इटलीतही उजव्या विचारसरणीचे सरकार येणार?

मिलान शहरातील भिंती निवडणूक प्रचाराने रंगल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मिलान शहरातील भिंती निवडणूक प्रचाराने रंगल्या आहेत.

रविवार, 4 मार्च रोजी इटलीत संसदेचे नवीन प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. स्थलांतरितांचा प्रश्न आणि अर्थव्यवस्था यावर राजकीय पक्षांतर्फे केलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर इटालियन नागरिक मतदानास सज्ज झाले आहेत.

माटेओ रँझी यांनी राजीनामा दिल्यानंतर डिसेंबर 2016 पासून इटलीचा कारभार काळजीवाहू मंत्रिमंडळातर्फे चालवला जात आहे.

प्रस्थापितांच्या विरोधातील फाईव्ह स्टार मुव्हमेंट, सत्ताधारी डेमोक्रॅटिक पार्टी आणि माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांची उजवी आघाडी जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अर्थात, भ्रष्टाचार प्रकरणामुळे बर्लुस्कोनी (81) हे पुढील वर्षीपर्यंत कोणत्याही सरकारी पदावर येण्याची शक्यता कमी आहे.

बर्लुस्कोनी यापूर्वी चारवेळा पंतप्रधान राहिले आहेत. त्यांनी आता स्थलांतरितविरोधी लिग पार्टीशी युती केली आहे. यावेळेस त्यांनी युरोपियन संसदेचे अध्यक्ष अन्टोनिओ तजानी यांना पंतप्रधानपदासाठी पाठींबा दिला आहे.

इटलीचं सभागृह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इटलीची संसद

मतदानाच्या दोन आठवड्यापूंर्वी ओपिनियन पोलवर बंदी आणण्यात आली. तत्पूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेंमध्ये बर्लुस्कोनी यांची युती आघाडीवर होती, मात्र त्यांना पूर्ण बहूमत नव्हतं.

'पोल्स्टर'नुसार, फाईव्ह स्टार हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

कुठले मुद्दे कळीचे?

स्थलांतर -

  • इटलीमध्ये 2013पासून आतापर्यंत लिबियातून सहा लाखाहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केलं आहे.
  • एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या स्थलांतरितांमुळे बहुतांश इटालियन नागरिक राजकारण्यांवर नाराज आहेत.
स्थलांतरीतांवर या महिन्यात काहीठिकाणी हल्लेही झाले.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, स्थलांतरितांवर काही ठिकाणी हल्लेही झाले.
  • बर्लुस्कोनी यांनी अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची प्रतिज्ञा केली आहे.

अर्थव्यवस्था -

  • स्थलांतरितांशिवाय इटलीच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे.
  • 1 कोटी 80 लाखांवर नागरिक दारिद्र्य रेषेखाली आहेत. तर, बेरोजगारीचं प्रमाण 11 टक्के आहे.
  • इटली हा युरोपीयन युनियनमधली चौथी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. तिथं जर उजव्या विचारसरणीचा पक्ष सत्तेवर आला तर इतर युरोपियन राष्ट्रांच्या दृष्टीनं ते एक काळजीचं कारण ठरू शकेल.

निवडणूक रिंगणात कोण?

  • प्रस्थापितांविरोधातल्या फाइव्ह स्टार पार्टीची स्थापना कॉमेडियन बेप्पे ग्रिल्लो यांनी 2009मध्ये केली. इटालियन राजकारणातील पक्षपातावर त्यांनी टीका केली होती. सध्याचे नेते लूइजी दी मायो यांनी मूलभूत उत्पन्नावर भर दिला आहे.
इटली

फोटो स्रोत, Reuters

  • सिल्वियो बर्लुस्कोनी यांच्या उजव्या विचारसरणीकडे झुकलेल्या फोर्झा इटालिया पक्षानं स्थलांतरविरोधी लिग आणि कडव्या उजव्या विचारसरणीच्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षांशी युती केली आहे. बर्लुस्कोनी यांनी तजानी यांना जरी पाठिंबा दिला असला तरी लिगचे नेते माटेओ साल्विनी हेही पंतप्रधानपदाचे इच्छूक आहेत.
  • माटेओ रँझी यांची डेमोक्रॅटिक पार्टी यांनी डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या तीन छोट्या पक्षांशी हात मिळवले आहेत.

पंतप्रधानपदाचे चेहरे!

पंतप्रधानपदासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये काही नवीन तर काही जुनेच चेहरे आहेत.

सिल्वियो बर्लुस्कोनी (81) हे पडद्याआडून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उजव्या विचारधारेच्या माटेओ साल्विनी (44) यांच्याशी युती केली आहे.

वरच्या रांगेत डावीकडून सिल्वीओ बर्लुस्कोनी माटेओ साल्विनी. खालच्या रांगेत डावीकडून माटेओ रँझी आणि लूइजी दी मायो

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, वरच्या रांगेत डावीकडून सिल्वियो बर्लुस्कोनी माटेओ साल्विनी. खालच्या रांगेत डावीकडून माटेओ रँझी आणि लूइजी दी मायो

डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या डेमोक्रॅटिक पार्टीचे माटेओ रँझी (43) हे प्रस्थापितांतल्या विरोधी पक्षांची आघाडी सांभाळत आहेत.

या दोन्ही आघाड्यांना आव्हान देणाऱ्या फाइव्ह स्टार मुव्हमेंटचे नेते लूइजी दी मायो (31) हे जर जिंकून आले तर आतापर्यंतचे सर्वाधिक तरुण पंतप्रधान ठरतील.

हे माहितीसाठी -

  • कनिष्ठ सभागृहातील 630 आणि सिनेटच्या 315 सदस्यांसाठी मतदान होणार आहे.
  • काही सदस्य थेट मतदारसंघातून निवडून येतील तर काहींची नियुक्ती पक्षातर्फे केली जाईल.
  • कनिष्ठ सभागृहातल्या सदस्यांच्या निवडीसाठी मतदान करण्यास वयाची अट 18 वर्षांची आहे. तर, सिनेटसाठी ही अट 25 वर्षं आहे.
  • अनिवासी इटालियन नागरिकांचे वेगळे मतदारसंघ आहेत.
  • स्थानिक वेळेनुसार रविवारी दिवसभर मतदान होणार असून सोमवारी सकाळपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)