सरोगसीच्या मदतीने सनी लियोनी झाली जुळ्या मुलांची आई

फोटो स्रोत, Twitter/Sunny
पॉर्नस्टार ते बॉलीवुड अभिनेत्री असं यशस्वी संक्रमण करणारी सनी लियोनी जुळ्या मुलांची आई झाली आहे. सरोगसीच्या माध्यमातून सनी आणि डॅनियल वेबर या दांपत्याला ही जुळी मुलं झाली आहेत.
गेल्या वर्षी सनीने लातुरातील एका मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यामुळे आता तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सनी आणि तिचा पती डॅनियल यांच्यावर असणार आहे.
सनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोद्वारे ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना समजली. या फोटोत सनी आणि तिच्या पतीसह दोन लहान मुलंही दिसत आहेत.
'ही देवाची कृपा आहे. आम्ही लवकरच तीन मुलांचे पालक होणार हे आम्हाला 21 जून 2017 रोजीच कळलं होतं', अशा शब्दांत सनीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आम्ही कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला. अशर सिंह वेबर, नोहा सिंह वेबर आणि निशा कौर वेबर या तिघांसह आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे असं सनीने पुढे लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
सनी पुढे लिहिते, 'आमच्या मुलांचा जन्म काही दिवसांपूर्वी झाला आहे. मात्र आमच्या मनात आणि स्वप्नांमध्ये ते अनेक वर्षांपासून सामावले आहेत. देवाने आमच्यासाठी खास योजना आखली असावी, म्हणूनच आम्हाला मोठं कुटुंब मिळालं आहे. अतिशय गोंडस गोजिऱ्या मुलांचे आईबाबा होण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे आणि अभिमान वाटतो आहे. हे प्रत्येकासाठी सरप्राइज आहे'.
सनी लियोनीचा पती डॅनियल वेबर यानंही मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. 'नोहा आणि अशर वेबरचं स्वागत करा. हा आमच्या आयुष्यातला नवा अध्याय असणार आहे. करेन, निशा, नोहा, अशर आणि मी- असं आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे', अशा शब्दांत डॅनिएल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सनीनेच या बाळांना जन्म दिला का याविषयी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं. मात्र स्वत: सनीनेच खुलासा करत सगळ्या शंका दूर केल्या.
'याविषयी कोणताही भ्रम, शंका राहू नये यासाठी मी स्पष्ट करू इच्छिते. अशर आणि नोहा ही आमचीच मुलं आहेत. डॅनियल आणि मी दोघं या मुलांचे पालक आहोत. कुटुंब पूर्ण करण्यासाठी आम्ही सरोगसीचा पर्याय निवडला. मुलांच्या आगमनाने आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे', असं सनीने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








