You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
येमेनमध्ये 2 कोटी लोकांचा जीव धोक्यात : नेमका संघर्ष जाणून घ्या
सरकारच्या पाठीराख्या सैन्याने सौदीच्या नेतृत्वाखालील सैन्य आघाडीला बरोबर घेत हुदयदाह बंदरावर हल्ला केला आहे. हौदी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या या महत्त्वाच्या बंदरातूनच येमेनमध्ये लोकांना अन्न आणि आरोग्यसारखी मदत पुरवली जात होती. म्हणून येमेनमधलं मानवी संकट पुढे आणखी वाईट दिवस पाहण्याची चिन्हं आहेत.
या ताज्या संघर्षात सौदी अरबियाच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 22 हौदी बंडखोरांचाही यात मृत्यू झाल्याचं कळत आहे.
हा संघर्ष आता नव्या टोकाला पोहोचेल, या भीतीपोटी आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतही यावर तातडीने चर्चा होणार आहे. पण हा प्रश्न काही आज अचानक उभा राहिला नाहीये.
गेल्या तीन वर्षांपासून येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू आहे, ज्यात आजवर 10,000 लोकांचा मृत्यू झाला आहे, आणि लाखो लोक उपासमारीच्या गर्तेत गेले आहेत.
या सगळ्या प्रकरणाची सुरुवात 2011 मध्ये झाली, जेव्हा देशाचे हुकूमशाह अली अब्दुल्लाह सालेह यांच्याविरोधात उठाव झाला. या उठावानंतर सत्तेची सूत्रं अबद्रा बूह मन्सूर हादी यांच्या हाती आली.
मध्यपूर्व आशियातील सगळ्यांत गरीब देशांपैकी एक असलेल्या येमेनमध्ये या सत्तापालटानंतर तरी स्थैर्य येईल, अशी अपेक्षा होती. पण कट्टरवाद्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, अन्नसुरक्षा आणि सालेह यांच्याप्रति निष्ठावान अधिकाऱ्यांमुळे हादी यांच्यासमोरची आव्हानं संपता संपेना.
या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या दुबळेपणाचा फायदा घेत 2014 साली हौदी शिया मुस्लिमांनी उत्तर सादा आणि त्याशेजारच्या भाग ताब्यात घेतला. एवढंच नव्हे तर या हौदींनी राजधानी सानावर हल्ला केला आणि हादी यांना मग विजनवासात जावं लागलं.
2015च्या मार्चमध्ये हा संघर्ष अचानक वाढला. सौदी अरेबिया आणि आठ सुन्नी अरब देशांनी हौदी मुस्लिमांवर हल्ला केला. त्यांना अमेरिका, UK, फ्रान्स यांचा पाठिंबा होताच. त्या हल्ल्यामागचा उद्देश होता हादी यांना सत्तेवर आणणं.
सतत मिळणाऱ्या यशामुळे हौदी या प्रदेशात शक्तिशाली होतील आणि बहुसंख्याक शिया असलेला इराण इथे प्रबळ होईल, अशी भीती या सौदी अरेबियाप्रणित सैन्याला वाटली. इराण हौदींना शस्त्र पुरवत असल्याचा आरोप सौदी अरेबियाने केला आहे. इराणने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.
तेव्हापासून या दोन्ही गटांत होणाऱ्या संघर्षात वाढ झाली आहे. हौदी आणि सालेह यांच्यात ताटातूट झाली आणि डिसेंबर 2017 सालेह हौदी सैनिकांनी त्यांची हत्या केली.
दुसरीकडे इतर काही संघर्ष आहेत. काही हौदीविरोधी गटं आहेत, जसा की दक्षिण येमेनचा एक गट जो येमेनपासून स्वातंत्र्यासाठी वेगळा लढा देतोय आणि त्यांची आणि त्यांचे विरोधकांबरोबर खटके उडत असतातच.
या सगळ्या घडामोडींमुळे तिथे एक मोठं मानवी संकट आलंय. 84 लाख लोकांना उपासमारीचा धोका निर्माण झाला आहे आणि 2 कोटी 22 लाख, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साधारण 75 टक्के लोकांचा जीव धोक्यात आहे. कुपोषणामुळे पाच वर्षांखालील 4 लाख बालकांचा जीव धोक्यात आहे.
या सगळ्यांना मदतीची गरज आहे, असं संयुक्त राष्ट्र महासंघानेही स्पष्ट केलं आहे.
जगातील सगळ्यांत मोठी कॉलराची साथ इथे आली आहे, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. पण येमेनमधील आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
जून 2018 मध्ये सौदीच्या नेतृत्वाखालील गटांनी हुदयदाह बंदरावर असलेल्या महत्त्वाच्या बंडखोरांवर हल्ला केला. हे बंदर येमेनमध्ये येणाऱ्या मदतपुरवठ्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार आहे.
या नव्या हल्ल्यामुळे हे मानवी संकट आणखी वाढणार, अशी भीती मदत पुरवणाऱ्या संस्थांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)