संघर्षग्रस्त सीरियात 30 दिवसांची शस्त्रसंधी

पूर्व गुटामध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांची सर्वाधिक झळ लहान मुलांना बसत आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पूर्व गुटामध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांची सर्वाधिक झळ लहान मुलांना बसत आहे.

सीरियात सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत 30 दिवसांच्या शस्त्रसंधीवर एकमत झालं आहे.

सुरक्षा परिषदेच्या बैठकीत 30 दिवसांच्या शस्त्रसंधीचा ठराव सर्वसंमतीनं मंजूर करण्यात आला आहे. सुरक्षा परिषदेच्या सर्व 15 सदस्यांनी गृहयुद्धानं प्रभावित झालेल्या सीरियातील भागांत इतर मदत आणि वैद्यकीय सुविधा पोहचवण्यासाठी मतदान केलं.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच सीरियाच्या सरकारनं राजधानी दमस्कसवळ बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या पूर्व गुटामध्ये बाँबचा वर्षाव करण्यास सुरुवात केली होती.

गृहयुद्ध थांबवण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मतदान झालं असलं तरी सीरियात बाँबवर्षाव सुरू असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

या शस्त्रसंधीवर संयुक्त राष्ट्रांमध्ये बऱ्याच कालावधीपासून खल सुरू आहे. गुरुवारी सादर करण्यात आलेल्या या ठरावाला रशियाने विरोध केला होता. त्यांना त्यात आणखी काही बदल हवे होते. रशिया सीरियाच्या सरकारची पाठराखण करत असल्याने त्यांना या प्रस्तावात बदल हवा होता. तर पाश्चात्य राष्ट्रांनी रशिया वेळ घालवत आहे, अशी टीका केली होती.

सीरिया

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

"जोपर्यंत दोन्हीकडील पक्ष या ठरावास होकार दर्शवत नाहीत तोपर्यंत शस्त्रसंधी लागू करण्याचा काहीच फायदा नाही," अशी भूमिका सीरियाच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांत मांडली होती.

तर संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हैली यांनी शस्त्रसंधी त्वरीत लागू करावी असं मत व्यक्त केलं. पण सीरिया या शस्त्रसंधीला तयार होणार का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

सीरियातल्या गृहयुद्धावर लक्ष ठेऊन असलेल्या ब्रिटनमधील 'ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्स' या संस्थेच्या मते शनिवारी उशिरा रात्री शस्त्रसंधीला मंजुरी मिळाल्यानंतरही पूर्व गुटा भागात हवाई हल्ले झाले आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद

गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा या संस्थेने केला आहे.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंटोनिओ गुटेरस यांनी पूर्व गुटामधील परिस्थिती नरकापेक्षा भयंकर झाली असल्याची प्रतिक्रिया यापूर्वीच दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)