You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला-पुरूषांचं वेतन समान कसं करायचं? हे घ्या 9 उपाय
आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पण तरी त्यांच्या वेतनात तफावत आहे. ही परिस्थिती बदलावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.
अनेक संस्था या दिशेने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक कंपन्यांना यावर तोडगा कसा काढावा, हे अजूनही उमगलं नाही.
महिला आणि पुरुषांना समान वेतन मिळावं, यासाठी हे 9 मार्गं अवलंबता येऊ शकतात.
1. पाळणा घराची व्यवस्था
चांगल्या पगाराचा आणि नेतृत्वपातळीवरचा जॉब करताना वेगवेगळया ऑफीसमध्ये जास्त वेळ काम करावं लागतं. अनेकदा कामाच्या वेळाच ठरलेल्या नसतात. त्यामुळे महिला नाईलाजानं कमी पगाराचे आणि ठरलेल्या वेळाचे जॉब करणं पसंत करतात.
"पाळणाघराची व्यवस्था असेल तर महिलांना कामाकडे जास्त लक्ष देता येईल. पुढं प्रमोशन मिळून महिलांना चांगल्या पगाराचा जॉब मिळू शकतो," असं Equal Pay Portalच्या संस्थापक शीला वाईल्ड सांगतात.
2. उत्तम भरती प्रक्रिया
महिलांना हा जॉब साजेसा आहे, असं नोकरीच्या जाहिरातीत क्वचित सांगितलं जातं. उदाहरणार्थ, केवळ 10% नोकरीच्या जाहिराती या महिलांच्या गरजा लक्षात घेतात.
नोकरीच्या जाहिराती या अजून चांगल्याप्रकारे लिहील्या जाऊ शकतात, असं Chartered Institute of Personnel and Development (CIPD)चे मुख्य कार्यकारी अधिकारी पिटर चीज यांचं म्हणणं आहे.
ते पुढं सांगतात, "अनावधानानं जाहिरातीमध्ये असे शब्द वापरले जातात ज्यामुळे महिलांना हा जॉब पुरुषांसाठीच आहे, असा भास होतो."
3. वेतनामध्ये पारदर्शकता
स्त्री-पुरुष यांच्या वेतनातील असमानता उघडकीस आणणं ही सर्वांत पहिली गरज आहे. आपल्याबरोबर काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्याला जास्त पगार मिळतो, हे बहुतेक महिलांना माहितच नसतं.
ऑगस्ट 2016 पासून अमेरिकेतल्या मॅसच्युसेट्स राज्यात काही पावलं उचलली आहेत. आधीच्या कंपनीत किती पगार होता, याची माहिती त्यांना आता देण्याची गरज नाही.
पण आधीच्या पगाराच्या आधारावरच दुसरी कंपनी महिलांचा पगार वाढवते, याबद्दल थोडी माहिती पुढं आली आहे.
4. बाळांच्या संगोपनाची सुट्टी (Maternity and Paternity Leave)
बाळंतपणासाठी आणि त्यानंतर बाळाची काळजी घेण्यासाठी महिलांना सट्टी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांचा पगार वाढण्यात अडचणी येतात, असं CIPDच्या सल्लागार चार्ल्स कॉट्टन यांचं मत आहे.
बहुतेक कंपन्या पुरुषांना बाळाचं संगोपन करण्यासाठी सुट्टी देत नाहीत. तसंच ही paternity leave घेतली तर कंपनी आपल्याकडे वेगळ्या नजरेनं पाहू शकते, किंवा आपल्या प्रमोशनमध्ये अडचणी येऊ शकतात, अशा भीतीनेही पुरुष सुट्ट्या घेत नाहीत.
कंपन्यांनीही बाळाचं संगोपन करण्यासाठी पुरुषांना सुट्टी घेण्यास प्रोत्साहित करावं, असं CIPD ला वाटतं. किंवा 'सुट्या वापरा किंवा विसरून जा' सारखी धोरणं कंपन्यांनी राबवावी, जेणेकरून पुरुष paternity leave म्हणून दोन-तीन महिन्यांची पगारी सुट्टी घेतील.
कॉट्टन सांगतात की त्यांना सांगायला पाहीजे की अशी संधी पुन्हा मिळणार नाही.
5. महिला कर्मचाऱ्यांची संख्या
काही कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचं लक्ष ठेवलं आहे. बीबीसीनेही निर्धार केला आहे की एप्रिल 2019 पर्यंत त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग 50 टक्के असेल.
महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं सर्वच ठिकाणी शक्य नाही, असं Women on Boards UKच्या मॅनेजिंग डिरेक्टर फिओना हॉथोर्न यांना वाटतं. कंपनीला इंजिनिअरची भरती करायची असेल तर मार्केटमध्ये पदवीधर महिला इंजिनिअर्स मिळणं एखाद वेळला कठीण आहे.
"नेतृत्व पातळीवर महिलांना नियुक्त करणं शक्य आहे. पण त्यांचे टार्गेट्स त्यांना अशक्यप्राय नसावेत, तसंच याचीही काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या टार्गेट्सने पुरुषांच्या संधी डावलल्या जात नाहीयेत," असं त्या पुढं म्हणाल्या.
या ऐवजी आपण महिलांची संख्या वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधायला पाहिजेत, असं हॉथोर्न यांना वाटतं.
आणि जरी अनेक महिला लीडरशिप पोझिशनमध्ये नसतील, तरी निदान त्या त्या पदांसाठी मुलाखत देत आहेत, हीसुद्धा एका प्रकारे प्रगतीच म्हणावी लागेल.
6. महिलांना अधिक पगार
मुद्दा हा नाहीये की महिलांना पगार कमी मिळतोय. तर समान काम करणाऱ्या महिलेला तिच्या पुरुष सहकाऱ्यापेक्षा कमी पगार देणं हा मुद्दा आहे.
तसंच प्रमोशन, कायमस्वरूपी नोकरी आणि महिलांच्या महत्त्वाकांक्षा, हे खरे मुद्दे आहेत.
7. उत्तम प्रशिक्षण
तज्ज्ञ सांगतात की कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये महिलांबद्दल अनावधानाने दुजाभाव असतो, जो योग्य प्रशिक्षणाने नकोसा केला जाऊ शकतो. महिलांना प्रमोशन मिळण्यासाठी वरिष्ठांनीही त्यांना योग्यरीत्या विशेष प्रोत्साहन द्यायला हवं.
"अनेकदा पुरुष कर्मचारी त्यांची पूर्ण तयारी नसतानाही एखाद्या मोठ्या पदासाठी अर्ज करतात. दुसरीकडे महिलांकडे योग्यता असूनही त्यांना वाटतं की त्या तयार नाही आहेत, आणि त्याच पदासाठी अर्ज करण्यास कचरतात," असं CIPDचे पीटर चीज सांगतात.
मॅनेजर पातळीवरच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
8 ऑफीसमधलं वातावरण
CIPD नुसार, ऑफिसमध्ये खेळीमेळीचं वातावरण राहावं यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करायला हवेत. या विषयावर कंपनीच्या नेतृत्वाने वेळेवर लक्ष घालायला पाहिजे, असं चीज यांना वाटतं.
"पगारातल्या तफावतीबद्दल आपल्या बॉसेसचं काय म्हणणं आहे? ते या प्रश्नापासून पळ काढू पाहत आहे का?" असे सारे प्रश्न ते विचारायला भाग पाडतात.
महिलांना कमी वेतन मिळत असेल तर त्यावर उपाय शोधायला पाहिजेत, असं ते सांगतात.
9. खेळ
मुलींना लहानपणी खेळायला प्रोत्साहित केलं तर त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो.
"मुला-मुलींना वयाच्या 12व्या वर्षापर्यंत एकत्र फुटबॉल खेळू द्यावं. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या मुलींना ऑफिसमधले पुरुष नेतृत्वासाठी अधिक सक्षम मानतात," असं चीझ सांगतात.
खेळल्यामुळे मुलींना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अधिक विश्वास वाटतो, असं लक्षात येतं.
"मुलींना वयाच्या चार वर्षांपर्यंत आपण काहीही करू शकतो, असं वाटत असतं. सहा वर्षांनंतर त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि 12 व्या वर्षापर्यंत त्या मुलांइतक्याच ताकदवान असतात, म्हणून त्यांना एकत्र खेळ खेळू दिलं पाहीजे," असं त्या पुढं सांगतात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)