किम जाँग-उन यांच्या दक्षिण कोरिया भेटीत काय होणार?

किम जाँग-उन आणि मून जे-इन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किम जाँग-उन आणि मून जे-इन

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन येत्या शुक्रवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांची भेट घेणार आहेत. 1953च्या कोरियन युद्धानंतर दोन कोरियांमधली सीमा ओलांडणारे किम हे पहिलेच नेते ठरतील.

नव्यानं मिळालेल्या माहितीनुसार, मून जे-इन हे किम जाँग-उन यांची स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता वैयक्तिक भेट घेणार असल्याचं दक्षिण कोरियानं जाहीर केलं आहे.

अनेक वर्षं सुरू असलेल्या तणावानंतर ही भेट अभूतपूर्व असेल. नुकतंच उत्तर कोरियानं अण्वस्त्र चाचण्या घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं. हाच मुद्दा या ऐतिहासिक चर्चेच्या केंद्रस्थानी असेल.

पण अण्वस्त्रांचा त्याग करण्यास प्याँगयाँगची समजूत घालणं थोडं अवघडच असेल, असा इशारा सेऊलनं दिला आहे. कारण दोन्ही देशात गेल्या वेळी चर्चा झाली तेव्हापासून आतापर्यंत आण्विक तंत्रज्ञानात प्रचंड विकास झाला आहे.

किम जोंग उन

फोटो स्रोत, Getty Images

"दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊन अण्वस्त्र न वापरण्याच्या निर्णयावर सहमती होणं, या चर्चेतला सगळ्यांत कठीण भाग असेल," असं दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते इम जोंग-स्योक यांनी म्हटलं आहे.

सन 2000 आणि 2007 मध्ये झालेल्या बैठकांनंतर उत्तर आणि दक्षिण कोरियादरम्यान होणारी ही पहिलीच सविस्तर स्वरुपाची बैठक आहे. दोन देशांदरम्यानचे संबंध सुरळीत झाल्याचा हा परिणाम आहे. या भेटीतूनच किम जाँग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीचा मार्ग खुला होण्याचीही शक्यता आहे.

तुर्तास, अण्वस्त्र चाचण्या करणार नसल्याचं किम यांनी मागच्या आठवड्यात जाहीर केलं होतं. या भूमिकेचं दक्षिण कोरियासह अमेरिकेनं स्वागत केलं होतं. मात्र उत्तर कोरियाच्या अशा भूमिकेनं फारसा फरक पडणार नाही, असं चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियातर्फे घेण्यात येणाऱ्या अण्वस्त्र चाचण्यांच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे हे ठिकाण बिनकामाचं झालं आहे.

1950-53 मध्ये झालेलं कोरियन युद्ध संपल्याची औपचारिक घोषणा या भेटीदरम्यान होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त आर्थिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

बैठक होत असताना दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या वार्षिक लष्करी कवायती एका दिवसापुरत्या स्थगित केल्या जातील.

कशी होईल बैठक

बैठकीच्या वेळापत्रकापासून भोजनाच्या तपशीलापर्यंत सगळ्या गोष्टी काटेकोरपणे ठरवण्यात आल्या आहेत. दक्षिण कोरियाचे मून जे-इन हे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्यासह नऊजणांच्या शिष्टमंडळाची काँक्रिट ब्लॉक येथे भेट घेतील. दोन्ही देशांना विभागणारी ही सीमारेषा आहे.

दक्षिण कोरियाचे सुरक्षारक्षक दोन्ही देशांच्या नेत्यांना घेऊन पॅनम्यूनजोम मधील एका दिमाखदार वास्तूच्या दिशेनं रवाना होतील. दोन्ही देशांचं सैन्य नसलेल्या तटस्थ भागात ही बैठक होईल.

किम जाँग उन आणि मून जे इन यांच्यातील बैठकीचं पहिलं सत्र संपल्यानंतर दोन्ही नेते स्वतंत्रपणे भोजन घेतील. उत्तर कोरियाचे शिष्टमंडळ सीमेपलीकडच्या आपल्या भागाकडे जाईल.

दुपारच्या सत्रात मून आणि किम दोन्ही देशातील माती आणि पाणी एकत्र करून पाइन वृक्षाचं रोपण करतील. हे झाड शांतता आणि सुबत्ता यांचं प्रतीक असेल. वृक्षारोपणानंतर चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दिवसअखेरीला बैठकीचा शेवट दोन्ही देशांदरम्यानच्या करारावरील स्वाक्षरीनं होईल. यावेळी दोन्ही देशांतर्फे संयुक्त निवेदन करण्यात येईल.

रात्रीचं भोजन दक्षिण कोरियाच्या हद्दीत आयोजन करण्यात आलं आहे. यासाठीच्या पदार्थांचा तपशील काळजीपूर्वक ठरवण्यात आला आहे. किम जाँग उन यांना स्विस पोटॅटो हा खास पदार्थ खिलवण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत असताना किम यांचा हा आवडीचा पदार्थ होता. याव्यतिरिक्त उत्तर कोरियाची ओळख असलेले कोल्ड नूडल्स आणि खास मद्यही मेजवानीचा भाग असेल.

'गोड'वाद!

डेझर्ट अर्थात जेवणानंतरच्या गोड पदार्थावरून वाद निर्माण झाला आहे.

कोरियन द्वीपसमूहाच्या नकाशावर 'मँगो म्यूझ' पाहुण्यांना दिलं जाणार आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया हे तिन्ही देश या प्रदेशावर दावेदारी सांगतात.

रात्रीच्या भोजनानंतर दोन्ही देशांचे शिष्टमंडळ स्प्रिंग ऑफ वन नावाचा व्हीडिओ पाहतील. त्यानंतर किम उत्तर कोरियाकडे रवाना होतील.

किम यांच्या शिष्टमंडळात त्यांची बहीण किम यो जाँग यांचाही समावेश असेल. यो जाँग यांनीच दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाच्या चमूचं प्रतिनिधित्व केलं होतं. उत्तर कोरियाचे नामधारी प्रमुख किम योंग नाम हेही शिष्टमंडळाचा भाग असतील.

शिष्टमंडळात कोण?

विशेष म्हणजे दोन्ही देशांचे उच्चपदस्थ लष्करी अधिकारी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांचाही शिष्टमंडळात समावेश करण्यात आला आहे. याआधीच्या बैठका केवळ राजकीय नेत्यांपुरत्या मर्यादित होत्या.

उत्तर कोरियाच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. नि:शस्त्रीकरणासंदर्भात त्यांची भूमिका गांभीर्याची आहे. शांतता प्रस्थापित होणं महत्वाचं आहे. उत्तर कोरियाकडून या प्रश्नावर सर्वसमावेशक विचार झाला असल्याचं स्पष्ट होतं आहे, असं दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांचे प्रवक्ते इम यांनी सांगितलं.

दक्षिण कोरियातर्फे मून यांच्यासह संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि एकत्रीकरण मंत्री यांचा सातजणांच्या शिष्टमंडळात समावेश आहे.

दक्षिण कोरियाशी चर्चेसाठी तयार असल्याचं किम यांनी जानेवारी महिन्यात म्हटलं होतं. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकाच झेंड्याखाली दोन्ही देशांच्या पथकानं संचालन केलं होतं.

किम यांच्या पुढाकारामुळे दक्षिण कोरियाच्या प्रशासनातील उच्चपदस्थ मंत्री तसेच अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी किम यांच्या पुढाकाराचं स्वागत केलं होतं.

हे पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : पण दक्षिण कोरियानं सीमेवर प्रचार भोंगे लावले तरी कशासाठी?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)