इस्राईली पंतप्रधानांच्या आक्षेपानंतरही यूकेकडून इराण अणू कराराची पाठराखण

इराण

फोटो स्रोत, Getty Images

इराणच्या हालचाली या अण्वस्त्र निर्मितीच्या दिशेनं सुरू असल्याची टीका अमेरिका आणि इस्राईलनं केल्यानंतरही यूकेनं इराण अणू कराराची पाठराखण केली आहे.

इराण अण्वस्त्र निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत असा दावा इस्राईलनं केला आहे. हा दावा इराणनं फेटाळून लावला आहे.

इस्राईलच्या दाव्यामध्ये तथ्य आहे, अशी माहिती आमच्या गुप्तहेर खात्यानं दिल्याचं अमेरिकेनी म्हटलं आहे.

2015 साली अमेरिका, यूके, रशिया, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या सहा देशांनी इराणसोबत अणू करार केला होता. त्यानंतर इराणवर असलेले निर्बंध हटवण्यात आले होते.

आम्हाला केवळ अणू ऊर्जा हवी आहे, अण्वस्त्र निर्मितीमध्ये आम्हाला रस नाही असं म्हणत इराणनं अमेरिका आणि इस्राईलचा दावा फेटाळला आहे.

"इराण आपल्या वचनाशी बांधील आहे की नाही याची स्वतंत्ररीत्या पडताळणी करण्यासाठी आम्ही एका विशेष निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्या हालचालीवर आमचं लक्ष आहे," असं यूके सरकारच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

अणू करार

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीनं इराणबरोबरच्या अणू करारात कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सचं या कराराला समर्थन आहे.

इराणनं अण्वस्त्र निर्मितीचा एकदा प्रयत्न केला आहे. त्याबाबत आमच्या हाती पुरावे लागले आहेत. आमच्या हाती गुप्त फाइल्सची हजारो पानं आहेत. त्या आधारावर आम्ही हा दावा केला आहे, असं इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.

इस्राईलचा हा दावा 'बालिश' आहे असं इराणनं म्हटलं. अणू करारात राहायचं की नाही यावर अमेरिका लवकरच निर्णय घेणार आहे. "डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयावर प्रभाव टाकण्यासाठी इस्राईलनं ही खेळी केली," असं इराणनं म्हटलं आहे.

12 मे रोजी डोनाल्ड ट्रंप अणू कराराबाबत निर्णय घेणार आहेत.

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

"या करारात ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्यात याव्यात अन्यथा मी इराणवरील निर्बंधांबाबत पुनर्विचार करेन," असं डोनाल्ड ट्रंप यांनी या करारात सहभागी असलेल्या देशांना म्हटलं आहे.

"इस्राईलनं पुरवलेली माहिती नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाची आहे," असं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.

"इराणकडून गुप्तपणे अणू चाचण्या केल्या जातात. ही बाब अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यानं आधीच सांगितली होती. इस्राईलनं केलेला दावा हा अमेरिकेच्या गुप्तहेर खात्यानं पुरवलेल्या माहितीशी साधर्म्य साधणारा आहे," असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

"ट्रंप हे योग्य निर्णय घेऊन अणू करारात राहतील अशी आशा मी बाळगतो," असं वक्तव्य इराणचे अणू ऊर्जा संस्थेचे प्रमुख अली अकबर सालेही यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)