You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मालदीवमध्ये विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या सुटकेचे आदेश
सध्या युनायटेड किंगडम आश्रय घेतलेले मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर नव्याने खटला चालवण्याचे, तसंच अटकेत असलेल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या सुटकेचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलं आहेत.
मोहम्मद नशीद आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती.
हे खटले ज्या पध्दतीनं चालवण्यात आले त्यात देशाची घटना आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली झाली आहे, असं सुप्रीम कोर्टानं प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.
कोर्टाच्या या निकालामुळे, 12 सदस्यांना त्यांचं संसद सदस्यत्व पुन्हा मिळालं आहे. त्याचाच अर्थ संसदेत आता पुन्हा विरोधी पक्षांचं बहुमत झालं आहे.
या निकालानंतर विरोधी पक्षाचे समर्थकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला.
काय आहे प्रकरण?
मोहम्मद नशीद हे 2008मध्ये लोकशाहीच्या मार्गाने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष बनले. 2012 साली त्यांना राजीनामा दिला.
तेव्हापासून त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या विरोधकांमधील दरी वाढत गेली. त्यांच्यातील संघर्ष विकोपाला गेल्यानंतर सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचं हत्यार उपसलं.
नशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत खटला भरण्यात आला होता.
2015 साली मोहम्मद नशीद यांना 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी युनायटेड किंगडममध्ये आश्रय घेतला होता. विरोधी पक्षातील 12 जणांनाही पदावरुन काढण्यात आलं होतं.
तेव्हापासून मालदीवमध्ये राजकीय अशांततेचं वातावरण आहे.
मोहम्मद नशीद यांनी केलं निर्णयाचं स्वागत
नशीद यांनी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
मालदीवमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे, असं ट्वीट नशीद यांनी केलं आहे.
सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही नशीद यांनी केली आहे.
सध्या नशीद हे युनायटेड किंगडममध्ये आहेत. आपण लवकरच मालदीवमध्ये परत येऊ असं ते म्हणाले आहे. पक्षातील इतर नेत्यांचा सल्ला घेऊन पुढचं पाऊल आपण उचलणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
नशीद यांच्या समर्थकांचा जल्लोष
नशीद यांच्या सुटकेच्या निर्णयानंतर त्यांचे समर्थक मालदीवची राजधानी मालेमध्ये जल्लोष करत आहेत.
मालदीव हे अनेक बेटांचा समूह आहे. इथं ब्रिटिशांची सत्ता होती. 1965मध्ये मालदीव स्वतंत्र झालं. अब्दुल गय्यूम यांनी या ठिकाणी एकाधिकारशाहीनं अनेक वर्षं सत्ता राबवली आहे. 2008मध्ये नशीद निवडून आले आणि राष्ट्राध्यक्ष बनले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)