ब्रेस्ट कॅन्सरमुळे मरायला टेकलेली पेशंट झाली नव्या उपचाराने ठणठणीत

फोटो स्रोत, JUDY PERKINS
- Author, जेम्स गॅलघर
- Role, बीबीसी आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
ज्युडी पर्किन्स यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यांच्याकडे फक्त तीन महिने आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण आता दोन वर्ष उलटूनही त्या ठणठणीत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या शरीरात कॅन्सरचं नामोनिशाण राहिलं नाहीये, असं डॉक्टरांनी सांगितलंय.
या नवीन उपचाराचा शोध लागल्यामुळे स्तनांचा कॅन्सर कधीच बरा होऊच शकत नाही, हा समज कालबाह्य होण्याची चिन्हं आहेत.
या उपचारात काही अमेरिकन संशोधकांनी कॅन्सरचा प्रतिकार करणाऱ्या 90 अब्ज पेशी एका पेशंटच्या शरीरात घुसवून तिला संपूर्णपणे बरं केलं. US National Cancer Instituteच्या टीमच्या मते या उपचार पद्धतीचा वापर अजूनही प्रायोगिक तत्त्वांवर होत असला तरी कॅन्सरचा उपचार पूर्णपणे बदलून टाकायची क्षमता यात आहे.
फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या ज्युडीला अखेरच्या स्टेजमधला ब्रेस्ट कॅन्सर होता आणि तो त्यांच्या शरीरात पसरत होता. नेहमीच्या उपचार पद्धतीत या कॅन्सरला कोणतंही औषध नव्हतं.
टेनिस बॉलच्या आकाराचे ट्युमर त्यांच्या यकृतात तयार झाले होते. ब्रेस्ट कॅन्सर तर होताच, पण कॅन्सरच्या पेशी त्यांच्या संपूर्ण शरीरात पसरल्या होत्या.
"उपचारांच्या एका आठवड्यानंतर मला जाणवलं की माझ्या छातीतली गाठ आकसतेय," त्यांनी बीबीसीला सांगितलं. "आणखी एक-दोन आठवड्यानंतर ती गाठ पूर्णपणे नाहीशी झाली."
नव्या उपचारांनंतर त्यांचं झालेलं स्कॅन त्यांना अजून आठवतं. "हॉस्पिटलचा सगळा स्टाफ खूपच उत्साहित झाला होता. ते अगदी उड्याच मारत होते, म्हणा ना."
त्या कदाचित बऱ्या होऊ शकतात, असं त्यांना नंतर सांगण्यात आलं. त्यामुळे आता त्यांच्या आयुष्यात खूप नवनवीन गोष्टी घडत आहेत.
आता त्या सॅक पाठीला लावून त्या मस्तपैकी भटकत असतात. कायाकिंग (समुद्रात बोट वल्हवण्याचा खेळ) त्यांना फार आवडतं. नुकतीच पाच आठवड्यांची सुटी घेऊन त्यांनी फ्लोरिडाची सागरी प्रदक्षिणा पूर्ण केली.
'जिवंत' असणारी उपचार पद्धती
या उपचार पद्धतीत पेशंट 'जिवंत औषधं' दिली जातात. ही औषधं रुग्णाच्या स्वतःच्या पेशींपासून बनवली जातात. US National Cancer Institute मध्ये अशा प्रकारची औषधं तयार केली जातात.
या संस्थेमधले शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. स्टीव्हन रोझनबर्ग यांनी बीबीसीला सांगितलं की, "अस्तित्वात असणाऱ्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये ही सगळ्यांत जास्त पर्सनलाईज्ड ट्रीटमेंट आहे, जणू काही ती त्या व्यक्तीसाठीच बनवलेली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ही उपचार पद्धती अजून प्रायोगिक पातळीवरच आहे. याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्यासाठी याच्या अनेक चाचण्या कराव्या लागतील. 'आपल्या शत्रूला ओळखा' या तत्त्वावर ही उपचार पद्धती काम करते.
आधी पेशंटच्या गाठीचा जनुकीय पद्धतीने अभ्यास केला जातो. याव्दारे त्या सूक्ष्म बदलांच्या अभ्यास केला जातो, ज्याने कदाचित कॅन्सर पेशंटच्या शरीराची प्रतिकार शक्ती ओळखता येईल.
ज्युडीच्या चाचणीनंतर 62 असे जनुकीय बदल लक्षात आले, पण त्यातले फक्त चारच कॅन्सरचा प्रतिकार करण्यासाठी उपयुक्त होते.
मग हे अभ्यासक अजून शोधाशोध करायला लागतात. खरं तर पेशंटची प्रतिकार शक्ती आधीच कॅन्सरच्या गाठींवर हल्ला करत असते. पांढऱ्या रक्तपेशी आणि कॅन्सरमधली ही लढाई प्रतिकार शक्ती हरत असते.
शास्त्रज्ञ पेशंटच्या पांढऱ्या रक्तपेशींचा अभ्यास करतात, आणि ज्या पेशी कॅन्सरवर हल्ला करू शकतात, त्या काढून घेतात. या पेशींची प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाते.
49 वर्षांच्या ज्युडींच्या शरीरात 90 अब्ज पेशींचं प्रत्यारोपण करण्यात आलं. याबरोबरच प्रतिकार शक्तीची क्षमता वाढवणारी औषधंही देण्यात आली.
डॉ. रोझनबर्ग यांनी बीबीसीला सांगितलं की, "शरीरातल्या ज्या जनुकीय बदलांमुळे कॅन्सरच्या गाठी तयार होतात, तेच बदल नंतर कॅन्सरच्या जीवावर उठतात.
बदलाचा टप्पा
अर्थात हा उपचार आतापर्यंत फक्त एकाच पेशंटवर झाला आहे. त्यातून जे निष्पन्न झालं तेही एका पेशंटपुरतंच मर्यादित आहे. या उपचार पद्धतीच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी याच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या होणं गरजेचं आहे.
यात सगळ्यांत मोठी अडचण ही आहे की ही उपचारपद्धती काही जणांसाठी वरदान ठरतेय. मात्र बहुतांश जणांना याचा फायदा होताना दिसत नाही.
"फारच प्रयोगिक स्थितीत आहे ही उपचारपद्धती. ही कशी वापरायची हे आम्हीही शिकतोय. पण याचा सगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर उपयोग व्हायला हवा," डॉ. रोझनबर्ग यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"यावर अजून खूप काम व्हायला हवं, कारण हा उपचार कॅन्सर उपचारातला मोठ्या बदलाचा टप्पा ठरू शकतो. यात प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटसाठी एक वेगळं औषध आहे, ही खरंच खूप वेगळी उपचार पद्धती आहे."
ज्युडीला दिलेल्या ट्रीटमेंटची माहिती 'नेचर मेडिसीन' या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती.
Breast Cancer Now या संस्थेचे संशोधन संचालक डॉ. सायमन व्हिन्सेंट यांनी या उपचार पद्धती "जागतिक दर्जाची" म्हटलं आहे.
"हा एक उत्तम रिसर्च आहे," त्यांनी बीबीसीला सांगितलं.
"ही इम्युनोथेरेपी कसं काम करते हे पाहायची ही पहिलीच संधी होती. सर्वसामान्य ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार याव्दारे केला गेला. अर्थात ही आतापर्यंत फक्त एकाच पेशंटवर वापरली आहे.
"यावर अजून काम केलं तर खूप साऱ्या पेशंटवर उपचार करायचा एक नवा मार्ग सापडेल."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








