इटलीमध्ये चालत्या गाडीतून गोळीबार, आफ्रिकी स्थलांतरित लक्ष्य

फोटो स्रोत, EPA
इटलीमध्येम माचेराता शहरात चालत्या गाडीतून पादचाऱ्यांवर बेधुंद गोळीबार करण्यात आला. यात 6 लोक जखमी झाले आहेत. इटली पोलिसांनी यासंदर्भात संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आफ्रिकी स्थलांतरितांना या हल्लेखोरानं लक्ष्य केल्याचं सांगितलं जातं.
इटलीच्या माचेराता या शहरात भर दुपारी अचानक झालेल्या या हल्ल्यानं नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. एका गाडीतून हल्लेखोरानं अंदाधुंद गोळीबार करत परकीय नागरिकांना लक्ष्य केलं. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव ल्युका त्रैनी असं असून तो 28 वर्षांचा आहे.
वंसद्वेषातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा ल्युकानं इटलीचा राष्ट्रध्वज स्वतःभोवती गुंडाळला होता. त्यानं गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये स्थलांतरितांविरोधा असलेल्या नॉर्दर्न लीगच्या बाजूनं भाग घेतला होता. त्यानं पोलिसांना फॅसिस्ट सलाम केल्याचं बोललं जातं.
या हल्ल्यानंतर तिथल्या महापौरांनी नागरिकांना दक्षतेचा उपाय म्हणून घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. या हल्ल्याबरोबरच याच शहराच्या दुसऱ्या एका भागातही गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. एका 18 वर्षीय मुलीची हत्या झाल्यानंतर इटलीच्या या शहरातला विया स्पालातो आणि व्हिया दी व्हेलेनी हे भाग पोलिसांच्या रडावर होते. या भागातून या हत्येप्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, EPA
या अटकेनंतर सोशल मीडियावर या हल्ल्याचा बदला घेण्याविषयीच्या अनेक द्वेषमूलक पोस्ट करण्यात आल्या होत्या.
स्थानिक वृत्तसंस्थांनी या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचं म्हटलं आहे. एका स्थानिक वेबसाईटनं पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीनं इटलीचा राष्ट्रध्वज लपेटून घेतला असल्याचं दाखवलं आहे. इटलीच्या पोलिसांनीदेखील हल्लेखोराला अटक करतानाचे फोटो ट्वीट केले आहेत.
उजव्या विचारसरणीचे राजकीय नेते या हत्येच्या निमित्ताने स्थलांतरिकविरोधाचा मुद्दा रेटून नेत आहेत. इथल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान इटलीचे पंतप्रधान पाओलो जेंटिलोनी यांनी या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख प्रचार मोहिमांमध्ये करण्यास तात्पुरती बंदी घालती आहे. यातून वंशद्वेषाला खतपाणी मिळेल, असं ते म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








