You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रातल्या दूध आंदोलनासारखे गाजलेले जगभरातले 6 अनोखे संप
सध्या एक लिटर दूध हे एक लीटर पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी भावात विकलं जात आहे. हा कमीभावाने हतभल झालेल्या महाराष्ट्रातल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाला एक पत्र लिहिलं.
गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला प्रतिलीटर 27 रुपये भाव द्यावा, असं परिपत्रक काढलं होतं. असं असतानाही आज शेतकऱ्याच्या दुधाला केवळ 17 ते 19 रुपये दर दिला मिळतोय.
आमच्या दुधाला कमी भाव देण्यापेक्षा आम्हीच ते फुकट देतो, असं म्हणत या शेतकऱ्यांनी मग दूध मोफत वाटून वेगळ्या धाटणीचं आंदोलन केलं. काहींनी तर ते अक्षरशः रस्त्यावर टाकून दिलं.
हे आंदोलन नेमकं का आणि कसं झालं, वाचा सविस्तर इथे.
याच आंदोलनासारखं प्रचंड गाजलेल्या जगावेगळ्या आंदोलनांचा हा लेखाजोखा.
1. प्रवाशांचा मोफत प्रवास, कंपनीला चुना
जपानमधल्या योकायामा शहरातील सार्वजनिक बस कर्मचारी मे 2018 मध्ये संपावर गेले. पण त्याचा फटका सामान्य जपानी बसायला नको म्हणून त्यांनी ठरवलं - दररोज कामावर जायचं, बस चालवायची. फक्त प्रवाशांकडून तिकिटांचे पैसे घ्यायचे नाही.
त्यांनी प्रवाशांकडून पैसे न घेता त्यांना प्रवास करू दिला, जेणेकरून इंधन आणि सेवा देण्यासाठी जो इतर खर्च येतोय, त्याचा फटका थेट प्रशासनाला बसला पाहिजे.
बाजारात दुसऱ्या दुसऱ्या एका वाहतूक कंपनीमुळे त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे या बस कर्मचाऱ्यांमध्ये त्यांची नोकरी धोक्यात असल्याची भावना आहे.
पण या आंदोलनामुळे बस मालकांचे धाबे दणाणले आहेत. बाजारातील स्पर्धेमुळे अगोदरच गोत्यात आलेल्या कंपनीला या आंदोलनामुळे आणखी नुकसान होणार आणि तिचा महसूल आणखी कमी होऊ शकतो. मग मदत कशी मिळणार, असा प्रश्न विचारला जातोय.
पण जपानच्या एका वेबसाईटनुसार, निदान या मोफत बस प्रवासामुळे संबंधित वाहतूक कंपनी आणि प्रवाशांचे संबंध तरी टिकून आहेत, हे विशेष.
2. युद्ध विराम नाही मग सेक्सही नाही!
सेक्सचा शस्त्रासारखा वापर करून महिला आपली कामं करवून घेतात, असा समज प्रचलित आहे. प्राचीन काळातले ग्रीक विनोदी नाटककार अॅरिस्टोफेन्स यांचं लायसिस्ट्राटा हे नाटक यावरच आधारीत आहे.
यात इसवी पूर्व पाचव्या शतकात झालेल्या पेलोपोन्नेसियन युद्धाला कंटाळलेल्या महिला मग स्वतः शांतता आणण्याचा प्रयत्न करतात. जोवर युद्धात लढणारी पुरुष मंडळी शस्त्र टाकून चर्चा करत नाही तोवर आम्ही त्यांच्यासोबत सेक्स करणार नाही, असा अट्टाहास त्या या नाटकात धरतात.
याच नाटकातून प्रेरणा घेत जगभरात अनेक महिलांनी यासारखीच आंदोलनं केली आहेत.
शांततेच्या पुरस्कर्त्या लीमा बॉवी यांनी 2003 मध्ये असंच पाऊल उचलत लायबेरियातील यादवी यु्द्ध थांबवली. यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला. त्यांच्या या आदोलनामुळं एलन जॉनसन-सर्लिफ या आफ्रिकेतल्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या.
3. ...अन् ते वर्षभर आइस हॉकी खेळलेच नाही
जर पगाराच्या मुद्द्यावरून एखाद्या वर्षी IPLचे सामनेच झाले नाही तर? कल्पना करणंही कठीण आहे ना? पण असंच झालं, 2004-05 साली जेव्हा नॉर्थ अमेरिकन नॅशनल हॉकी लीगचा (NHL) एक अख्ख्या सीझनमध्ये खेळाडू मैदानात उतरलेच नाही.
कामगार प्रश्नांवरून NHL आणि खेळाडूंमधली बोलणी फिसकटली आणि खेळाडूंनी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्या वर्षी आईस हॉकीचे तब्बल 1,230 सामने रद्द करावे लागले होते.
4. डिस्ने कर्मचाऱ्यांचा 'अॅनिमेटेड' संप
पगारवाढ आणि युनियनला मान्यता मिळावी म्हणून 1941 मध्ये डिस्नेच्या अॅनिमेशन करणाऱ्यांनी संप केला. स्टुडीओच्या गेटसमोर आंदोलन करताना त्यांनी आपल्या कलागुणांचा पुरेपूर वापर केला.
त्यांनीच तयार केलेले कार्टून कॅरेक्टर्स फलकांवरून त्यांच्या मागण्या पुढे सांगत होते.
पाच आठवडे चाललेल्या संपामुळं 'डंबो' या अॅनिमेन सिनेमाची निर्मिती ठप्प झाली होती. त्यानंतर 'डंबो' सिनेमात हेच आंदोलनकर्ते कार्टूनरूपात आपल्या बॉसला जाऊन पगारवाढ केली नाही म्हणून बदडून काढतात.
5 पोलिसांचा बंद
पहिल्या महायुद्धानंतर आलेल्या महागाईमुळे मॅसेच्युसेट्स शहराच्या पोलिसांच्या पगारीत बरीच घट झाली होती. म्हणून 1919 मध्ये त्यांनी आपापल्या लाठ्या-बंदुका खाली ठेवल्या आणि काम करणं थांबवलं.
त्यामुळे शहरातली कायदा आणि सुव्यवस्था कोडमडली आणि शहरात शांतता राखण्यासाठी शेवटी सरकारला सैन्याला बोलवावं लागलं.
सरकारने या आंदोलनकर्त्या पोलिसांना 'वाऱ्यावर सोडून देणारे' आणि 'लेनिनचे एजंट' म्हणत बडतर्फ केलं. आणि त्यांच्या जागी नव्यानं भर्ती केलेल्या सगळ्या पोलिसांना मात्र आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांनुसार पगार वाढवून दिला.
6.आम्हाला तोच बॉस पाहिजे
मॅसेच्युसेट्समधल्या 'मार्केट बास्केट' या किराणापुरवठा कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी जून 2014 मध्ये संप केला. त्यांना ना पगारवाढ हवी होती, ना ते कामाच्या वेळांनी त्रस्त होते.
त्यांना हवा होता आपला आवडता बॉस आर्थर टी. डिमॉलस ज्याला काही कौटुंबिक वादातून आपल्या पदावरून काढून टाकण्यात आलं होतं.
त्यांच्यासाठी एक थीम साँगही तयार केलं गेलं होतं - "Have you ever heard of workers fighting for a CEO?" ("तुम्ही कधी कर्मचाऱ्यांना आपल्या CEO साठी लढताना पाहिलंय?"
हे प्रकरण इतकं गाजलं की कंपनीला त्यामुळे एका दिवसात एक कोटी डॉलरचा फटका बसला. अखेर अनेक गुंतवणुकदारांनी आपापले शेअर्स डिमॉलस यांना विकले आणि कंपनीतले लोकप्रिय बॉस परत आले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)