जपानचा बेडूक चीनमध्ये करतोय 'डरावडराव'

फोटो स्रोत, HIT-Point
- Author, वेई झोयू
- Role, बीबीसी चायनीज
गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये एका जपानी बेडकाने धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे मुक्तपणे भटकणारा हा बेडूक आहे एका व्हिडीओ गेममधला.
चीनमध्ये अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये 'ट्रॅव्हल फ्रॉग' नावाचा हा गेम फ्री गेम्स विभागात सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे.
जपानमधल्या हिट-पॉईँट कंपनीने हा गेम तयार केला असून, याचं मूळ नाव 'तबिकाइरू' असं आहे. हा गेम जपानी भाषेत असला तरी कोणालाही कळेल अशा ग्राफिक्समुळे तो जगभरातलं कोणीही खेळू शकत आहे.
पण असं आहे तरी काय या गेममध्ये?
एक हिरव्या रंगाचा गोंडस बेडूक! तो एका पिटुकल्या घरात राहतो, तिथेच खातो-पितोही. आणि कधीकधी लिहिण्याचं कामही करतो. त्यासाठी पेन्सिलींना टोक काढतो. कधी कधी पुस्तक वाचता वाचता तो डुलक्याही काढतो.

फोटो स्रोत, HIT-POINT
हा गेम तुम्ही खेळणार असाल तर काही गोष्टी जाणून घ्या.
एक म्हणजे, या गेममध्ये वापरलं जाणारं परिमाण म्हणजे 'क्लोव्हर'. बेडूक हिंडायला गार्डनमध्ये जातो. दर तीन तासांनंतर बागेची एक सैर लगावली की 20 क्लोव्हर तुमच्या खात्यात जमा होतात. जर तीन तासांपर्यंत थांबण्याएवढा वेळ किंवा संयम नसेल तर खरे पैसे देऊन तुम्ही हे क्लोव्हर विकत घेऊ शकता.
या गेमचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो तुमचं या तुडतुड्या बेडकावर फारच थोडं नियंत्रण असतं. बघता बघता हा इटुकला बेडूक आपलं घर सोडतो आणि जपानची सैर करायला निघतो.
बेडूक कधी घर सोडून सैर करायला निघेल, याची तुम्हाला कल्पनाही नसते. तो कधी परतेल हेही सांगता येत नाही. आणि तो परतताना काय घेऊन येईल, हेही ठाऊक नसतं.
काही वेळेला हा बेडूक दोन-तीन तासांत घरी परततो तर काही वेळा चार दिवसांनंतर घरी येतो.
आणि गंमत म्हणजे, तो त्याच्या मालकासाठी अर्थात तुमच्यासाठी हा बेडूक पोस्टकार्ड, क्लोव्हर किंवा एखादी आठवणीत राहणारी वस्तू पाठवू शकतो, तर कधी रित्या हाताने माघारीही येऊ शकतो.
मालक बेडकाच्या हालचालींवर नियंत्रण ठेऊ शकत नाही तसंच बेडकाशी संवादही साधू शकत नाही.

फोटो स्रोत, HIT-POINT
मुक्तपणे विहरणाऱ्या बेडकासाठी तुम्ही एखादा पदार्थ तयार करू शकता, त्याला फिरण्यासाठी मदत करू शकतात.
पालकत्वाची झलक
"बेडूक त्याला हवं तसं फिरतो आणि मला त्याच्यासाठी ऊर्जा आणि डोकं खर्च करावं लागत नाही," असं 27 वर्षांच्या शेननं बीबीसीला सांगितलं.
"आठवडाभरापूर्वी मी हा गेम खेळायला सुरुवात केली. WeChatवर (चीनचा फेसबुकला पर्याय) माझ्या मित्रांनी मला गेमचे फोटो शेअर केले. बेडूक कुठे भटकायला गेला आहे हे मी दर दहा मिनिटांनी पाहते कारण माझं काम खूपच कंटाळवाणं आहे. आपल्या साहसी मोहिमांचे फोटो बेडूक मला पाठवतो," असं शिआननं सांगितलं.
"मी घराबाहेर असतो तेव्हा आईला मी घरी हवा असतो. आणि मी घरी असतो तेव्हा ती कंटाळते आणि मी बाहेर जावं, असं तिला वाटतं. बेडकाबद्दल मला अगदी अस्संच वाटतं," असं ते पुढे सांगतात.
"पण हा बेडूक सतत फिरत असतो आणि त्याचे फोटोही पाठवत असतो. तो फारसा कोणामध्ये मिसळत नाही. त्याचे कोणी मित्रमैत्रिणी नाहीत. आज बेडकाने एका उंदरासह फिरतानाचा फोटो पाठवला. मी आनंदाने रडू लागले. बेडकाला अखेर कोणीतरी मित्र मिळाला."

फोटो स्रोत, HIT-POINT
अमेरिकेच्या अॅप अॅनी कंपनीने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच झाल्यापासून ट्रॅव्हल फ्रॉग गेम चीनमध्ये अॅप स्टोअरमधून 39 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे.
चायनीज खेळाडूंनी या गेमसाठी 20 लाख रुपये खर्च केल्याचंही स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, माहेरी म्हणजेच जपानमध्ये हा गेम अॅप स्टोअरमधून चार लाखवेळा डाऊनलोड झालं आहे. तर अँड्रॉईडच्या गुगल प्ले स्टोअरमधून लाखभर लोकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.
एवढा लोकप्रिय का?
"नव्वदीच्या दशकानंतर जन्मलेल्या मुलामुलींना हा गेम प्रचंड आवडतो आहे. कारण आम्ही सतत कामात गढलेलो असतो," असं शेननं सांगितलं. ट्वीटरसदृश Weibo वर हा गेम व्हायरल झाल्याचं शेननं पाहिलं. आता बेडकाकडून काय अपडेट मिळणार, म्हणून तो सतत फोन चेक करतो.

फोटो स्रोत, HIT-POINT
"मी जेव्हाही गेम खेळायला सुरुवात करतो तेव्हा माझ्या खूप अपेक्षा असतात. माझा बेडूक नक्की कुठे भटकतो आहे, हे मला जाणून घ्यायचं असतं. त्याने पाठवलेले फोटोही मला पाहायचे असतात. तो माझा मुलगाच आहे असं वाटतं," असं शेनला वाटतं.
बेडूक जेव्हा भटकत असतो तेव्हा शेन वेळ घालवण्यासाठी दुसरं काहीतरी शोधतो.
WeChat वर शेनने 'Post-90s Empty Nester Huddle Together for Warmth' नावाचा ग्रुपही तयार केला आहे. बेडूक घराबाहेर असताना कसं वाटतं, या विषयावर मुलं घराबाहेर असताना पालकांना कसं वाटतं, या धर्तीवर चर्चा होते.
गेममागचं राजकारण?
या गेमला एक राजकीय संदर्भ जोडला जात आहे.
काही खेळाडूंना हा गेम म्हणजे बेडकाची व्यक्तीपूजा वाटतो. याचा संदर्भ जिआंग झेमीन यांच्याशी जोडला जातो.

फोटो स्रोत, Reuters
जिआंग यांनी 1989 ते 2002 या कालावधीत कम्युनिस्ट पार्टीचं नेतृत्व केलं. गेल्या काही वर्षांत चीनमध्ये ते अचानकच युवकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. जिआंग यांच्या कार्यकाळात जन्मही न झालेल्या मंडळींनाही ते आवडू लागले होते.
यामुळे त्यांना 'टोड' (बेडूक) असं टोपणनाव मिळालं.
"माझ्या बेडकाचं नाव मी 'द एल्डर' असं ठेवलं आहे," असं चीनमधल्या दक्षिण पश्चिम विद्यापीठाची विद्यार्थिनी लिन क्षी हिने Weiboवर पोस्ट केलं आहे.

फोटो स्रोत, HIT-POINT
कम्युनिस्ट पार्टीचं मुखपत्र असलेल्या 'द पीपल्स डेली' वर्तमानपत्रानं या गेमच्या माध्यमातून मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा विचार अधोरेखित केला आहे. तरुण मुलामुलींनी पालकांसाठी अधिकाअधिक वेळ द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
"घरापासून दूर असणारी माणसं आणि भटकणारा बेडूक, हे सारखेच भासतात," असं लिननं सांगितलं.
''मुलांची आतूरतेने वाट पाहणाऱ्या पालकांना कसं वाटत असेल? तुमच्या पालकांना आठवणीने भेटा. सगळ्या भटक्या बेडकांना हाच संदेश आहे''.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








