सिरियात रशियाचं लढाऊ विमान नेमकं पाडलं तरी कुणी?

सिरिया विमान अवशेष

फोटो स्रोत, AFP

रशियाचं सुखोई-२५ हे लढाऊ विमान सीरियातल्या बंडखोरांचा प्रदेश असलेल्या इडलिब प्रांतात पाडण्यात आलं आहे.

विमानाच्या वैमानिकानं विमानाचं अपघात होण्यापूर्वी सुखरुप बाहेर उडी घेतली. मात्र, त्याला पकडण्यात आल्याची माहिती सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स मॉनिटरिंग या संस्थेनं दिली.

या प्रसंगाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून त्यात विमान उडवण्यात आल्याचं स्पष्ट दिसते आहे. तर, दुसऱ्या एका व्हीडिओत विमानाचे आग लागलेले अवशेष दिसत असून एका पंखावर रशियाचं चिन्ह असलेला लाल तारा दिसत आहे.

सीरियासह तिथल्या बंडखोरांसोबत रशियाची लढाई सुरू आहे. रशियन लढाऊ विमानांच्या मदतीनं सीरियाच्या फौजांनी इडलिब प्रांतात गेल्या डिसेंबरमध्ये जोरदार मोहीम उघडली होती.

सिरिया विमान अवशेष

फोटो स्रोत, EPA

यामुळे या भागातले जवळपास १ लाख नागरिक निर्वासित झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आला आहे.

वैमानिक अद्याप सुखरूप आहे किंवा नाही हे स्पष्ट झालं नसून कोणत्या गटानं त्याचं विमान उडवलं आणि त्याला पकडलं हे देखील स्पष्ट झालेलं नाही.

कट्टरतावादी जिहादी, अल-कायदाशी संबंधित हयात ताहरीर अल-शाम हे सीरियातल्या उत्तर-पश्चिम भागात सक्रिय आहेत.

सिरिया-इराक सिमेचा नकाशा

सुखोई-२५ हे जमिनीवर कारवाई करण्यासाठी निष्णात विमान ओळखलं जातं. सप्टेंबर २०१५पासून सुरू झालेली रशियन हवाई दलाची कारवाई अद्याप थांबलेली नसून त्यांची हारही झालेली नाही.

ऑगस्ट २०१६मध्ये मात्र रशियन हवाई दलाचं हेलिकॉप्टर पाडण्यात आलं होतं. यात हेलिकॉप्टरमधल्या ५ जणांचा मृत्यू झाला होता.

रशियाच्या सुखोई-२५ विमानाचं संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियाच्या सुखोई-२५ विमानाचं संग्रहित छायाचित्र

सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स मॉनिटरिंग या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये रशियन लष्करानं अनेक हवाई हल्ले केले आहेत.

दरम्यान हे विमान बंडखोरांच्या नेमक्या कुठल्या गटानं पाडलं आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)