गुजरात : '2002 नंतर पंधरा वर्षं आम्ही मतदान केलं, आता मात्र नाही'

अबरार अली सय्यद
फोटो कॅप्शन, अबरार अली सय्यद
    • Author, दिव्या आर्या
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गुजरातमधल्या 2002 च्या दंगलीनंतर अहमदाबादमधून विस्थापित झालेली मुस्लीम कुटुंब, तरुण आणि महिलांसाठी ही विधानसभा निवडणूक किती महत्त्वाची आहे याचा बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्या यांनी घेतलेला मागोवा.

अहमदाबाद शहराजवळ येता-येता अचानक एक डोंगर दिसू लागतो. याची उंची दररोज वाढत आहे. शहरातील कचऱ्यापासून तयार झालेला हा डोंगर आहे. सगळीकडे धूर, विषारी वायू, दुर्गंधीचं साम्राज्य आहे. रेश्मा आपा या डोंगराच्या बाजूलाच राहतात.

रेश्मासकट दंगलीमध्ये विस्थापित झालेली शंभरवर कुटुंब इथं राहतात. 'सिटिझन नगर'च्या मुख्य रस्त्यापासून खूप दूरवर, लहान गल्ल्यांचा चक्रव्यूह भेदत गेल्यावर त्यांच घर सापडतं.

संध्याकाळचे सहा वाजले आहेत. मी त्यांना 'सिटिझन नगर'च्या राहत क्लिनीकसमोर भेटते.

या समाजानं जसं सिटिझन नगर वसवलं तसंच या वस्तीतला हा एकमेव दवाखाना देखील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं उभारण्यात आला. या उभारणीत सरकारचं शून्य योगदान आहे.

रेश्मा आपा सांगतात सरकारनं कुठलिच मदत नाही केली.
फोटो कॅप्शन, रेश्मा आपा

शहरातलं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नरोडा-पाटियापासून दूर इथं येऊन राहावं लागलेल्या रेश्मा सांगतात, "दंगलीनंतर सरकार किंवा विरोधीपक्ष यापैकी कुणीच आमच्या मदतीला आलं नाही."

"घर, शाळा, दवाखाना, रोजगार यातलं काहीच आम्हाला मिळालं नाही. 15 वर्षं मतदान करून बघितलं. आता यावेळेस मतदान नाही करणार."

एका रांगेत असलेली दोन खोल्यांचं एकमजली घरं. या घरांबाहेर विजेचं मीटर लावलेलं आहे. पण सांडपाण्यासाठी नाला नाही. आतले रस्ते सुद्धा डांबरी नाहीत.

सिटीझन नगर
फोटो कॅप्शन, सिटिझन नगर

एक सरकारी शाळा वस्तीपासून तीन किलोमीटर दूरवर आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना रिक्षा किंवा बस सारख्या वाहनांची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळं शाळेचा प्रवास महाग ठरतो.

एका मतदारासाठी सरकार म्हणजे काय असतं?

अबरार अली सय्यद हे 2002च्या गुजरात दंगलीच्यावेळी 22 वर्षांचे होते. त्यांनी राहत क्लिनिक आणि इतर सुविधांसाठी डॉक्टर आणि पैसे उपलब्ध करून दिले.

फेब्रुवारी-मार्च महिन्यातल्या त्या तीन दिवसांनंतरच्या अनेक महिन्यांपर्यंत अबरार यांना अहमदाबादमधल्या शाह आलम भागातून आपलं घर सोडून सुरक्षित जागी पळावं लागलं होतं.

अनेक वर्षांपर्यंत त्यांना रात्री घाबरवून सोडणारी स्वप्न पडायची. पुन्हा हिंसा होण्याची भीती आणि 'मुल्ला-मिंया'चे टोमणे सतत त्यांना ऐकावे लागले.

राहत क्लिनिक हा एकमेव दवाखाना या भागात आहे.
फोटो कॅप्शन, राहत क्लिनिक हा एकमेव दवाखाना या भागात आहे.

आता अबरार हे अहमदाबाद विद्यापीठात शिकवतात. त्यांच्यामते मागील 15 वर्षांतला त्यांचा अनुभव हेच सांगतो की, कुठल्याही राजकीय पक्षाकडून अपेक्षा न ठेवता लोकांवर जास्त विश्वास ठेवावा.

ते म्हणतात, "2002 च्या दंगलींनंतर भाजप सरकारनं हिंदू-मुस्लीम समुदायात नेहमी फरक केला हे तर स्पष्ट आहे. पण 80 च्या दशकात काँग्रेसनंच धार्मिक वादाला खतपाणी घातलं होतं. तसंही आता राहुल गांधी मुस्लीम नेत्यांना कुठं भेटत आहेत?"

15 वर्षांतील महत्त्वाचे बदल कदाचित याच प्रश्नांमध्ये दडलेले आहेत.

विस्थापितांची कॉलनी

दंगलीमुळे विस्थापित झालेल्या 36 कुटुंबांना अहमदाबादपासून चार तासांच्या अंतरावर वसवण्यात आलं आहे.

बुरहानपूरमध्ये असलेल्या या कॉलनीला सरकारनं नव्हे तर समाजाच्या लोकांनी एकत्र वसविलं आहे. इथंही गटारं नाहीत. भरपूर दुर्गंधी पसरलेली असते. गॅस लाईन नसल्यानं आजही स्वयंपाक चुलीवरच केला जातो.

बुरहानपुरातील विस्थापितांनी वसवलेली कॉलनी
फोटो कॅप्शन, बुरहानपुरातील विस्थापितांसाठी वसवलेली कॉलनी

सतरा वर्षांच्या इक्रा अस्लम शिकारीनं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. मुस्लीम समाजाच्यावतीनं चालवण्यात येणाऱ्या शाळेत ती शिकली आहे.

जेव्ही मी तिला भेटले तेव्हा तिनं ताडकन उत्तर दिलं, "पाच वर्षांपूर्वी सगळेच आले होते. मीडियावाले आले, नेते पण आले होते. आजपर्यंत काहीच झालं नाही. तुमच्याशी आम्ही का म्हणून बोलायचं? त्यानं काय बदल होणार आहे?"

इक्रा अस्लम
फोटो कॅप्शन, इक्रा अस्लम

इथल्या वस्तीत राहणारी बहुतांश कुटुंब ही बडोद्याहून पळून आलेली आहेत. आता शिलाईची कामं करतात. काहीजण अगरबत्तीच्या फॅक्टरीमध्ये मजुरी करतात.

'सिटिझन नगर'मधील घरांपेक्षाही इथली घरं लहान आहेत. 34 वर्षांच्या समीरा हुसेन सांगतात इथं राहायला जागाच इतकी कमी आहे की अनेकदा घरातील पुरूषांना शेतांमध्ये झोपण्यासाठी जावं लागतं.

मुली शिकत आहेत

समीरा यांच लग्न इथंच झालं. विस्थापित कुटुंबातील एकाशी. समोर दुसरा पर्यायही नव्हता.

समीरा यांचं आठवीपर्यंत शिक्षण झालं आहे. त्या म्हणतात, दंगलींच्याआधी मुस्लीम मुली एवढंच शिकत होत्या.

आता त्यांना 10 वर्षांची एक मुलगी असून एक लहान मुलगाही आहेत. दोन्ही शाळेत जातात.

समीरा म्हणतात अद्यापही नुकसानभरपाई नाही मिळाली.
फोटो कॅप्शन, समीरा म्हणतात अजूनही नुकसान भरपाई नाही मिळाली.

समीरा म्हणतात, "ना आम्हाला कुठली नुकसान भरपाई मिळाली, ना राहायला एखादं घर. कोणत्याच राजकीय पक्षानं काहीच दिलं नाही. आता मुलांसाठी तरी काहीतरी करा. ती नोकरी करण्यालायक होतील, काही कमावू शकतील. हे तरी बघा."

आदिवासी आणि मुस्लीम समाजातील मुलं आणि तरुणांसाठी गेली अनेकवर्षं 'उर्जा घर' ही संस्था काम करते. या संस्थेत काम करणारे वकार काझी मानतात की, मुस्लीम समाजातील महिला आता कणखर झाल्या आहेत.

ते म्हणतात, "दंगलीनंतर मुस्लीम समाजातील पुरूष दहशतीत होते. त्यामुळे मग पोलीस, राहत कमिटी, न्यायपालिका, रोजगार यासारख्या अनेक क्षेत्रात महिलांना समोर यावं लागलं. काळानुसार त्यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केलं."

बुरहानपुरातील विस्थापितांनी वसवलेली कॉलनी
फोटो कॅप्शन, विस्थापितांनी वसवलेली कॉलनी

आता शिक्षणाचं महत्त्व सर्वांना पटलं आहे. मुलींना शिकवलं जात आहे. खरंतर यात मुस्लीम समाज आणि संघटनांचं योगदान मोठं आहे.

अबरार यांनाही आता सिटिझन नगरमध्ये राहत क्लिनीक नंतर मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी व्यवस्था निर्माण करायची आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रयत्नांमध्ये मुस्लिमेतर समुदायातील लोकांचाही सहभाग आहे. कदाचित यामुळेच या 15 वर्षांमध्ये राजकारणावरून जेवढा विश्वास उडाला आहे, तेवढाच माणुसकीवर अजूनही कायम आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)