You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
U-19 भारतीय टीमची कमाल, पाकिस्तानवर दणदणीत विजय
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या U-19 क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला हरवून फायनलमध्ये धडक मारली आहे.
मंगळवारी ख्राइस्टचर्चमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला आहे. भारतानं पाकिस्तानला 203 रनांनी हरवलं. हेगले ओव्हल याच मैदानावर 3 फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनल मॅच होणार आहे.
शुभमान गिलच्या शतकाच्या बळावर भारतानं 273 रन्स केल्या. इशान पोरेलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा डाव 69 रनमध्येच गुंडाळला.
भारताच्या शुभमान गिलनं 94 बॉलमध्ये 102 रन काढले. पाकिस्तानसमोर मोठं आव्हान उभं करण्यात गिलनं महत्त्वाची भूमिका बजावली. याव्यतिरिक्त कॅप्टन पृथ्वी शॉ यानं 41 रन, मनजोत कालरानं 47 रन केले. अनुकूल रॉयनं 33 रन केले. पाकिस्तानकडून मोहम्मद मूसानं चार, अरशद इकबालनं तीन आणि शाहीन शाह अफरीदीनं एक विकेट घेतल्या.
273 रनांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी टीमची सुरुवातच खराब झाली. त्यांच्या बॅट्समननी एकापाठोपाठ तंबूचा रस्ता धरला आणि त्यांचा खेळ 69 रनवर संपुष्टात आला.
भारतीय टीमकडून इशान पोरलनं पाकिस्तानवर लक्ष्यभेदी हल्ला केला. इशाननं 6 ओव्हरमध्ये 17 रन देऊन चार विकेट घेतल्या. तसंच शिवा सिंह, रियान पराग यांना प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. अनुकूल आणि अभिषेक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉनं म्हटलं, "आमचा खेळ ऑल-राउंडर होता. सर्व जणांनी उत्तम खेळ होता. आमचा प्लॅन अगदी साधा होता. कमकुवत बॉलची वाट पाहायची आणि तसा बॉल आला की तो बाउंड्रीच्या बाहेर टाकायचा." ऑस्ट्रेलियासोबत 3 फेब्रुवारीला फायनल मॅच आहे. त्याची रणनीती कशी आहे याबद्दल विचारले असता शॉ म्हणाला, "ऑस्ट्रेलियाचा सामना करणं हे मोठं आव्हान आहे."
सेमीफायनलच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला शुभमान गिलला मॅन ऑफ दि मॅच देण्यात आलं. माझा आजचा खेळ मला विशेष वाटला अशी प्रतिक्रिया त्यानं दिली. जर आपला स्कोअर 250-260 बनला तर आपण सहज जिंकू शकू असं मला वाटत होतं. पुढं चालून मला तीनही क्रिकेट प्रकारांमध्ये खेळण्याची इच्छा आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात आमची फायनल आहे. ही मॅच खेळण्यास मी उत्सुक आहे," असं गिलनं म्हटलं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)