या एअर हॉस्टेसना त्यांचा ड्रेसकोड झालाय नकोसा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, कॅरोलिन बुलक
- Role, बीबीसी कॅपिटल
एअर होस्टेसचं काम ग्लॅमरस समजलं जातं. पण प्रत्यक्षात त्यांचं आयुष्य तसं नसतं. नेहमी सर्वांशी हसतमुखाने संवाद साधणं, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीचा दबाव, प्रवाशांचा त्रास, अशा कितीतरी समस्यांचा एअर होस्टेसना सामना करावा लागतो. त्यातच भर पडते ती ड्रेसकोडच्या सक्तीची.
प्रत्येक एअरलाईन कंपनीचा आपला एक वेगळा गणवेश असतो. पण आता वेगवेगळ्या विमान कंपन्यांमधल्या एअर होस्टेसनी त्यांचे अनुभव सांगताना त्यांच्या अडचणींचा पाढाच वाचला आहे. म्हणून ड्रेसकोडसाठीचे नियम शिथिल करावे, अशी मागणी एअर होस्टेसकडून जोर धरत आहे.
माजी फ्लाईट अटेंडन्ट जेड यांच्यापुढे, लांब पल्ल्याच्या विमान उड्डाणात एका वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी आजारी प्रवाशाला मदत करण्यापलीकडे एक वेगळीच समस्या उभी राहिली.
आहे त्या स्थितीत गुडघ्यांवर ओणवं होऊन आजारी प्रवाशाच्या छातीवर दाब देण्याचं काम त्यांना करायचं होतं. हे काम त्यांना अंगावरच्या स्कर्टच्या बंधनासह करावं लागलं. संपूर्ण नाव त्या सांगत नाहीत कारण त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य अजूनही 'व्हर्जिन अॅटलांटिक' या एअरलाईनसाठी काम करतो.
"आमचं सीपीआर (कार्डिओपल्मनरी रिससिटेशन) प्रशिक्षण जमिनीवर, ट्राऊझर सूटमध्ये झालं. मात्र हवेत असताना लाल लिपस्टिक आणि नेल वॉर्निश, अधिक घट्ट आणि लाल रंगाचा पेन्सील स्कर्ट असा पोशाख असतो. अशा पोशाखामुळे आणीबाणीच्या प्रसंगी प्रवाशांना मदत करणं अधिक अवघड होईल, याची मला चिंता होती. तर दुसरीकडे देहप्रदर्शनाचीही चिंता असायची. दडपणाच्या स्थितीत यामुळे काळजीत अधिकच भर पडायची," असं त्या सांगतात.
आपला जॉब करताना व्यावहारिक बाबींचा सामना कंपनीच्या सार्वजनिक प्रतिमेशी निगडित अशा कठोर ड्रेस कोडच्या आवश्यकतेशी कसा होतो याचं जेड यांच्यासाठी हे फक्त एक उदाहरण होतं.
२०१७मध्ये काही प्रकरणं घडल्यानंतर विमान कंपन्यांमधला लिंगभेदाचा मुद्दा अजेंड्यावर उसळून आला. तरीही असं दिसतं की ऐन हवेत असताना जे घडते, ते अजूनही पुढे येत नाही. उदाहरणार्थ ड्रेस कोडचा आग्रह हा लिंगाधारित साचेबद्धता जपतो. काही एअरलाईन कर्मचाऱ्यांना हे कालबाह्य वाटत असलं तरी ते टिकून आहे.
बीबीसी कॅपिटलला इमेलनं पाठवलेल्या निवेदनात 'व्हर्जिन अॅटलांटिक'चे एक प्रवक्ते म्हणतात, "एअरलाईनचा 'आयकॉनिक' गणवेष हा आरामदायकता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विस्तृत चाचण्यांमधून गेला आहे आणि महिला क्रू सदस्य त्यांना वाटल्यास ट्राऊझर्स परिधान करू शकतात."
कसे करावे काम?
चकचकीतपणा आणि ग्लॅमरच्या प्रतिमेखाली कामासोबतच केबीन क्रूला व्हेरिकोज व्हेन ते झोपेचा अभाव अशा शारीरिक आरोग्याच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. काही फ्लाईट अटेंडन्ट सांगतात की त्यांच्या गणवेषाच्या गरजांमुळे या समस्यांत भरच पडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटीश एअरवेजमधील माजी अटेंडन्ट मेल कॉलिन्स यांच्याकरता पायावर फोड येणे आणि उड्डाणाच्या कालावधीत तीव्र पाठदुखी नेहमीचं झालं होतं.
लांब पल्ल्याच्या १० तासांच्या एखाद्या उड्डाणात, त्यांच्या स्वतःच्या पेडोमीटरवरील नोंदीनुसार त्या जवळपास सात मैल चालत असत, तेही मध्यम उंचीचे हील्स घालून. परिणामी पाय सुजणे आणि वेदनादायी ब्लिस्टर्स सहन करावे लागत होते.
जवळपास ११ क्रू सदस्यांचं नेतृत्व असलेल्या वरिष्ठपदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पर्यायी पादत्राणे वापरण्याची मुभा मागितली. "त्यांनी मला फ्लॅट शू वापरायला मान्यता दिली, ज्यामुळे माझ्या आरामात खूप मोठा फरक पडला," असं त्या सांगतात.
ब्रिटिश एअरवेजची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
या समस्या आणि आव्हानं कुठल्याही एका विमानसेवेशी संबंधित नाहीत. बीबीसी कॅपिटलनं वेगवेगळ्या विमान सेवांसाठी काम केलेल्या काही महिलांशी संवाद साधला. त्यांनी दररोजच्या लिंगभेदाबद्दल सांगितलं. त्यांच्या बुद्धिमत्तेवर मारलेल्या टोमण्यांपासून काहीवेळा प्रवाशांकडून मारल्या जाणाऱ्या धक्क्याबाबातही सांगितलं.
"एक पुरुष मला म्हणाला की मी सुंदर दिसते. परंतु दुसरं ड्रिंक अपेक्षेप्रमाणे चटकन न आणल्यानं तो संतुष्ट नव्हता," असं जेड सांगतात.
"जर आम्ही बाहुलीसारख्याच दिसत असू तर वेळ पडली तर आम्ही त्यांच्या मदतीला धावून जाऊ शकतो अशी अपेक्षा प्रवाशांनी कशी काय करावी," असा प्रश्न त्यांना पडतो.
बीबीसी कॅपिटलला ई-मेलवर पाठवलेल्या निवेदनात व्हर्जिन अॅटलांटिकचे प्रवक्ते म्हणतात, "त्यांची एअरलाईन केबिन क्रू सोबत आक्षेपार्ह वर्तन सहन करत नाही आणि विमानात घडणाऱ्या कुठल्याही घटनेची माहिती व्यवस्थापकांना देण्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केलं जातं."
एका प्रवाशाला ड्रिंक सर्व्ह करताना त्यानं तरुण आणि ग्लॅमरस असलेल्या एअर होस्टेस कुठे गेल्या अशी विचारणा केल्याची एक आठवण मेल सांगतात.
वीकएंड साजरा करायला निघालेल्या बेधुंद टोळक्यांपेक्षाही बिझिनेसमनकडून सामान्यतः हे घडतं, असं त्या सांगतात.
कामाचा भाग
द एअर लॉ फर्मच्या एव्हिएशन सल्लागार पॅम चेंबर्स यांना विमानाच्या केबिन्समधला लिंगभेद नजिकच्या काळात संपेल असे वाटत नाही.
प्रस्थानांची वेळ पाळणं आणि कामगिरीच्या डेडलाईन्सच्या वाढत्या दडपणापुढे, प्रवाशांच्या आक्षेपार्ह वर्तनावर बॉसकडे भूमिका मांडणारे किंवा काही प्रकरण करणारे कर्मचारी दुर्लक्षिले जातात असं त्यांना वाटतं.

"खालच्या दर्जाची वक्तव्य, अपमान, अश्लिल शेरेबाजी या सगळ्याकडे जॉबचा एक भाग म्हणूनच पाहिलं जातं. ग्राहकांना तोंड द्यावं लागणाऱ्या कुठल्याही जॉबमध्ये हे घडतं अशीच वरिष्ठ व्यवस्थापनाची भूमिका असते. फ्लाईट अटेंडन्टनेच अशी परिस्थिती हाताळावी आणि शक्य तोवर प्रकरण वाढण्याआधी थांबवण्यावरच भर द्यावा अशी व्यवस्थापनाची भूमिका असते," असे चेंबर्स म्हणतात.
'एअर लिंगस' या आयरिश विमान कंपनीत पाच वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या आणि आता त्यांचे अनुभव लिहिणाऱ्या माजी फ्लाईट अटेंडन्ट मेरिसा मॅकल यांनाही हे मान्य आहे.
मात्र, एका उड्डाणादरम्यान आपल्या पार्श्वभागावर चापट मारणाऱ्या एका प्रवाशाला उतरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्या काळी (२००० ते २००९ दरम्यान ) अशा वर्तनावर कुणी कृती केल्याचं ऐकलं नव्हतं, त्यांच्या त्या पवित्र्यानं त्यांना एका प्रमोशनला मुकावं लागलं, असे त्या म्हणतात.
"मी उगाच प्रतिक्रिया देतं आहे आणि प्रकरण ताणलं जात आहे याची जाणीव मला करून देण्यात आली. मात्र मी बऱ्यापैकी कणखर आणि निर्भीड आहे," असं त्या सांगतात. या घटनेच्या वेळी त्या २२ वर्षांच्या होत्या.
"कुणीही स्पर्श केला तर गप्प बसणारी मी नव्हते, म्हणून खर्च आणि लागणाऱ्या वेळेची पर्वा न करता विमानतळ पोलिसांना बोलावण्याचा मी आग्रह धरला," असे मॅकल म्हणतात.
चेंबर्स सांगतात की गंभीर गुन्हेगारी वर्तनाच्या प्रकरणात एखादं उड्डाण थांबवलं जाऊ शकतं आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवणं आवश्यक ठरतं. विलंब आणि औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठीची अंतर्गत प्रक्रिया यामुळे लोक बोलणं टाळतात. मात्र, ड्रेस कोडबद्दल केबिन क्रू बोलू लागले आहेत.
कामकाजाच्या ठिकाणी ड्रेस कोड आणि कर्मचाऱ्यांचं दिसणं यावर लंडनच्या किंग्ज कॉलेजनं अकॅस (अॅडव्हायजरी, कन्सिलिएशन अॅन्ड अॅर्बिट्रेशन सर्व्हिस) साठी एक संशोधन केलं आहे. त्यात केबिन क्रूनं दिलेली माहितीही समाविष्ट आहे.
ड्रेस कोडबद्दल थोड्या लवचिक धोरणाची कर्मचाऱ्यांना अपेक्षा असते असं या संशोधनातून दिसून आलं आहे. हे विमान कंपन्यांच्या काटेकोर मानकांच्या विरोधात आहे. तसंच कर्मचाऱ्यांचं दिसणं आणि ड्रेस कोडपलीकडे बाह्यरूप व्यवस्थापनाबाबत त्यांच्या मतांच्याही विरोधात असल्याचं या अहवालात नमूद आहे.
एक्सपर्ट एचआर यांनी २०१५मध्ये ड्रेसकोडबाबत तयार केलेल्या अहवालात असं दिसून आलं आहे की सर्वेक्षण केलेल्या संस्थांपैकी निम्म्या संस्थाना कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या ड्रेस कोडबाबत तक्रारी आल्या होत्या.
हिल्स न घातल्यामुळे एका रिसेप्शनिस्टला घरी पाठवण्यासारख्या अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांनंतर, यापुढे विमान उद्योगातल्या ड्रेस कोडपुढे मोठी आव्हानं उभी राहतील, असं एचआर एक्सपर्ट्सना वाटतं.

फोटो स्रोत, Marisa Mackle
" महिलांसाठीचे विशेष ड्रेस कोड हे कामकाजाच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांकडे कसं पाहिलं जातं याबद्दल संदेश देतात, जी त्यांच्या जॉबची गरज क्वचितच असते," असं व्यवसायिक मानोविकारतज्ज्ञ आणि लीड्स युनिव्हर्सिटी बिझिनेस स्कूलच्या प्राध्यापक बीन्ना कॅन्डोला म्हणतात.
"अंगप्रदर्शन करणारे गणवेष काही ग्राहकांना गैरवर्तनासाठी उत्तेजित करतात. ग्राहकांची अशी सबब आपण स्वीकारू नये," असं कॅन्डोला यांचं म्हणणं आहे.
रोजगार कायदेविषयक कंपनी इएलएएस ग्रूपशी संलग्न सल्लागार एम्मा ओ'लिअरी यांना हे मान्य आहे. हाय हिल्स परिधान करण्याच्या प्रकरणात एका केबिन क्रू सदस्याला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्या म्हणतात की, विशेष करून पादत्राणे आणि मेकअपविरोधी दाव्यांमध्ये होणारी वाढ टाळायची असेल तर विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या धोरणांचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे.
"महिला एका विशिष्ट स्वरूपात दिसल्या पाहिजेत आणि पुरुष दुसऱ्या, असा एअरलाइन्सचा साचेबद्ध दृष्टीकोन असतो. पण हे सगळे खूप जुन्या वळणाचं आहे. आम्ही १९५०च्या काळातल्या सेक्रेटरी नाही आहोत," असे ओ'लिअरी म्हणतात.
"होय, जनतेपुढे आणि प्रवाशांपुढे तुम्हाला चांगली प्रतिमा दाखवणं आवश्यक आहे, पण ते अडचणीच्या ठरणाऱ्या विशिष्ट कपड्यांशिवायही स्मार्टपणे करता येतं," असं त्या म्हणतात.
चिमुकली पावलं
मात्र आता बदलांच्या काही खुणा दिसू लागल्या आहेत. उदाहरणार्थ ब्रिटीश एअरवेजचे संमिश्र उड्डाणासाठीचे केबिन क्रू आता ट्राऊझर्स परिधान करण्याचा पर्याय वापरू शकतात. फक्त स्कर्ट असलेल्या ड्रेस कोडला कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या आव्हान दिल्यानंतर हा बदल घडला आहे.

फोटो स्रोत, Emma O'Leary
विमानकंपनी एअर लिंगसची एक प्रवासी असलेल्या मॅकल यांनी केबिन क्रूच्या शारीरिक आकारातल्या बदलाचं स्वागत केलं आहे. त्या आणि त्यांचे सहकर्मचारी विपरित परिणामांच्या भीतीमुळे यूके साईज १० वर क्वचितच जात होते. जेमतेम दशकापूर्वीच्या स्थितीत आता लक्षणीय फेरबदल झाला आहे.
मोठ्या साईजच्या गणवेषाची विनंती करताना सुपरवायझर्सकडून अपमान होण्याचा धोका होता, तोच वजन वाढण्यापासून रोखत होता, याची आठवण मॅकल यांना येते.
"(ड्रिंक्सची) ढकलगाडी आणि प्रवाशांचं आसन यामधल्या जागेतून, गाडी न हलविता स्वतःला पलीकडे काढता आलं तर आपले वजन काटेकोर आहे याची मला खात्री वाटायची," असे त्या म्हणतात.
"मला त्याची सतत काळजी असायची. अशा मीटिंगनंतर मुली खूपच निराश असायच्या आणि विमानात त्यांची चर्चा असायची. आता थोड्या स्थूल अटेन्डन्ट दिसतात ज्यांच्या बहुधा मुलाखतीही झालेल्या नसाव्यात, तर या दृष्टिकोनातून काही गोष्टी नक्कीच बदलल्या आहेत," असं त्या सांगतात.
मात्र विमानसेवा उद्योगानं अजून मोठा पल्ला गाठायचा आहे हे स्पष्टच आहे. अंगप्रदर्शन करणारे गणवेष आणि लिंगभेदाला उत्तेजन देणाऱ्या साचेबद्ध ड्रेस कोडविरोधात शक्ती एकवटत आहे, तसं कर्मचाऱ्यांना अधिक प्रमाणात त्यांचं म्हणण मांडता येत आहे.
विमानसेवा कंपन्यांना हे मान्य करावं लागेल आणि त्यानुसार प्रतिसाद द्यावा लागेल, अन्यथा कधी तरी तीव्र क्षोभाला तोंड द्यावं लागेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








