टेक सिटी बंगळुरूत प्यायला पाणी नाही?

टोकियो शहर

फोटो स्रोत, Getty Images

जगभरातल्या 11 शहरांसमोर पाणी संकट उभं राहिलं आहे. त्यात भारतातलं बंगळुरूही आहे.

दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन शहरात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. काही आठवड्यात इथल्या लोकांना प्यायला पाणी मिळणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे.

असं असलं तरी केपटाऊन हे अशा समस्येला सामोरं जाणारं एकमेव शहर नाही.

पाणी संकटाविषयी तज्ज्ञांनी वेळोवेळी इशारा दिला आहे.

पृथ्वीचा 70 टक्के भाग जरी पाण्यानं व्यापला असला तरी त्यातला बहुतांश वाटा समुद्रातल्या खाऱ्या पाण्याचा आहे.

जगात गोड्या पाण्याचं प्रमाण फक्त 3 टक्के इतकंच आहे आणि ते सहजासहजी उपलब्ध होत नाही.

जगभरात 100 कोटींपेक्षा अधिक लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. तर 270 कोटी लोकांना वर्षातल्या एका महिन्यासाठी पिण्याचं पाणी मिळत नाही.

2014 साली जगभरातल्या 500 मोठ्या शहरात झालेल्या एका पाहणीत असं दिसून आलं की, या शहरी भागातल्या चारपैकी एका नगरपालिकेला पाण्याची समस्या भेडसावत आहे.

पाणी

फोटो स्रोत, Getty Images

संयुक्त राष्ट्रांच्या पाहणी अहवालानुसार, प्रतिव्यक्ती पाण्याचा पुरवठा 1700 क्युबिक मीटरपेक्षा कमी झाल्यास पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होतं.

संयुक्त राष्ट्रांनी मांडलेल्या अंदाजानुसार, 2030 सालापर्यंत जागतिक पातळीवर पाण्याची मागणी पुरवठ्यापेक्षा 40 टक्के जास्त असेल.

पाण्याच्या संकटाचं सामना करणारं जगातलं पहिलं शहर केपटाऊन आहे. जगातल्या प्रत्येक शहरासमोर ही समस्या आ वासून उभी आहे. घडयाळाच्या काट्यावर धावणाऱ्या या शहरांकडे या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मात्र वेळ नाही.

जगातल्या अशा 11 शहरांवर नजर टाकूयात ज्यांच्यासमोर पाण्याचं संकट उभं ठाकलं आहे.

1. साओ पाओलो

ब्राझीलची आर्थिक राजधानी असलेल्या साओ पाओलोचा जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांत समावेश होतो.

साओ पालोतला कोरडा तलाव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, साओ पालोतला कोरडा तलाव

इथे 2 कोटी 17 लाख लोक राहतात. केपटाऊनसारखीच परिस्थिती या शहरावर 2015 साली आली होती.

पाण्याचं दुर्भिक्ष वाढत गेलं होतं आणि शहराला फक्त 20 दिवस पाणीपुरवठा करण्यात आला होता. या दरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी पुरवणाऱ्या वाहनांना सुरक्षा द्यावी लागली होती.

2014 ते 2017मध्ये ब्राझिलच्या आग्नेय भागात भयंकर दुष्काळ पडल्यानं पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालं होतं.

साओ पाओलोच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी केलंल चुकीचं नियोजन आणि अयोग्य गुंतवणूक या दुष्काळाला कारणीभूत असल्याची टीका संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीनं केली होती.

2016 साली पाण्याची समस्या सुटली अशी घोषणा करण्यात आली. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2017ला इथल्या मुख्य तलावाची क्षमता 15 टक्क्यांनी कमी झाली होती. यानंतर मात्र परत सरकारच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

2. बंगळुरू

बंगळुरू शहराच्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे येथील व्यवस्थेवर प्रचंड दबाव पडला आहे. 'ग्लोबल टेक्नॉलॉजी सेंटर' म्हणून उदयाला येऊ पाहणाऱ्या या शहरातील प्रशासन, इथला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत आहे.

बंगळुरातलं पाणी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंगळुरातलं पाणी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.

शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन जुनाट झाली आहे. ती तातडीने बदलण्यात यावी असा अहवाल एका सरकारी संस्थेनी दिला होता. खराब पाईपलाइनमुळे अंदाजे 50 टक्के पिण्यांच पाणी वाया जातं असं या अहवालात सांगितलं गेलं.

चीनप्रमाणेच भारतासमोरही पाणी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे आणि बंगळुरूची स्थितीही काही वेगळी नाही. एका अहवालानुसार, शहरातील तलावांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी 85 टक्के पाणी हे सिंचनासाठी आणि औद्योगिक क्षेत्राच्या वापरण्या योग्य आहे असं अहवालात म्हटलं गेलं.

शहरातल्या एकाही तलावातलं पाणी इतकं शुद्ध नाही की त्याला पिण्यासाठी अथवा अंघोळीसाठी वापरता येईल.

3. बीजिंग

व्यक्तीला प्रतिवर्षी पाण्याचा पुरवठा 1700 क्युबिक मीटरपेक्षा कमी झाल्यास पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं, असं वर्ल्ड बँकेचं मत आहे.

बीजिंग शहर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बीजिंग शहर

2014 साली शहरात राहणाऱ्या 2 कोटी लोकांना 145 क्युबिक मीटर पाणी मिळालं होतं.

जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के लोक चीनमध्ये राहतात. पण जगातल्या फक्त 7 टक्के गोड्या पाण्याचे साठे चीनमध्ये आहेत.

अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबियाच्या अभ्यासानुसार 2000 ते 2009 या कालावधीत शहरातल्या पाण्याच्या स्रोतांची संख्या 13 टक्क्यांनी घटली आहे.

2015 साली आलेल्या आकडेवारीनुसार बीजिंगमधलं पाणी इतकं खराब आहे की ते शेतीसाठीसुद्धा उपयोगाचं नव्हतं.

चीनच्या सरकारनं या समस्येला तोंड देण्यासाठी पाण्याच्या व्यवस्थित वितरणासाठी एक योजना तयार केली. तसंच जास्त पाणी वापरणाऱ्यांकडून जास्त दर आकारण्यात आला.

4. काहिरा

जगातल्या महान संस्कृतींचा जन्म नाईल नदीच्या किनारी झाला होता पण ही जुनी गोष्ट आहे.

इजिप्तच्या गरजेपैकी 97 टक्के पाणी नील नदीतून येतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इजिप्तच्या गरजेपैकी 97 टक्के पाणी नील नदीतून येतं.

आता मात्र ही नदी प्रदूषणानं वेढली आहे. इजिप्तच्या गरजेपैकी 97 टक्के पाणी या नदीतून येतं. याच नदीत शेतातलं आणि घरातलं प्रदूषित पाणी पोहोचतं.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जलप्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशामध्ये इजिप्तचा क्रमांक लागतो. इथल्या लोकांचं सरासरी उत्पन्न सर्वात कमी आहे.

2025पर्यंत इजिप्तला पाणी संकटाचा सामना करावा लागेल, असं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे.

5. जकार्ता

समुद्रकिनारी वसलेल्या जकार्ता समोरही समुद्रातल्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ हे मोठं संकट आहे.

जकार्ता शहर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जकार्ता शहर

तसंच एक कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या सार्वजनिक पाण्याच्या साठ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

बेकायदेशीररित्या विहीरी खणण्यात आल्यानं प्रमाण वाढल्यानं इथल्या पाणी पातळीवर त्याचा परिणाम होत आहे.

इथल्या तलावात असफाल्टचं प्रमाण खूप आहे. या समस्येमुळे पाण्याचं संकट अधिकचं गहिरं होतं.

6. मॉस्को

जगातल्या गोड्या पाण्याच्या स्रोतांपैकी एक चतुर्थांश स्रोत रशियात आहेत. पण सोव्हिएत काळात झालेल्या औद्योगिक विकासामुळे इथली पाणी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे.

रशियातला पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियातला पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

कारण मॉस्कोला गरजेच्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी याच स्रोतांपासून मिळतं.

पिण्याच्या पाण्याचे 35 ते 60 टक्के स्रोत हे स्वच्छतेविषयीच्या निकषांवर पात्र ठरत नाहीत, असं सरकारी नियामकांनुसार समोर येतं.

7. इस्तंबूल

तुर्की सरकारच्या अधिकृत आकड्यांवर नजर टाकल्यास, देशात पाणी संकट असल्याचं स्पष्ट होतं. 2016 मध्ये इथे प्रतिव्यक्ती 1700 क्युबिक मीटरपेक्षा कमी पाणी पुरवठा होत होता.

इस्तांबुलमधला कोरडा तलाव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्तांबुलमधला कोरडा तलाव

2030 पर्यंत इथली स्थिती आणखी वाईट होऊ शकते, असं स्थानिक जाणकारांचं मत आहे.

लोकसंख्येचं प्रमाण जास्त असलेल्या इस्तांबूल (1कोटी 4 लाख) सारख्या शहरात पाण्याची समस्या वाढतच चालली आहे.

2014च्या सुरुवातीला शहरातल्या पाण्याच्या स्रोतांची संख्या 30 टक्क्यांनी घटली होती.

8. मेक्सिको सिटी

दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मेक्सिको शहरासाठी पाणी समस्या नवीन बाब नाही. इथं पाचपैकी एकाच व्यक्तीला काही तासांसाठी पाणी पुरवठा केला जातो.

मेक्सिकोतल्या 20 टक्के लोकांना दिवसभरात काही तासांसाठीच पाणी मिळतं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मेक्सिकोतल्या 20 टक्के लोकांना दिवसभरात काही तासांसाठीच पाणी मिळतं.

शहरातल्या 20 टक्के लोकांना दिवसभरात काही तासापुरतंच पाणी मिळतं. गरजेपेक्षा 60 टक्के अधिक पाणी शहराला आयात करावं लागतं.

शहरातील गळतीमुळे 40 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी वाया जातं.

9. लंडन

लंडनमध्ये पाणी गळतीचं प्रमाण खूप आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लंडनमध्ये पाणी गळतीचं प्रमाण खूप आहे.

पाण्याच्या समस्येचा विचार केल्यास ज्या शहराचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते शहर म्हणजे ब्रिटनची राजधानी लंडन.

इथं दरवर्षी 600 मिलीमीटर पाऊस पडतो. तो पॅरिस आणि न्यूयॉर्कपेक्षा कमी आहे. शहराच्या गरजेपैकी 80 टक्के पाणी नदींतून येतं.

ग्रेटर लंडनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, 2025पर्यंत इथल्या पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करेल.

2040 पर्यंत तर परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते.

10. टोकियो

अमेरिकेच्या सिएटल शहराएवढाच पाऊस दरवर्षी जपानच्या राजधानीत पडतो. सिएटलला पावसाचं शहरही म्हटलं जातं. पण फक्त चार महिन्यांसाठी.

टोकियोतल्या रयोगोकू कोकुगिकन सूमो एरिना इथं पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टोकियोतल्या रयोगोकू कोकुगिकन सूमो एरिना इथं पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था आहे.

पावसाचं पाणी साठवलं नाही तर पाण्याचं संकट उभं राहतं.

यावर उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी शहरातल्या 750 सार्वजनिक इमारतींवर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची व्यवस्था केली आहे.

इथं 3 कोटी लोक राहतात आणि यातले 70 टक्के लोक पिण्याच्या पाण्यासाठी तलावातल्या पाण्यावर अथवा बर्फापासून विरघळलेल्या पाण्यावर अवलंबून असतात.

नुकतंच सरकारनं शहरातल्या पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू केली आहे.

11. मियामी

अमेरिकेत सर्वाधिक पाऊस फ्लोरिडा शहरात पडतो. पण या राज्यातल्या प्रसिद्ध मियामी शहरासमोर पाण्याचं संकट आ वासून उभं आहे.

समुद्रातील खारं पाणी मियामी शहरासमोरील संकट आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, समुद्रातील खारं पाणी मियामी शहरासमोरील संकट आहे.

अटलांटिक समुद्रानं इथला मुख्य तलाव विजकायातील पाण्याला प्रदूषित केलं आहे आणि हेच पाणी शहराचा मुख्य स्रोत आहे.

या समस्येचं मूळ 1930च्या आसपास शोधण्यात आलं. समुद्रातील खारं पाणी वाहत येऊन तलावातल्या गोड्या पाण्याला प्रदूषित करत असल्याचं त्यात स्पष्ट झालं.

समुद्रच्या पातळीत अपेक्षापेक्षा वेगानं झालेली वाढ हे या मागचं मुख्य कारण होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)