पाकिस्तानच्या कायदा मंत्र्यांचा राजीनामा

फोटो स्रोत, AFP/Getty Images
- Author, शुमाइला जाफरी,
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
पाकिस्तानचे कायदा मंत्री जाहिद हमीद यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला.
पंतप्रधान त्यांचा राजीनामा स्वीकारतील, असं मानलं जात आहे.
पाकिस्तानातील बऱ्याच धार्मिक संघटना त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. गेले 22 दिवस जवळपास 3,000 लोक त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इस्लामाबाद इथं धरणे आंदोलन करत आहेत.
तहरिक-ए-लब्बैक या तहरीक-ए-रसूल अल्लाह नावाची संघटना या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे.
या संघटनेनुसार निवडणूक सुधारणेसाठी संसदेत सादर करण्यात आलेल्या विधेयकात इस्लामच्या मूळ तत्त्वांविरोधात जातील असे काही मुद्दे आहेत.
सरकार आणि आंदोलकांत समेट
तहरिक ए लबैक पाकिस्तान (TLF) यांच्या वतीने सरकार आणि आंदोलकांत झालेल्या समेटाचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातून लष्कराने मध्यस्थी केल्यामुळे हा समेट झाला असल्याचे संकेत मिळतात.
यात म्हटलं आहे की, लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीमुळं हे होऊ शकलं आहे. त्यांनी देशाला एका मोठ्या संकटातून वाचवलं आहे.

फोटो स्रोत, NA.GOV.PK
या समझोत्यानुसार कायदामंत्री जाहिद हामीद राजीनामा देतील. तर तहरीक ए लबैक पाकिस्तान त्यांच्या विरोधात कोणताही फतवा काढणार आहे.
2017च्या निवडणूक कायद्यात सुधारणेचा प्रस्ताव देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी स्थापण्यात आलेली संसदीय समिती आपला अहवाल सादर करेल. तर या आंदोलनात ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांना 3 दिवसांत सोडून दिलं जाईल.
आंदोलकांवर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास समिती नेमण्यात येईल. ही समिती 30 दिवसांच्या आत अहवाल सादर करेल. त्यानुसार दोषींवर तातडीने कारवाई केली जाईल.
पाकिस्तानातील आंदोलन
पाकिस्तानातील कायद्यानुसार निवडणूक लढवणाऱ्या सर्व मुस्लीम उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं.
यामध्ये इस्लाममधील शेवटचे पैगंबर महंमद होते, त्यांच्यानंतर दुसरा कुणी पैगंबर झाला नाही, असं लिहून द्यावं लागतं.
आंदोलकांचं असं मत होतं की, ही प्रतिज्ञापत्राची अट प्रस्तावित विधेयकात बदलण्यात आली आणि ते कधीही मान्य करता येणार नाही.
सरकारने ही कारकुनी चूक असल्याचं मान्य करत त्यात दुरुस्ती केली होती. पण आंदोलकांनी याला कायदा मंत्र्याला जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
शनिवारी जाहिद हामीद यांनी पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन 1 तास चर्चा केली होती.
जाहिद यांनी त्यांचा या विधेयकाशी थेट संबंध नसल्याचं म्हटलं होतं. हे विधेयक सर्व पक्षांच्या संमतीनं संसदेत सादर करण्यात आलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








