इवांका ट्रंपबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

इवांका ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हाईट हाऊसमध्ये इवांका ट्रंप महत्वाची भूमिका बजावत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कन्या इवांका आज भारत दौऱ्यावर आहे. इवांका ट्रंप यांनी सध्या व्हाईट हाऊसमधील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख निर्माण केली आहे.

इवांका ट्रंप यांचं राजकीय वजन वाढण्याचं कारण काय हे समजून घेण्यासाठी त्यांचा व्हाईट हाऊसपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घ्यावा लागेल.

35 वर्षीय इवांका तीन मुलांची आई आहे. त्या आणि पती जारेड कुश्नर यांनी ट्रंप प्रशासनामध्ये सुरुवातीच्या काळापासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

G-20 महिला शिखर परिषदेत इवांका जर्मन चॅन्सेलर अँगेला मर्केल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख ख्रिस्तीना लगार्ड यांच्या बरोबर सहभाग घेतला. त्या वेळी इवांका ट्रंप या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीच्या वेळीही इवांका उपस्थित राहिल्या.

इवांका यांचे दोन भाऊ डोनाल्ड ट्रंप ज्युनिअर आणि एरिक ट्रंप हे फॅमिली बिझनेस सांभाळतात. इवांकाने मात्र वडिलांबरोबर वॉशिंगटनमध्ये राहून वडिलांची मदत करण्याचं ठरवलं.

लहानपणापासूनच प्रकाशझोतात

इवांकाचा जन्म 1981 साली न्यूयॉर्कमध्ये झाला. डोनाल्ड ट्रंप यांची पहिली पत्नी चेक मॉडेल इवाना यांचं हे पहिलं अपत्य.

इवांका 10 वर्षांची असताना आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ती सतत प्रकाशझोतात राहिली.

डोनाल्ड ट्रंप आणि इवांका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इवांका या डोनाल्ड ट्रंप याच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे.

1997 मध्ये इवांका यांनी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी इवांकाचे फोटो तब्बल 17 मासिकांत झळकले. फॅशन जगतातील वर्साचे, मार्क बावर सारख्या मोठ्या ब्रॅण्डच्या फॅशन शोमध्ये त्यांनी भाग घेतला.

त्यांनी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये दोन पुढचं वर्षं शिक्षण घेतलं आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानिया मधून 2004 मध्ये उच्चशिक्षण पूर्ण केलं.

न्यूयॉर्कमधल्या प्रस्थापित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा जारेड कुश्नर यांच्याशी इवांका यांनी 2009 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी ज्यू धर्म स्वीकारला.

त्यांना तीन मुलं आहेत - आराबेला, जोसेफ आणि थिओडोर.

फॅमिली बिझनेस

डोनाल्ड ट्रंप यांनी फॅमिली बिझनेसमध्ये मुलीला आपल्या बायकोपेक्षाही जास्त अधिकार दिले. ट्रंप यांच्या कारभारातील काही महत्त्वाचे निर्णय इवांकाने यांनी घेतले.

अमेरिकेबाहेर 'ट्रंप हॉटेल'चा विस्तार आणि हॉटेलच्या इंटेरिअर डिझाइनमध्ये मदत केली. तसंच ट्रंप यांच्या आंतराष्ट्रीय संपत्तीवरही लक्ष ठेवलं, अशी माहिती ट्रंप यांच्या वेबसाईटवर दिली आहे.

इवांका यांनी स्वतःच्या नावाची 'फॅशन लाइन' सुरू केली. परंतु ट्रंप यांच्या निवडणुकीनंतर या ब्रँडवर अमेरिकेतल्या अनेक रिटेल चेन्सनी या ब्रॅण्डवर बहिष्कार टाकला. त्यामुळे त्यांच्या फॅशन बिझनेसला धक्का बसला.

दरम्यान, कंपनी प्रमुखांच्या म्हणण्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या व्यवसायात वाढ झाली आहे.

इवांका ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

इवांका यांनी आतापर्यंत दोन पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी 'द ट्रंप कार्ड' हे 2009मध्ये प्रकाशित झालं तर, 'वुमेन हू वर्क' : रिरायटिंग रूल्स ऑफ सक्सेस' प्रकाशित होणार आहे.

ट्रंप यांच्या 'द अॅप्रेन्टिस' या रिअॅलिटी टेलेव्हिजन शो'मध्ये इवांका यांनी वकिलाची भूमिका केली होती. सध्या ट्रंप ऑर्गनायझेशन मधून त्या पायउतार झाल्या असल्या तरी त्यांचा पगार चालू आहे.

व्हाइट हाउसमध्ये आल्यापासून स्वत:च्या फॅशन कंपनीचं कामकाजही त्यांनी त्याच्या प्रमुखाकडं सोपवलं आहेत. फॅशन कंपनीची संपत्तीही ट्रस्टकडे देखभालीसाठी देण्यात आली आहे.

दरम्यान नैतिकतेच्या मुद्दयावरून काही तज्ज्ञांनी इवांकावर आक्षेप घेतला आहे. व्हाइट हाऊसमधील त्यांच्या पदावर आणि भूमिकेवर हितसंबंधात अडकलेलं पद म्हणून टीका केली जाते.

विश्वसनीय सल्लागार

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अति-महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक आणि जागतिक नेत्यांबरोबरच्या भेटीत इवांकाचा सहभाग हल्ली वाढला आहे. आता भारतभेटीच्या निमित्तानेही याची चर्चा आहे.

व्हाईट हाऊसमध्ये बिन पगारी 'स्पेशल असिस्टंट' म्हणून रुजू होण्यापूर्वीच त्यांना अलिशान वेस्ट विंगमध्ये ऑफीस देण्यात आलं होतं.

जानेवारीमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या अगोदर CBSला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या ट्रंप प्रशासनात सामील होणार नसून फक्त ट्रंप यांची मुलगी म्हणून राहणार असल्याचं सांगितलं होतं.

परंतु इवांका आणि त्यांचे पती हे अध्यक्षांचे विश्वसनीय सहकारी म्हणूनच ओळखले जातात.

डोनाल्ड ट्रंप आणि इवांका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रंप यांनी इवांका ही त्यांची विश्वसनिय सल्लागार असल्याच खूप वेळा सांगितलं आहे

इवांकांचे पती कुश्नर यांच्याकडे मध्य-पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याची कामगिरी दिली आहे. तसंच 'क्रिमिनल जस्टिस सिस्टिम' सुधारण्याची जबाबदारीही दिली आहे.

ट्रंप यांच्या निवडणुकिदरम्यान इवांका यांनी महिलांबरोबर काम केल होतं. सध्या त्यांना स्त्रियांना समान पगार आणि प्रसूती दरम्यान पगारी रजा या मुद्द्यांवर काम करायचं आहे.

डोनाल्ड ट्रंप यांनी स्त्रियांसंदर्भात विशेषत: निवडणुकीदरम्यान केलेल्या विधानाचं इवांका यांनी समर्थन केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.

परंतु CBSला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मी वडिलांशी कुठपर्यंत सहमत आहे आणि कुठे नाही, हे त्यांना (ट्रंप) माहीत आहे". इवांका ट्रंप यांचा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कारभारातला वाढता सहभाग अनेक वेळा चर्चेचा विषय झाला आहे, पण व्हाईट हाऊसमधलं एक प्रभावी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख कायम आहे. इवांका यांच्या भारत दौऱ्याकडे म्हणूनच अनेकांचं लक्ष आहे.

आणखी वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)