रशियाचं विमान सीरियात कोसळून 32 ठार

एक रशियन वाहतूक विमान सीरियामध्ये कोसळून 26 प्रवासी आणि सहा विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं संरक्षण मंत्रालयाचं म्हटलं आहे.

हमेमीम हवाईतळावर लँड करताना An-26 हे विमान क्रॅश झालं आहे. हे हवाईतळ लताकिया या किनारपट्टीवरच्या शहराजवळ असल्याची माहिती रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

या विमानावर कोणत्याच प्रकारचा हल्ला झाला नव्हता, असं रशियानं सांगितलं आहे. आणि प्राथमिक माहितीनुसार काही तांत्रिक बिघाडांमुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

रशियन संरक्षण मंत्रालयानुसार मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता या विमानाला अपघात झाला. आणि रनवेपासून साधारण अर्धा किमीपर्यंत ते विमान घसरत गेलं अन् हा अपघात झाला.

या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

हमेमीम विमानतळ

सीरिया बंडखोरांवर हल्ले करण्यासाठी हमेमीम हवाईतळ रशियाचं मुख्य हवाईतळ आहे. इथूनच झालेल्या काही मोठ्या हल्ल्यांमुळे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सीरियाच्या काही मोठ्या प्रदेशांवर पुन्हा ताबा मिळवता आला आहे.

रशियन सैन्याने सांगितलं होतं की 7 जानेवारीला त्यांनी याच हवाईतळावर एक ड्रोन हल्ला थांबवला होता. त्याच्या आठवडाभरापूर्वी म्हणजेच 31 डिसेंबर 2017 रोजी याच हमेमीम तळावर काही रशियन युद्धविमानांचं बंडखोरांच्या मॉर्टर हल्ल्यांनी नुकसान झालं होतं.

रशियाच्या या हवाई हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं, पण आपण फक्त बंडखोर कट्टरवाद्यांवरच हल्ला केल्याचा दावा मॉस्कोनं केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)