कपड्यांना कुलुपं आणि गळ्यातल्या पेंडंटने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटेल का?

फोटो स्रोत, SAFER
- Author, लोरलेई मिहाला
- Role, टेक्नॉलॉजी प्रतिनिधी
महिलांच्या सुरक्षेसाठी बाजारात अनेक गॅजेट्स आणि अॅप्स उपलब्ध आहेत. पण ही उपकरणं खरंच महिलांची सुरक्षा करण्यास सक्षम आहेत का? हा खरा प्रश्न आहे.
या उपकरणांमुळे महिला या पीडित आहेत, दुर्बल आहेत असा संदेश तर जात नाही ना? याचा शोध घेण्याचा प्रयत्न बीबीसीच्या टेक्नॉलॉजी प्रतिनिधी लोरलेई मिहाला यांनी केला.
सकाळचे पाच वाजले होते. अलेक्झांड्रा सेरानेक या सायकलवरुन एका निर्जन प्रदेशातून जात होत्या.
"मी सेल्सवुमन आहे, माझं काम भल्या पहाटेच सुरू होतं," असं जर्मनीतील ओबरहॉसन येथे राहणाऱ्या 48 वर्षीय अलेक्झांड्रा सांगतात.

फोटो स्रोत, AlXANDRA CERANEK
"रस्त्याच्या कडेला दोन जण थांबलेले दिसत होते, त्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्या पाठीवर असलेली बॅग ओढली आणि मला सायकलवरून खाली पाडण्याचा प्रयत्न केला," अलेक्झांड्रा सांगतात.
"मी स्कर्टच्या खाली 'सेफ शॉर्ट्स' घातल्या होत्या. त्यामध्ये अलार्म होता. मी तो अलार्म वाजवला. त्याचा आवाज इतका मोठा होता की ते दोघे तिथून पळून गेले," असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, SAFE SHORTS
सेफ शॉर्ट्स बुलेटप्रुफ मटेरिअल पासून तयार केली जाते. या शॉर्ट्सला अलार्म आणि कुलूप असतं. जर कुणी तुमच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर अलार्म सुरू होतो किंवा संभाव्य धोका ओळखून तुम्ही देखील तो अलार्म सुरू करू शकता.
सॅंड्रा सील्झ यांच्या संकल्पनेतून या सेफ शॉर्ट्सची निर्मिती झाली आहे. त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातूनच त्यांना या शॉर्ट्सच्या निर्मितीची कल्पना सुचली.
एकदा सकाळी सॅंड्रा जॉगिंग करून परत येत होत्या. त्यांच्यावर तीन जणांनी हल्ला केला. "तिघांपैकी एकाने माझ्या लेगिंग्स खाली ओढण्याचा प्रयत्न केला. मी खूप घाबरले होते. तितक्यात एक माणूस समोरून आला. त्याच्यासोबत एक कुत्रं होतं. त्याने आपलं कुत्रं त्या तिघांच्या अंगावर सोडलं आणि ते तिघं पळून गेले. त्यानंतर मी महिलांच्या सुरक्षेसाठी काही करण्याचा निर्णय घेतला."

फोटो स्रोत, SANDRA SEILZ
महिलांवर या प्रकारचे हल्ले पूर्ण जगभरात होतात. त्यामुळे अनेक कंपन्या पुढे आल्या आणि त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपकरणं तयार केली आहेत.
भारतात देखील काही कंपन्यांनी धोक्याची सूचना देणारं पेंडंट तयार केले आहेत. 'लीफ वेअरेबल्स' नावाच्या स्टार्टअपने एक पेंडंट तयार केलं आहे. याचं नियंत्रण स्मार्टफोनद्वारे करता येतं.
तान्या गिफनी ही 24 वर्षीय दिल्लीची तरुणी सांगते, "या पेंडंटमुळं मला खूप फायदा झाला. एकदा मी एका मित्राला भेटायला जात होते. त्या वेळी मला जाणवलं माझा कुणीतरी पाठलाग करत आहे. मी घाबरले, मी पॅनिक बटन दाबलं. त्यामुळे माझ्या ओळखीच्या दोन जणांना सूचना गेली. माझं नशीब बलवत्तर म्हणून त्या दोन जणांपैकी एकाने मला लगेच फोन केला. त्याच मित्राला मी भेटायला जात होते. तो वाटेतच होता. तो म्हणाला GPSनं मी तुला ट्रॅक केलं आहे. काळजी करू नको. थोड्या वेळानंतर तो तिथं आला. तोपर्यंत पाठलाग करणाऱ्या व्यक्तीनं रस्ता बदलला. तो प्रसंग आठवला तरी माझ्या अंगावर अजून काटा येतो."
जसं पेंडंटनं धोक्याची सूचना मिळते तशीच 'निम्ब' या स्मार्ट रिंगद्वारे देखील आपल्या जवळच्या व्यक्तीला आपला ठावठिकाणा कळतो आणि कठीण प्रसंगाच्या वेळी धोक्याची सूचना मिळते.

फोटो स्रोत, Alamy
निम्ब या कंपनीच्या सह-संस्थापक केथी रोमा सांगतात, "17 वर्षांपूर्वी एका व्यक्तीने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी त्याला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही तर त्याने मला चाकूने भोसकलं. मी गंभीर जखमी झाले. जवळच्या एका इमारतीमध्ये मी मदत शोधण्याचा प्रयत्न केला. जर तेव्हा माझ्याजवळ निम्बसारखं काही उपकरणं असतं तर मला लवकर मदत मिळाली असती."

फोटो स्रोत, PAUL TERRIE
या सारखी आणखी उपकरणं बाजारात उपलब्ध आहेत. 'रिवोलर'च उदाहरण घ्या ना. यावर एक क्लिक केलं तर आपल्या जवळच्या व्यक्तींना आपला ठावठिकाणा कळतो आणि तीनदा क्लिक केलं तर आपण धोक्यात आहोत आणि आपल्याला मदत हवी आहे असं त्यांना समजतं.
त्याहून अत्याधुनिक उपकरणं देखील बाजारात मिळतात. 'ऑकली' या कंपनीने 'ब्लिंक' नावाचं एक उपकरण तयार केलं आहे. हे उपकरण एखाद्या घडाळ्यासारखं आहे. त्यामध्ये कॅमेरा, जीपीएस आणि अलार्म आहे.
"जगातल्या प्रत्येक तीन महिलांपैकी एका महिलेला अतिप्रसंगाचा सामना करावा लागला आहे किंवा त्यांच्यावर तसा प्रयत्न तरी झाला आहे," असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. तर बऱ्याच वेळी असं झालं आहे की, त्यांच्या साथीदारानेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे असं देखील आकडेवारी सांगते.
या उपकरणांचा काही महिलांना निश्चितच फायदा झाला आहे पण सर्वच जण अशा उपकरणांचे चाहते नाहीत.
"महिलांच्या रक्षणासाठी कुणी पुढाकार घेत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करतो पण अशा उपकरणांचा कुणी गैरफायदा घेऊ शकतं किंवा त्यांच्यावर पाळत देखील ठेवली जाऊ शकते," असं द सर्व्हायवर ट्रस्टच्या संचालिका फे मॅक्सटेड यांचं म्हणणं आहे. बलात्कार पीडितांच्या समुपदेशनाचं कार्य ही संस्था करते.
"सेफ शॉर्टसारखे कपडे घालून महिलांना सुरक्षित वाटणार नाही तर त्यांना आणखी भीती वाटू शकते," असं फे म्हणतात. "या महिला बाहेर जातील तेव्हा त्यांना वाटेल आपण स्वतःचं रक्षण करण्यास असमर्थ आहोत. कुलूप असलेले कपडे महिलांनी का घालावेत?" असा प्रश्न त्या विचारतात.
पण अलेक्झांड्रा यांचा अनुभव लक्षात घेतला तर आपल्याला सेफ शॉर्टचं महत्त्व कळू शकतं. "जेव्हा माझ्यावर अतिप्रसंग ओढवेल तेव्हा त्या प्रसंगातून मी सहीसलामत सुटावं असं मला वाटतं आणि सेफ शॉर्ट ते काम करतं," असं अलेक्झांड्रा सांगतात.
'ओव्हम' या स्टार्टअपचे संस्थापक ऋषी कौल सांगतात, "महिलांच्या सुरक्षेसाठी असणारी उपकरणं ही काही विशिष्ट वर्गापर्यंतच पोहोचतात. अशा उपकरणांऐवजी स्मार्टफोनवर असलेल्या अॅप्सचा वापरही वाढत आहे."
पण, फे मॅक्सटेड यांची भूमिका निराळी आहे. त्यांच्या मते, तंत्रज्ञानापेक्षा शिक्षणाने महिलांवरील हल्ल्याचं प्रमाण कमी होऊ शकेल.
"महिलांबाबत आदर बाळगणे, त्यांचा सन्मान राखणे किंवा त्यांची संमती घेण्याचं महत्त्व अशा लोकांना सांगण्याबाबत तंत्रज्ञान काय भूमिका बजावतं?" असा प्रश्न त्या विचारतात.
हे पालिलंत का?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









