श्रीलंकेत आणीबाणी मागे; बौद्ध आणि मुस्लिमांतील तणाव निवळला

श्रीलंकेत मुस्लीम समाजाच्या विरोधात भडकलेल्या हिंसाचारानंतर 6 मार्च रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. ती आता मागे घेण्यात आली आहे.

कॅंडीमध्ये झालेल्या दंगलीमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. तसेच, मुस्लिमांची सुमारे 450 घरे आणि दुकानं जाळण्यात आली होती. याच काळात 60 वाहनंही जाळण्यात आली.

तणाव कमी करण्यासाठी सोशल मीडियावरही बंदी घालण्यात आली होती.

बौद्ध बहुसंख्य असलेल्या या देशात 2012मध्ये हिंसेला सुरुवात झाली होती. बौद्धांमधील कट्टर समूहांनी या हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप केला जातो.

मुस्लीम लोक बौद्धांचं सक्तीनं धर्मांतर करत असून बौद्धांच्या ऐतिहासिक वास्तूंची नासधूस करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातो. त्यातूनच अनेक मुस्लीम धर्मस्थळांवरही हल्ला करण्यात आला.

शेकडो लोक अटकेत

पोलिसांनी आतापर्यंत 300 लोकांना अटक केली आहे. त्यांच्यातला एक संशयित हा कट्टर बौद्ध संघटनेचा नेता आहे.

आणीबाणीच्या काळात श्रीलंका सरकारला कोणाही संशयिताला अटक करुन कोठडीत डांबण्याचे अधिकार मिळाले होते. कँडीमध्ये हजारो सैनिक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

काही संघटनांनी या संचारबंदीच्या विरोधात निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अश्रूधूर सोडण्यात आला.

राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी ट्वीट करून आणीबाणी मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

फेसबुकसह इतर सोशल मीडिया वेबसाइटवर लावण्यात आलेले निर्बंधही त्यामुळे दूर झाले आहे.

सात वर्षांत प्रथमच आणीबाणी लागू करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)