You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फिलिपीन्सला वादळाने झोडपले : 180 ठार, हजारो बेपत्ता
दक्षिण फिलिपीन्सला वादळाचा तडाखा बसला असून आतापर्यंत 180 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर हजारो नागरिक बेपत्ता आहेत.
या ट्रॉपिकल वादळामुळे मिंडानावो बेटाला पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे. ट्युबोड आणि पिअॅगापो या शहरांमध्ये सर्वाधिक हानी झालेली असून अनेक घरं कोसळली आहेत.
ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हे वादळ मिंडानावो बेटावरून पुढे पालावान बेटांकडे निघालं असून पश्चिमकडे सरकत चाललं आहे.
फिलिपीन्सला नेहमी वादळांचा फटका बसत असतो, पण क्वचितच ते मिंडानावो बेटांपर्यंत पोहोचतात. शुक्रवारी आलेल्या वादळामुळे मोठे नुकसान झालं असून काही भागांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
रॅपलर या वेबसाईटनुसार लॅनो डे नोर्टे इथं 127 लोकांचा बळी गेला आहे, तर झंबोनगा इथं 50 आणि लॅनो डेल सुर इथं 18 लोक मृत्युमुखी पडले आहेत.
ट्युबोडचे पोलीस अधिकारी गेरी परामी यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं की, दलामा हे दुर्गम गाव पूर्णपणे वाहून गेलं आहे. या गावात काहीही उरले नसून कार्यकर्ते आता तिथं चिखलातून मृतदेह काढत आहेत, असं ते पुढे म्हणाले.
दुसऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पिअॅगापोमध्ये 10 लोकांचा बळी गेला आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी माणसं पाठवण्यात आली आहे, पण त्यात फारशी प्रगती झालेली नाही, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
सिबुको आणि सॅलुग या शहरांमध्येही काही लोकांचा बळी गेला आहे.
वीज पुरवठा आणि संपर्कव्यवस्था खंडीत झाल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत.
मिंडनावो येथील UNICEF चे अधिकारी अॅंड्र्यू मॉरिस म्हणाले, "काही भागात रोगराई पसरण्याचा मोठा धोका आहे. याचा लहान मुलांना मोठा धोका आहे. नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणं, हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे."
ते म्हणाले, "लॅनो देल सूर हा प्रांत फिलिपीन्समधाल सर्वांत मागास प्रांत आहे. इथं सुरू असलेल्या संघर्षामुळं गेल्या 7 महिन्यात 3.50 लाख लोक विस्थापित झाले आहेत."
मरावीमध्ये सुरू असलेल्या सरकार विरुद्ध इस्लामिक जहालवाद्यांच्या संघर्षाच्या अनुषंगाने त्यांनी माहिती दिली.
बलाबॅक बेटांवर या टेबलीन वादळाने दुसऱ्यांदा धडक दिली आणि आता हे वादळ पश्चिमेकडे सरकणार आहे. येत्या 3 दिवसांत हे वादळ दक्षिण व्हीएतनामला धडकणार आहे.
गेल्या आठवड्यात काई-टाक या वादळाचा फिलिपीन्सला फटका बसला होता. त्यातही काही लोक मारले गेले होते.
या परिसराला 2013मध्ये विनाशकारी हैयान या वादळाचा फटका बसला होता. त्यात 5000पेक्षा अधिक लोक मारले गेले होते. या आपत्तीपासून हा परिसर अजूनही सावरत असतानाचा या वादळाचा तडाखा बसला आहे.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)