सीरिया : गावावर बाँबहल्ला केल्याचा रशियाचा इन्कार

रशियाचा हल्ला

फोटो स्रोत, EPA

पूर्व सीरियातल्या गावात बाँबहल्ला केल्याचा रशियाने इन्कार केला आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्यात अनेक नागरिक ठार झाल्याचं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

'सीरियन ऑब्झरवेटरी फॉर ह्युमन राईट्स' यांच्या म्हणण्यानुसार अल-शफह शहरात झालेल्या हल्ल्यात 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी DeirEzzor24 या वेबसाईटने हा आकडा 24 असल्याचं सांगितलं आहे.

कथित इस्लामिक स्टेट (IS) विरुद्ध लढणाऱ्या सीरियाच्या सरकारभिमुख फौजांना पाठिंबा देण्यासाठी रशियन एअरक्राफ्टनं गावावर हल्ला केल्याचं दोन्ही संस्थांचं मत आहे.

पण सोमवारी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने 'अल शफह' वर बाँबहल्ला केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.

रशियन वृत्तसंस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, 'रशियाने मोठ्या लोकवस्तीच्या भागात मुद्दाम हा हल्ला केलेला नाही. फक्त आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या केंद्रांना लक्ष्य केलं.'

'ग्रेट ब्रिटनमध्ये असलेल्या 'सीरियन ऑब्झरवेटरी फॉर ह्युमन राईट्स' ने अल शफह भागावर झालेल्या हल्ल्याविषयी दिलेली माहितीसुद्धा खोटी असल्याचं' या निवेदनात म्हटलं आहे.

आधी दिलेल्या निवेदनात सहा रशियन लांब पल्ल्याच्या बाँबरनी इस्लामिक स्टेटच्या चौक्यांवर आणि दार अल झोर भागावर हल्ला केल्याचं म्हटलं होतं.

DeirEzzor24 ही एका स्वयंसेवी कार्यकर्त्यांतर्फे चालवण्यात येणारी वेबसाईट आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रविवारी झालेला हल्ला हा एका लोकवस्तीवर करण्यात आला होता. या वस्तीत अनेक विस्थापित कुटुंबं राहात होती.

या हल्ल्यात ठार झालेल्या 25 जणांमध्ये लहान मुलं आणि स्त्रियांचाही समावेश आहे. अनेक इमारती कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले असू शकतात. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सीरिया

फोटो स्रोत, Reuters

सीरियन ऑब्झरवेटरी या संस्थेचे सीरियात अनेक माहितीचे स्रोत आहेत. त्यांनीसुद्धा अनेक इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती दिली आहे आणि मृतांमध्ये 21 बालकांचा समावेश असल्याचं सांगितलं आहे.

अल शफह हे युफ्रेटिस नदीच्या पूर्वेला आणि देर अल झोर शहरापासून दक्षिण भागात 110 किमीवर आहे. इराकची सीमा या शहरापासून फक्त 14 किमीवर आहे.

हा भाग अल्बू कमलाच्या उत्तरेला आहे. हा भाग सीरियाचे सैनिक आणि सरकारच्या बाजूने लढणाऱ्या बंडखोरानी रशियन हवाई दलाच्या मदतीने काबीज केला आहे.

सोमवारी झालेल्या एका वेगळ्या घडामोडीत सीरियन ऑब्झरवेटरीच्या माहितीनुसार आणखी 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला सरकारच्या हवाईदलाने आणि तोफांच्या साहाय्याने दमास्कसच्या बाहेरच्या भागात पूर्व गुटा भागात केला आहे.

दोन महिन्यांमध्ये इथले 120 रहिवासी मृत्युमुखी पडल्याचं सीरियन ऑब्झरवेटरीची आकडेवारी सांगते.

अनेक वर्षं गुटा भागात वेढा घातला गेल्यानंतर तिथल्या रहिवाशांची स्थिती दयनीय आहे. लोकांचे अन्नावाचून हाल होत आहेत.

संयुक्त राष्ट्राने मागच्या आठवड्यात दिलेल्या अहवालात अन्नाच्या तुटवड्यामुळे काही जण जनावरांचा चारासुद्धा खात आहेत.

सीरियात बऱ्याच काळापासून चाललेल्या गृहयुद्धात राष्ट्रप्रमुख बशर अल असद यांचा रशिया हा मुख्य सहकारी आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)