अफगाणिस्तान : सहा भारतीयांसमवेत सात जणांचं अपहरण

अफगाणिस्तानच्या बागलान प्रदेशात एका भारतीय कंपनीसाठी काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे.

पाकिस्तानस्थित अफगाण इस्लामिक प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, अफगाणिस्तानच्या बागलान प्रदेशात अज्ञात शस्त्रधारी हल्लेखोरांनी KEC इंटरनॅशनल या भारतीय कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचं अपहरण केलं आहे. अपहरण झालेल्या सात जणांपैकी सहा भारतीय आहेत.

बागलान प्रदेशाचे पोलीस दलाचे प्रवक्ते जबिहुल्ला शूजा यांनी अफगान इस्लामिक प्रेसला (AIP) माहिती दिली की, "काही शस्त्रधारी लोकांनी बागलान प्रदेशाची राजधानी पुल-ए-खुमरी इथून समांगनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता सात लोकांचं अपहरण केलं आहे."

अपहरण झालेल्या लोकांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

शूजा यांनी माहिती दिली की, हे लोक पुजा-ए-खुमरीच्या ख्वाजा अलवान परिसरातील एका विद्यूत उप-केंद्रावर काम करत होते. त्यांच अपहरण कारी नूरुद्दीनच्या विश्वासू तालिबान लढवय्यांनी केलं आहे.

भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी या घटनेबाबत सरकारनं अफगाणिस्तानशी संपर्क साधल्याचं म्हटलं आहे.

तथापि तालिबान प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद यानं या घटनेविषयी आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

KEC इंटरनॅशनल लिमिटेडतर्फे विद्यूत पुरवठ्यासाठी टॉवर उभे केले जातात.

AIPच्या बातमीनुसार या कंपनीनं अफगाणिस्तान सरकारबरोबर अनेक करार केले आहेत. ही कंपनी अफगाणिस्तानमध्ये सेंट्रल एशिया साऊथ इशिया इलेक्ट्रिसिटी ट्रांसमिशन अँड ट्रेड प्रोजेक्ट (CASA-1000) सह इतर अनेक योजनांवर काम करत आहे.

तालिबाननं यापूर्वीही देशातील विद्यूत पूरवठ्याशी निगडीत पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना लक्ष्य केलं आहे.

मार्चमध्ये तालिबाननं एक निवेदन प्रसिद्ध करत अफगाणिस्तान सरकारला कुंदूज आणि बागलानमध्ये आपल्या नियंत्रणातील भागात विद्यूत पुरवठा सुरळीत ठेवण्याविषयी इशारा दिला होता.

या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर काबूलला होणारा विद्यूत पुरवठा बंद केला जाईल, अशी धमकीही दिली होती.

एप्रिल महिन्यात बागलानमध्ये विजेचा एक टॉवर तालिबाननं नष्ट केला होता. त्यामूळे काबूल दोन दिवस अंधारात होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)