You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रंप यांची भेट व्हावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले - उत्तर कोरिया
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेतून अमेरिकेनी माघार घेतल्यानंतर उत्तर कोरियाने नाराजी व्यक्त केली आहे.
किम जाँग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट व्हावी अशी पूर्ण जगाची इच्छा होती. पण ट्रंप यांनी घेतलेला निर्णय हा जगाच्या इच्छेनुसार नाही, असं उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनी म्हटलं आहे.
ट्रंप यांची भेट व्हावी म्हणून उत्तर कोरियाने खूप प्रयत्न केले होते. आम्ही अमेरिकेबरोबर चर्चा करून कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहोत, असं उत्तर कोरियानं म्हटलं आहे.
सिंगापूर चर्चेतून माघार घेऊन ट्रंप यांनी किम यांना फसवलंय का? याविषयी चर्चा सुरू आहे. काल संध्याकाळपासून नेमकं काय घडलं याचे अपडेट्स या वरच्या बातमीत वाचता येतील.
उत्तर कोरियानं याआधी अनेक वचनं पाळली नाहीत त्यामुळं त्यांच्यासोबतच्या चर्चेतून माघार घेण्यात आली असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यामध्ये सिंगापूर येथे नियोजित केलेल्या चर्चेची तयारी देखील उत्तर कोरियाला करता आली नाही असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांना लिहिलेल्या पत्रात ट्रंप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या या पत्रात ट्रंप म्हणाले, "आण्विक नि:शस्त्रीकरणासंदर्भात तुमची लवकरात लवकर भेट घ्यायची होती. मात्र तुम्ही प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रचंड राग आणि द्वेष खुलेपणाने दिसत होता. आताच्या घडीला भविष्याचा विचार करून तुमची भेट घेणं रास्त ठरणार नाही."
याआधी उत्तर कोरियाने अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणारे बोगदे उद्धवस्त केल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेच्या आग्रहानुसार उत्तर कोरियाच्या आण्विक निःशस्त्रीकरणाच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात होतं.
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्याशी डावपेचात्मक चर्चा सुफळ होण्यासाठी उत्तर कोरियाने यंदाच्या वर्षीच पुंगे-रीचा अण्वस्त्र प्रकल्प बंद करण्याची तयारी दर्शवली होती.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)