स्पेनचं नागरिकत्वही असलं तरी त्याने अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय टीमकडून खेळण्याला प्राधान्य दिलं आहे. अटलेटिको माद्रिद टीमचंही त्याच्यावर लक्ष होतं. पण सध्या त्याने फायरेंटिना क्लबशी करार केला आहे. अंडर-२० स्तरावर अर्जेंटिनाला त्याने यूथ अमेरिकन कप जिंकून दिला आहे.

5. जॉर्ज वी - टिमथी वी (लायबेरिया)

फुटबॉलमधल्या यशस्वी कारकीर्दीनंतर जॉर्ज वी सीनिअर आता राजकारणात स्थिरावले आहेत आणि लायबेरियाचे ते चक्क राष्ट्राध्यक्ष आहेत.

छोट्या लायबेरिया देशाला फिफा वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. पण, १९९०च्या दशकातले सर्वोत्तम आफ्रिकन खेळाडू असा लौकिक त्यांनी मिळवला.

लायबेरियात फुटबॉलचा प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. इंग्लंड, जर्मनी, इटली आणि फ्रान्स या देशात क्लब स्तरावर ते खेळले आणि फक्त खेळले नाहीत तर १९९५मध्ये फिफा सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरले. जागतिक रँकिंगमध्येही ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले.

जॉर्ज यांची तीनही मुलं फुटबॉल खेळतात. पण, टिमथी हा तिसरा मुलगा राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला. सध्या तो फक्त १८ वर्षांचा आहे आणि अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय टीममध्ये त्याची निवड झाली आहे.

स्ट्राईकर असलेला टिमथी पॅरिस सेंट जर्मेन क्लबबरोबर करारबद्ध आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय टीमचंही त्याच्याकडे लक्ष होतं. पण, तो न्यूयॉर्कला राहतो. आणि अमेरिकन असल्याचा त्याला अभिमान आहे. अमेरिकेकडून अंडर-१७ वर्ल्ड कपमध्ये पेराग्वेविरुद्ध त्याने हॅट-ट्रीक केली आहे.

6. मार्क चेंबरलेन - अँलेक्स चेंबरलेन (इंग्लंड)

मार्क आणि त्यांचा मुलगा अँलेक्स यांची कारकीर्द त्या मानाने छोटी आहे. मार्क सध्या ५६ वर्षांचे आहेत आणि इंग्लिश टीमकडून ते आठ आंतरराष्ट्रीय मॅच खेळले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याच्या मानाने त्यांना कमी संधी मिळाली असं मानलं जातं.

अँलेक्स चेंबरलेन सध्या २४ वर्षांचा आहे. आणि लिव्हरपूल क्लबचा तो मिडफिल्डर आहे आणि इंग्लिश राष्ट्रीय टीमचा तो महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. युरो कप त्याने गाजवला आहे. पण, २०१८च्या वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप पदार्पणाची त्याची संधी हुकली.

7. रिवाल्डो - रिवाल्डिनिओ (ब्राझील)

रिवाल्डो यांनी ब्राझीलसाठी वर्ल्ड कप जिंकला आहे. तसंच फिफा सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान मिळवला आहे. त्यांचा मुलगा रिवाल्डिनो राष्ट्रीय टीमकडून खेळला नाही.

पण, दोघांच्या नावावर मिळून एक अनोखा रेकॉर्ड आहे. दोघं क्लब स्तरावर एकाच टीममधून एकत्र खेळले आणि जिंकले आहेत. बाप-लेक एकाच वेळी खेळणं हा दुर्मिळ योगच.

अगदी अलिकडे २०१५ साली हा योग जुळून आला. रिवाल्डो यांनी खरंतर तोपर्यंत निवृत्ती पत्करली होती. पण, पंधरा महिन्यांनंतर त्यांनी ती मागे घेतली. ते ४३ वर्षांचे होते. आणि साओ पाओलो टीमकडून ते आपला मुलगा रिवाल्डिनोच्या साथीने खेळले. गंमत म्हणजे ही मॅच त्यांच्या टीमने ३-१ अशी जिंकली आणि चक्क रिवाल्डो आणि रिवाल्डिनो या दोघांनी गोल केले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)