सीरिया उद्ध्वस्त होणार असल्याची भविष्यवाणी हजारो वर्षांपूर्वीची?

    • Author, आंद्रे बर्नारडो
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, रिओ दी जनेरिओ

इसवी सनपूर्व 687च्या सुमारास जेव्हा ज्यू धर्मीय प्रेषित इसाया यांनी आपला ग्रंथ लिहायला सुरूवात केली असेल तेव्हा कदाचीत त्यांना याची कल्पनाही नसेल की, 28 शतकांनंतर सोशल मीडियामध्ये हा ग्रंथ वादविवादाच्या केंद्रस्थानी राहील.

अलिकडेच ब्राझीलच्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या पोस्टनुसार ज्यू प्रेषितांनी इ.स.पूर्व सातव्या शतकात इस्राईलशी संबधित एक महत्त्वपूर्ण भविष्यवाणी केली होती. सीरियात गृहयुद्ध भडकेल असं त्यात स्पष्ट सांगितलेलं होत.

योग्य शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास प्रेषित इसाया यांनी भविष्यवाणी केली होती की, दमास्कस शहर जमीनदोस्त होईल.

बायबलच्या जुन्या करारात इसाया वचनात म्हटलं आहे की, "दमास्कस हे तेव्हा शहर नाही राहणार, त्याच रुपांतर हे ढिगाऱ्यात झालेले असेल."

सोशल मीडियावर शेअर करण्यात येणाऱ्या पोस्टमध्ये येरमियाचा पण उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार, "शक्तिहीन झालेलं दमास्कस वाचण्यासाठी धडपड करत आहे. ते घाबरलेलं आहे. ते त्रासात आहे नेमका तसंच जसं बाळाला जन्म देणारी एक महिला."

खरंच असं होऊ शकतं का, हजारो वर्षाँपूर्वी इसाया आणि येरमियाच्या भविष्यवाणी आता सत्यात येत आहेत? किंवा ज्या लोकांना पवित्र ग्रंथांविषयी माहिती नाही आणि ते धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेला खरं ठरवण्यासाठी या धर्मग्रंथांचा चुकीचा उपयोग करत आहेत.

रिओ दी जनेरिओच्या पाँटिफिशिल कॅथॉलिक युनिव्हर्सिटीतले धर्मशास्त्राचे प्राध्यापक फ्रेर इजीडोरो माजोरोलो म्हणतात, "प्रेषित इसाया यांनी केलेल्या भविष्यवाणीच्या कारणांमुळे सीरियामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून या नरसंहारामागे तेच आहेत, असं जर मी म्हटलं तर याचा अर्थ असा होईल की मी सांगतोय की ही स्थिती बदलण्यासाठी मी काहीच करू शकत नाही कारण ती तर प्रभूचीच इच्छा आहे."

साओ पावलोच्या एंजेलिकन डायोसीसच्या होली ट्रिनिटी कॅथॉलिक चर्चचे धर्मगुरू आर्थ नासिमेंटो म्हणतात, "आम्ही आपल्या जबाबदाऱ्या देवावर नाही ढकलू शकत. सीरियात सुरू असलेल्या संघर्षाला संपवण्यासाठी मार्ग शोधण्याचं काम हे आमचं आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचं आहे."

ते म्हणतात की पवित्र ग्रंथात लिहण्यात आलेल्या गोष्टींचा अर्थ काढताना सावधानता बाळगायला पाहिजे. "इतिहासाचा आधार घेऊन बायबल लिहण्यात आलं होतं. बायबलमध्ये लिहण्यात आलेल्या शब्दांचे अर्थ वेगळे करून त्याकडे बघणं अतिशय धोकादायक आहे."

नासिमेंटो म्हणतात, "असं केल्यास तुम्ही या पवित्र ग्रथांचा आधार घेऊन वांशिक आणि LGBT समुदायाबाबात असलेल्या भेदभावला पण खरं ठरवायला सुरू कराल."

प्रेषितांची भूमिका

लोकप्रिय धारणेच्या विपरीत प्रेषित ते नसतात जे भविष्यवाणी करतात किंवा भविष्य पाहतात. प्रेषित ते असतात जे वर्तमान परिस्थितीला आव्हान देतात.

त्यावेळेस इसाया यांनी राजकीय भ्रष्टाचार, सामाजिक-आर्थिक असमानता, कामगारांचं शोषण यासारख्या अनेक बाबींची निंदा केली होती. इतिहासकार म्हणतात, "इसाया यांनी दमास्कस उध्वस्त होण्याबाबत जो उल्लेख केला आहे, तो इ.स.पूर्व 732मध्ये घडलेल्या घटनेच्या आधारावर केला आहे."

हजारो वर्षांपूर्वी त्यावेळेस इस्राईल देश (इफ्राइम) आणि अरम देश (दमास्कस) हे असीरियाच्या विरोधात झालेल्या युद्धाप्रसंगी एकत्र आले होते. अध्याय 17मध्ये जे सांगण्यात आले आहे ते 21व्या शतकामधल्या सीरियाच्या उद्धवस्त होण्याविषयी सांगितलेलं नाही. तर प्रेषित इसाया यांनी या दोन्ही देशांच्या पराभवाविषयी सांगितलं असून त्यात त्यांनी दमास्कस उद्धवस्त झाल्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. दहा वर्षांनंतर असीरियाच्या सैन्यानं इस्राईलची राजधानी समारिया (हे प्राचीन शहर इ.स.पूर्व आठव्या-नवव्या शतकात इस्राईलची राजधानी होतं.) शहरावर ताबा मिळवला होता.

ब्राझीलच्या इवँजेलिकल लुथेरन चर्चचे अध्यक्ष धर्मगुरू एगोन कोपरेक म्हणतात, "इसाया यांच्या भविष्यवाणीला सध्या सीरियात जे काही होत आहे, त्याच्याशी जोडून पाहणं म्हणजे धर्माचा गैरफायदा घेण्यासारखं आहे. ही व्याख्या ते लोक करतात ज्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये भीती पसरावयाची असते."

नरसंहाराविषयीच्या अफवा

व्हर्च्युल जगतात बायबलमधील भविष्यवाणीला सैनिक हल्ल्यांशी जोडणाऱ्या अफवा या काही नविन नाहीत. वारंवार कुठली ना कुठली अफवा समोर येतेच ज्यात नरसंहाराच्या घटनांना बायबलमध्ये करण्यात आलेल्या भविष्यवाणींशी जोडलेलं असतं.

ब्राझीलमध्ये सध्या चर्चेचा विषय झालेली इसाया यांच्या भविष्यवाणीची इंग्रजी आवृत्ती 2013मध्ये यूरोपमध्ये चर्चेत आली होती.

ल्यूक्स गॉस्पेलच्या अध्याय 23 मधील 28व्या वचनाचं आणखी एक उदाहरण आहे.

नविन करारात असलेल्या या वचनात येशू यांनी आपल्यामागे शोक करत येणाऱ्या महिलांना म्हटलं आहे, "हे जेरुसलेमच्या स्त्रियांनो, माझ्यासाठी अश्रू ढाळू नका परंतू आपल्या बालकांसाठी अश्रू ढाळा."

येशू म्हणतात, "त्या स्त्रिया धन्य आहेत, ज्यांच्याजवळ मुलं नाहीत. ज्यांनी कधी मुलाला जन्म नाही दिला आणि ज्यांनी कधी आपल्या मुलांना दुध नाही पाजलं."

अनेकांनी या वचनाची आपल्या परीनं व्याख्या केली आणि याला नाझी नरसंहाराशी जोडून टाकलं. महायुद्धादरम्यान 60 लाख ज्यूंना मारण्यात आल्याच्या घटनेला सत्यात आल्याचं सांगण्यात आलं.

नॅशनल काउंसिल ऑफ द ख्रिश्चियन चर्चेज ऑफ ब्राझीलचे महासचिव फादर रोमी मार्सिया बेंके हे सीरियात होणाऱ्या गृहयुद्धाविषयी प्रेषितांच्या भविष्यावाणी संदर्भात सांगतात, "गॉस्पेलमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे येशू यांना ज्यूंच्या नरसंहारविषयीच्या भविष्यवाणीसाठी जबाबदार धरणं योग्य ठरणार नाही. येशू यांनी जेरुसलेममधील मंदिराविषयी केलेली ती टीका होती. जे त्यावेळेस धार्मिक केंद्राशिवाय एक आर्थिक केंद्रही होतं."

सीरियामध्ये 2011पासून सुरू असलेल्या गृहयुद्धामध्ये आतापर्यंत 4.7 लाख लोक मारले गेले असून 50 लाख लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे. त्याविषयी आपण आज काय सांगाल?

फादर आर्थर नासिमेंटो म्हणतात, "बायबलचं वाचन हे एक धर्मग्रंथ म्हणून केलं जावं. त्यातून काल्पनिक आणि संभ्रम निर्माण करणारे अर्थ काढले जाऊ नयेत. सीरियात सुरू असलेल्या क्रूरता आणि हिंसेंची कठोर निंदा करायला पाहीजे."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)