अख्खं फुटबॉल विश्व अॅलेक्स फर्ग्युसनसाठी का प्रार्थना करतंय?

सर अॅलेक्स फर्ग्युसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर अॅलेक्स फर्ग्युसन

मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे माजी मॅनेजर अॅलेक्स फर्ग्युसन यांच्या मेंदूतून रक्तस्राव झाल्यामुळे त्यांच्यावर तातडीने ब्रेन हॅमरेजची शस्त्रक्रिया करावी लागली.

युनायटेडच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की ही शस्त्रक्रिया 'व्यवस्थित पार पडली', पण फर्ग्युसन यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.

मे 2013 मध्ये मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर म्हणून निवृत्त झालेल्या फर्ग्युसन यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून भरीव कामगिरी केली आहे. काय आहे त्यांचं योगदान? एक नजर टाकूया.

1. 'स्ट्रायकर' फर्ग्युसन

फर्ग्युसन यांनी फुटबॉल खेळण्याची सुरुवात क्वीनस् पार्क या स्कॉटिश क्लबमध्ये स्ट्रायकर म्हणून केली. ते तेव्हा क्लाईड शिपयार्डमध्ये अॅप्रेंटिस म्हणून काम करत होते.

1967 ते 1969 मध्ये रेंजर्स क्लबकडून खेळत असताना त्यांनी सर्वाधिक उल्लेखनीय कामगिरी केली. खेळाडू म्हणून त्यांनी 1974 साली निवृत्ती घेतली तेव्हा ते आयर युनायटेड या क्लबकडून खेळत होते.

2. प्रशिक्षक फर्ग्युसन

आपल्या प्रशिक्षक करिअरची सुरुवात फर्ग्युसन यांनी ईस्ट स्टर्लिंगशायर या क्लबचे मॅनेजर म्हणून केली. लवकरच ते सेंट मिरेन क्लबमध्ये गेले आणि 1977 साली या क्लबला स्कॉटलंडमधलं 'फर्स्ट डिव्हिजन टायटल' जिंकून दिलं.

फर्ग्युसन आणि रोनाल्डो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फर्ग्युसन आणि रोनाल्डो.

मँचेस्टर युनायटेडपूर्वी अॅबरडीन या क्लबसाठी फर्ग्युसन यांनी लक्षणीय कामगिरी केली. मॅनेजरपदाची सुत्रं हातात घेतल्यावर काही काळातच रेंजर्स आणि सेल्टिक या क्लबचं वर्चस्व असलेल्या स्कॉटिश टॉप डिव्हिजनमध्ये अॅबरडीनला त्यांनी ओळख मिळवून दिली. अॅबरडीनने फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली 9 जेतेपदं मिळवली ज्यात रिअल माद्रिदला हरवून मिळवलेल्या युरोपियन कप विनर्स कपचा सुद्धा समावेश होता.

1986च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी स्कॉटलंडचे मॅनेजर म्हणून काम केलं होतं पण ते ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडले.

3. 'युनायटेड'ला शिखरावर नेणारे फर्ग्युसन

1986 साली फर्ग्युसन यांनी युनायटेडची धुरा हाती घेतली. 1993 साली प्रिमीअर लीग स्पर्धेचं जेतेपद पटकावून फर्ग्युसन यांनी युनायटेडचा 26 वर्षं सुरू असलेला विजयाचा दुष्काळ संपवला.

सर अॅलेक्स फर्ग्युसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर अॅलेक्स फर्ग्युसन

आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत अनेक स्टार खेळाडूंना युनायटेडमध्ये आणण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. डेव्हिड बेकहॅम, वेन रूनी यासारख्या खेळाडूंना फर्ग्युसन यांनी युनायटेडमध्ये आणलं.

फर्ग्युसन यांनी युनायटेडला ओल्ड ट्रॅफर्ड या घरच्या मैदानावर 24 चषक मिळवून दिले आणि 'फुटबॉल जगतातला सर्वांत यशस्वी मॅनेजर' अशी आपली ओळख बनवली.

4. विक्रमवीर प्रशिक्षक फर्ग्युसन

1986 ते 2013 या काळात फर्ग्युसन मॅनेजर असताना मँचेस्टर युनायटेडने 38 वेळा जेतेपदावर नाव कोरलं.

मँचेस्टर युनायटेड

फोटो स्रोत, Getty Images

एकाच वर्षात फुटबॉलमधली तीन सर्वाधिक मानाची जेतेपदं मिळवण्याची कामगिरी मँचेस्टर युनायटेडने फर्ग्युसन यांच्याच मार्गदर्शनाखाली केली. 1999 साली प्रिमीअर लीग, FA कप आणि चॅम्पियन्स लीग, अशी तिन्ही जेतेपदं युनायटेडने आपल्या नावे केली. याच वर्षी त्यांना 'सर' हा किताब बहाल करण्यात आला.

5. 'बॉस' फर्ग्युसन

फर्ग्युसन यांच्या शस्त्रक्रियेची बातमी कळाल्यापासून फुटबॉल जगतातून त्यांच्यासाठी प्रार्थना आणि सदिच्छांचा ओघ सुरूच आहे. अनेक आजी-माजी खेळाडूंनी 'बॉस' फर्ग्युसन यांना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. क्रिस्तियानो रोनाल्डो, डेव्हिड बेकहम यांसारख्या खेळाडूंचा त्यात समावेश आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

माझ्या प्रार्थना फर्ग्युसन आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत, असं म्हणत 'बी स्ट्राँग बॉस' अशा शब्दांत युनायटेडचा कॅप्टन मायकल कॅरिक याने आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या.

बेकहॅम, फर्ग्युसन, फुटबॉल

फोटो स्रोत, DAVID BECKHAM/INSTAGRAM

डेव्हिड बेकहम याने फर्ग्युसन यांच्याबरोबरचा हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि 'कीप फायटिंग बॉस' असा शब्दांत त्यांना सदिच्छा दिल्या.

फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने ट्वीट करत फर्ग्युसन लवकर बरे व्हावेत, अशी आशा व्यक्त केली.

1994 साली सर अॅलेक्स फर्ग्युसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1994 साली सर अॅलेक्स फर्ग्युसन

अॅबरडीन क्लबने आपल्या माजी मॅनेजरसाठी ट्विटरवरून भावना व्यक्त करत फर्ग्युसन आणि त्यांच्या कुटुंबीयांसह आपल्या प्रार्थना आहेत असं म्हटलं.

फर्ग्युसन यांच्या हस्ते गेल्याच रविवारी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आर्सेनलचे प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांचा सत्कार करण्यात आला होता. ते सध्या सॅलफर्ड रॉयल हॉस्पिटलमध्ये आहेत. आमच्या या खासगी क्षणांचा आदर करावा, अशी इच्छा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)