टोरंटो हल्ला : लैंगिक जीवनातल्या नैराश्यामुळे 10 जणांना केलं ठार?

कॅनडातील टोरंटो शहरात पांढऱ्या रंगाची भाड्याची व्हॅन पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसवून केलेल्या हल्ल्यात 10 जण ठार झाले होते. जी-7 मंत्र्यांच्या परिषदेच्या ठिकाणापासून 16 किलोमीटर अंतरावर भरदिवसा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 15 जण जखमी झाले होते.

या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितानं इन्सेल रेबेलियनचा उल्लेख केला होता.

हे इन्सेल आहे तरी काय?

अलेक मिनासिअन या 25 वर्षीय व्यक्तीला कोर्टात हजर करण्यात आलं. मिनासिअननं फेसबुकवर लिहिलेली पोस्ट त्याचीच असल्याचं फेसबुकनं स्पष्ट केलं.

'इन्सेल बंडखोरी पर्व सुरू झालं आहे. देखण्या स्त्री-पुरुषांना उडवून लावतो आता. सुप्रीम जंटलमन इलिएट रॉजरचा विजय असो', अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Incel हे 'involuntarily celibate चा शॉर्टफॉर्म आहे. लैंगिक संबंध ठेऊ न शकणाऱ्या पुरुषांच्या ऑनलाइन गटाला 'इन्सेल' असं म्हणतात.

ही मंडळी इन्सेल फोरमला वारंवार भेट देतात. लैंगिकदृष्ट्या आकर्षक पुरुषांना ते चॅड्स तर महिलांना स्टॅक्स म्हणतात. इन्सेल फोरमद्वारे ही मंडळी फेमिनिझम आणि महिलांना उद्देशून शेरेबाजी करतात.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात Reddit वेबसाईटनं आपल्या साईटवरील इन्सेल संदर्भातल्या मजकुरावर बंदी घातली होती. प्रक्षोभक भाषेमुळे हा मजकूर वगळण्यात आला होता. मंगळवारी रेडिटच्या आणखी एका सेक्शनमधला इन्सेल संदर्भातला मजकूर काढून टाकण्यात आला.

मात्र अजूनही इन्सेल संदर्भातला मजकूर असंख्य वेबसाईट्सवर उपलब्ध आहे.

2014 मध्ये कॅलिफोर्नियातल्या इस्ला व्हिस्तामध्ये सहाजणांचा बळी घेऊन आत्महत्या करणाऱ्या एलियट रॉजरची इन्सेल फोरमच्या माध्यमातून स्तुती करण्यात येते.

महिला आणि अल्पसंख्य यांच्यावर असलेला राग तसंच लैंगिक निराशा याबाबत रॉजरनं मरण्याआधी खरमरीत भाषेत निवेदन सादर केलं होतं.

हे वाचलंत का?