You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी खरंच मशरूम खाऊन गोरे होऊ शकतात का?
दररोज मशरूम खाल्ल्यानं नरेंद्र मोदींचा रंग उजळला आणि ते टुमटुमीत झाल्याची टीका गुजरात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे नेते अल्पेश ठाकोर यांनी केली होती.
अल्पेश ठाकोर यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत "गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी बऱ्यापैकी सावळे होते. तेव्हापासूनच ते तैवानवरून आयात केलेले महागडे मशरूम खात आहेत. 80 हजार रुपयांचा एक असे पाच मशरूम दररोज खाल्ल्यामुळेच मोदी यांचा रंग उजळला असून ते टुमटुमीत झालेत," असं अल्पेश म्हणताना दिसत आहेत.
पण प्रश्न असा आहे की मशरूम खाल्ल्याने माणूस खरंच गोरा होतो का? मुळात मशरूम खाल्ल्यामुळे आरोग्याला फायदा होतो का? जाणून घ्या.
1) मशरूमच्या असंख्य प्रजाती उपलब्ध असल्या तरी त्यातल्या काहीच खाण्यायोग्य असतात. विषारी मशरुम खाण्यानं माणसाचा मृत्युही होऊ शकतो. काही विषारी मशरूम खाण्यायोग्य मशरूम सारखेच दिसतात, त्यामुळे गोंधळ उडून जीवावर बेतू शकतं. म्हणूनच जंगलात दिसलेले मशरूम न खाता, माणसांनी शेतात उगवलेले मशरुम खाण्याचा सल्ला दिला जातो.
2) प्राचीन इजिप्तच्या लोकांना मशरूम जादूनं येतात असं वाटायचं कारण ते एका रात्रीत उगवतात.
3) मशरूमचे आरोग्याला बरेच फायदे आहेत. आणखी काय फायदे असू शकतील यावर संशोधनही सुरू आहे. बीसीसी फूडनं दिलेल्या वृत्तानुसार कर्करोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता मशरूममध्ये आहे असं संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. मशरूम मानवी गुणसूत्रांना कर्करोगाच्या पेशींपासून होणारा धोका टाळू शकतात.
4) मज्जासंस्थेला इजा पोहचल्यानं होणाऱ्या अल्झायमर (स्मृतिभंश) सारख्या रोगांमधे मशरूमचा औषध म्हणूनही वापर करता येऊ शकतो.
5) मशरूमध्ये ब आणि ड जीवनसत्त्वांचा मोठा साठा असतो. ब जीवनसत्त्व मेंदू आणि मज्जातंतूचं काम सुरळीत होण्यासाठी गरजेचं असतं तर ड जीवनसत्त्व दातांच्या आणि हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचं असतं. मशरूममध्ये सेलेनियम या क्षाराचा साठा असतो त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
6) मशरूममध्ये झिंकचा साठा असतो, त्यामुळे कामेच्छा वाढते आणि लैंगिक आरोग्यही सुधारतं.
7) मशरूम खाल्ल्यानं शरीराला अॅन्टीऑक्सिडंटस मिळतात. या अॅँटीऑक्सिडंटसमुळे शरीरातली विषारी द्रव्यं शरीराबाहेर टाकली जाऊन चेहरा तजेलदार दिसतो. पुण्यातल्या आहारतज्ज्ञ डॉ रिचा कवडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "मशरूम खाऊन कोणी गोरं वगैरे होत नाही. पण मशरूममध्ये खूप सारे गुणधर्म असतात ज्यामुळे आरोग्य सुधारतं."
8) "मशरूममध्ये जवळपास 90 टक्के पाणी असतं त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी राखायलाही मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशरूम खायला एकदम मस्त लागतात, त्यामुळे खाणाऱ्यालाही ते नेहमीच खावेसे वाटतात," रिचा हसत सांगतात.
9) मशरूम कच्चे खाल्ले तर पचनसंस्था सुधारते. मशरूममध्ये असणारा रिबोफ्लोक्सिन नावाचा घटक शरीरातल्या लाल रक्तपेशींचं प्रमाण मर्यादित ठेवतं आणि त्वचेचा पोतही सुधारतो.
आता हे सगळं वाचल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की, मशरूम खाल्ल्याने कोणी फेअरनेस क्रीम लावल्यासारखं गोरं होत नाही. पण मशरूम खाण्याचे फायदेही कमी नाहीत.
हे वाचलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)