Oscars 2018 : पुरस्कारप्राप्त 'शेप ऑफ वॉटर'ची कथा काय आहे?

फोटो स्रोत, Theacademy
आयडेंटिटी क्रायसिस किंवा स्वत्वाचा शोध आणि त्यासाठीचा संघर्ष भारतात नवा नाही. जगभरातल्या अनेक देशांतले लोक हा संघर्ष करत आहेत. एकमेकांवर आपली ओळख लादली जात असल्याचं चित्र जगभरात दिसत आहे. अशातच एका मेक्सिकन दिग्दर्शकाचा चित्रपट 'द शेप ऑफ वॉटर'ला चार ऑस्कर मिळाले आहेत, ही घटना सुखावह आहे.
गिएर्मो डेल टोरो यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला एकूण 13 ऑस्कर नामांकन मिळाली होती. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझाइन, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट संगीत हे पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्या मनात हा प्रश्न येतो आहे की या चित्रपटाची नेमकी कथा काय आहे? कशाबद्दल बोलतो हा चित्रपट?

फोटो स्रोत, foxsearchlight/trailergrab
शेप ऑफ वॉटरची कथा
चित्रपटाची कथा 1960च्या काळातील आहे. अमेरिका आणि रशियात त्या काळात शीतयुद्ध सुरू होतं. चित्रपटातलं मुख्य पात्र एलिसा (सॅली हॉकिन्स) मूक आहे. बाल्टीमोर येथील एका गुप्त प्रयोगशाळेमध्ये ती साफसफाईचं काम करते.
त्या प्रयोगशाळेमध्ये संशोधनासाठी अॅमेझॉन नदीतून एक प्राणी आणला जातो. या प्राण्याला स्थानिक लोक देव मानत असतात. त्याची पूजा करत असतात. त्याला तिथून बंदी बनवून आणलं जातं आणि प्रयोगशाळेमध्ये त्याला सलाइन वॉटरमध्ये ठेवलं जातं.

फोटो स्रोत, foxsearchlight
हा प्राणी हुशार असतो आणि तिने केलेले संकेत त्याला कळत असतात. प्रयोगशाळेत साफ-सफाई करत असताना एलिसा त्याच्याशी सांकेतिक भाषेत संवाद साधते. त्याला गाणी ऐकवते आणि खायला देते. त्यातून त्यांच्यात जवळीक निर्माण होते.
या प्राण्याला पकडून आणणारा आर्मी ऑफिसर (मायकल शॅनन) हा त्याच्यावर संशोधनाच्या नावाखाली अत्याचार करू लागतो. त्याचे हाल एलिसाला पाहवत नाहीत. त्या प्राण्याला लवकरच मारून टाकलं जाईल याची कल्पना तिला येते. एलिसा तिची कृष्णवर्णीय सहकारी आणि तिच्या रुममेटच्या साहाय्याने त्या प्राण्याला प्रयोगशाळेतून पळवून आपल्या घरी आणते. त्याला एका बाथटबमध्ये ठेवते.

फोटो स्रोत, foxsearchlight
अर्थात हे करताना तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तो आर्मी ऑफिसर प्राण्याचा शोध घेतो. त्याला तो सापडतो का आणि त्यांच्या प्रेमाचं पुढं काय होतं अशा अनेक प्रश्नांची उत्तर चित्रपटातून उलगडतात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








