14व्या वर्षीच तिनं जिंकला चीनचा 'ऑस्कर पुरस्कार'!

फोटो स्रोत, AFP
चिनी चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांना मागे टाकत एका टीनएजर अभिनेत्रीनं "चीनमधला ऑस्कर पुरस्कार" पटकावला आहे.
विकी चेन या 14 वर्षांच्या उदयोन्मुख अभिनेत्रीला 'द बोल्ड, द करप्ट अँड द ब्युटीफूल' चित्रपटातल्या तिच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
या चित्रपटात तिची सहकलाकार आणि हाँगकाँगची अभिनेत्री कारा वाई हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
तैवान येथे दरवर्षी होणाऱ्या 'गोल्डन हॉर्स फिल्म अवार्ड्स' सोहळ्यात फक्त चिनी भाषेतील चित्रपटांना पुरस्कार दिले जातात. म्हणूनच या पुरस्काराला "चिनी भाषेतील ऑस्कर" म्हटलं जातं.
विकीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या 'गोल्डन हॉर्स' पुरस्कारासाठीसुद्धा नामांकन मिळालं होतं.
'द बोल्ड, द करप्ट अँड द ब्युटीफूल'
'द बोल्ड, द करप्ट अँड द ब्युटीफूल' हा चित्रपट एका श्रीमंत कुटुंबात घडलेल्या गुन्ह्याभोवती फिरतो.
एकूण सात पुरस्कारांसाठी या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह तीन पुरस्कार या चित्रपटानं पटकावले.

फोटो स्रोत, AFP
'अँजेल्स वेअर व्हाईट' या चित्रपटातील भूमिकेसाठी विकीचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं होतं.
या चित्रपटात ती एका हॉटेल कर्मचाऱ्याच्या भूमिकेत असते, जी लैंगिक अत्याचाराची साक्षी बनते आणि नंतर त्याबद्दल सर्वांना सांगण्याचं ठरवते.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणं विकीसाठी सोपं नव्हतं. कारण या पुरस्कारासाठी तिच्या शर्यतीत अशा दोन अभिनेत्री होत्या ज्यांनी यापूर्वीच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला होता.
असं असलं तरी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी ती वाई यांना मात देऊ शकली नाही.
'द ग्रेट बुद्धा+'
तैवानचे दिग्दर्शक ह्युआंग हसिन-याव यांच्या 'द ग्रेट बुद्धा+' हा जरी या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला नाही तरी तब्बल त्यानं तब्बल पाच पुरस्कार पटकावले. यामध्ये बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट ओरिजनल पार्श्वसंगीत, या पुरस्कारांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, SAM YEH/GETTY IMAGES
'द ग्रेट बुद्धा+' चित्रपट दोन मित्रांच्या जीवनावर आहे. त्यातला एक आहे पिकल, जो बुद्धमूर्तीच्या कारखान्याचा रखवालदार आहे. आणि दुसरा आहे आहे बेली बटन, जो रिसायकल करता येण्याजोग्या वस्तू गोळा करण्याचं काम करत असतो.
ही जोडी मिळून पिकलच्या बॉसचं असं काही फूटेज मिळवतात ज्यातून त्याची अनेक क्रूर रहस्य बाहेर येतात.
तैवानी-अमेरिकन दिग्दर्शक अँग ली आणि अमेरिकन अभिनेत्री जेसिका चॅस्टेन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान केला.
हॉलिवूडचे अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर मिळवणारे ली हे पहिले आशियाई दिग्दर्शक होते. 2006 साली त्यांच्या 'ब्रोकबॅक माऊंटन' चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला होता.
तर चॅस्टेनला 2013 साली 'गोल्डन ग्लोब' या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'झीरो डार्क थर्टी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








