कॉमनवेल्थ गेम : भारत - पाकिस्तान हॉकी सामना बरोबरीत

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कॉमनवेल्थ गेम्समधील हॉकी सामना 2-2 बरोबरीत संपला. शेवटच्या क्षणापर्यंत भारताने पाकिस्तानवर 2-1 आघाडी घेतली होती, पण शेवटच्या काही सेकंदात पाकिस्तानने पेनल्टीवर 1 गोल करून बरोबरी साधली.

भारतीय संघाच्यावतीने 13 व्या मिनिटाला पहिला गोल दिलप्रीत सिंग याने केला. एस. वी. सुनील याने दिलेल्या एका सुरेख पासवर दिलप्रीतने गोल नोंदवला. त्यानंतरही भारताने आपली सामन्यावरील पकड कायम ठेवली.

19व्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीत याने पेनल्टी कॉर्नवर गोल नोंदवून भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

26व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली, पण गोलरक्षक श्रीजेश याने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत हा गोल रोखला.

38व्या मिनिटाल पाकिस्तानच्या संघाने आक्रमक खेळी केली. यात इरफान ज्युनिअरला मैदानी गोल करण्याची संधी मिळाली, त्याने ते व्यर्थ घालवली नाही. पाकिस्तानच्या या गोलनंतर सामच्या स्कोअर बोर्ड 2-1 असा झाला.

पण सामन्याचा सर्वांत रोमांचक क्षण शेवटच्या 5व्या सेकंदाला आला. पाकिस्तानला शेवटच्या क्षणी पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. पाकिस्ताने या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून 2-2 अशी बरोबरी साधली.

गोल्ड कोस्ट इथं असलेले बीबीसी प्रतिनिधी रेहान फझल सांगतात, "जवळपास 90 टक्के दर्शक भारताचे समर्थक होते. सामना जणू दिल्लीत होत आहे असं वातावरण होतं. भारताला यापेक्षा चांगली संधी मिळाली नसती. भारताने आघाडीही घेतली. पण 2 गोलच्या आघाडीनंतर भारतीय संघात ढिलाई आली आणि शेवटच्या क्षणी पाकिस्तानने बरोबरी साधली."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)