इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये नव्या पोकळीचा शोध

इजिप्तच्या पिरॅमिडबाबत सर्वांनाच कुतूहल असतं. या पिरॅमिडचं रहस्य काय आहे याची नेहमीच चर्चा होत असते. पण, या पिरॅमि़डभोवती असणारं गूढतेचं वलय आणखी वाढणार असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. कारण खुफू पिरॅमिडमध्ये एक पोकळी असल्याचा शोध लागला आहे.

पिरॅमिडच्या निर्मित्यांना पिरॅमिडमध्ये ही जागा रिकामी का ठेवली याचं कारण कुणालाच माहिती नाही. जर त्या ठिकाणी जाताचं येणार नाही तर ही जागा त्यांनी अशी रिकामी का ठेवली? असा प्रश्न संशोधकांना पडला आहे.

जपान आणि फ्रेंच संशोधकांनी दोन वर्षांच्या अभ्यासानंतर ही घोषणा केली आहे. या संपूर्ण टीमला स्कॅन पिरॅमिड टीम म्हणतात. या टीमनं पिरॅमिडच्या गुंतागुंतीच्या रचनेचा अभ्यास करून हा दावा केला.

मोठ्या दगडांची घनता तपासण्यासाठी मुयोग्राफी ही पद्धत वापरतात. या पद्धतीचा वापर करून मोठ्या दगड्यांची आतील रचना कशी आहे याचा अभ्यास केला जातो.

द ग्रेट पिरॅमिड किंवा खुफू पिरॅमिड फराओह खुफूच्या कारकीर्दीत इ. पू. 2509 ते 2483 या काळात बांधण्यात आलं होतं. खुफू पिरॅमिडची उंची 460 फूट आहे. कैरो शहराच्या बाहेर गिझा येथे असलेले सर्वांत मोठं पिरॅमिड आहे.

  • पिरॅमिड तपासलं असता असं आढळलं की पिरॅमिडच्या उत्तरेला पोकळी आहे.
  • ही पोकळी 30 मीटर लांब आहे आणि उंची देखील काही मीटर्सची आहे.
  • तीन वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा उपयोग करून पिरॅमिडच्या रचनेचा अभ्यास करण्यात आला.

काय आहे खुफू पिरॅमिडमध्ये?

खुफूमध्ये तीन दालनं आहेत आणि काही भुयारं आहेत. यामध्ये सर्वांत लक्षवेधक आहे ती 47 बाय 8 मीटरची गॅलरी. नव्यानं जी पोकळी सापडली आहे ती या चेंबर्सच्या बरोबर वर आहे.

"अजून या पोकळीबाबत बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहीत नाही. ही पोकळी आडवी आहे की झुकलेली किंवा ही रचना एकचं आहे की सलग रचनांची मिळून बनलेली आहे याचा अभ्यास अजून झाला नाही," असं एचआयपी इंस्टिट्यूटचे संशोधक मेहदी तयुबी यांनी म्हटलं.

"आम्ही हे खात्रीशीरपणे सांगू शकतो पिरॅमिडमध्ये पोकळी आहे. आतापर्यंत कुणालाच हे माहीत नव्हतं की या पिरॅमिडमध्ये पोकळी आहे," असं ते म्हणाले.

अभ्यासकांच्या टीमचं असं म्हणणं आहे की ही पोकळीचं आहे. दालन नाही.

"खुफू पिरॅमिडमध्ये अनेक भाग आहेत. दगडांचा भार विभागला जाऊन हे पिरॅमिड कोसळू नये म्हणून ही रचना करण्यात आली आहे. उदाहरणार्थ राजाच्या दालनाच्या वरच्या भागात अशा पाच जागा आहेत," असं संशोधक सांगतात.

प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ मार्क लेहनर यांच्या मार्गदर्शनात हे काम सुरू आहे.

"आम्ही मुयॉन सायन्सद्वारे हा अभ्यास करत आहोत. ध्वनी लहरींच्या सहाय्यानं आम्ही हा अभ्यास करतो. पण या शोधाचं महत्त्व काय आहे याचा अभ्यास अजून झाला नाही."

"पिरॅमिडला भव्य दालन आहे. पण, त्या दालनाचं छत हे निमुळतं आहे. हे छत सुरक्षित राहण्यासाठी ही पोकळी निर्मात्यांनी सोडली असावी," असं लेहनर यांनी बीबीसीला सांगितलं.

"जो शोध लागला आहे तो खूप वेगळा आहे. ही गोष्ट पिरॅमिडच्या रचनेच्या विसंगत आहे. ब्रिटीश इजिप्टॉलॉजिस्ट (इजिप्तची संस्कृती आणि भाषेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ) हॉवर्ज वायसे यांनी 1800 मध्ये दारुगोळ्यानं स्फोट घडवून पिरॅमिडचे मार्ग शोधले होते तसं आताच्या काळात आपल्याला करता येणार नाही."

"ही पोकळी खूप मोठी आहे. भार सहन करण्याच्या उद्देशाने ही पोकळी ठेवण्यात आली नसावी," असं टीममधील एक संशोधक हेनी हेलाल म्हणतात.

"आम्ही हे पिरॅमिड कसं बांधलं? याची रचना कशी आहे याचा आम्ही सध्या अभ्यास करत आहोत," असं ते म्हणाले.

"प्रसिद्ध एजिप्टॉलॉजिस्ट, पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि वास्तूरचनाकारांचं यांची काही गृहीतकं आहेत. मुयोग्राफीच्या मदतीनं मिळालेला डेटा आम्ही त्यांना देतो. त्या आधारावर ते पुढील अभ्यास करू शकतील. ग्लेशियर्स आणि ज्वालामुखीचा अभ्यास करण्यासाठी गेल्या 50 वर्षांपासून मुयोग्राफीचं तंत्र वापरलं जातं," असं त्यांनी सांगितलं.

इतकंच नाही तर फुकूशिमा येथील अयशस्वी न्युक्लियर रिअॅक्टरच्या तपासणीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.

काय आहे मुयोग्राफी ?

मुयोग्राफीमध्ये अवकाशातून पृथ्वीवर अतिशक्तींच्या कणांचा मारा केला जातो.

जेव्हा अति-जलद कॉस्मिक किरणं वायुकणांवर आदळतात तेव्हा डॉटर पार्टिकल्स तयार होतात. त्यामध्ये मुयॉन्सचा समावेश देखील असतो.

काही कण हे दगडांद्वारे शोषले जातात आणि दगडांमध्ये असलेल्या खनिजांमुळे ते आपला मार्ग बदलतात.

ज्या भागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या ठिकाणी जर आपण मुयॉन डिटेक्टर ठेवलं तर आपल्याला घनतेतील विसंगतीचं चित्र स्पष्ट होतं.

"मुयॉग्राफीनं ढोबळ वैशिष्ट्य समजतात. पिरॅमिडच्या आतील सच्छिद्रतेचा शोध मुयॉग्राफीनं घेता आला नाही," असं पॅरिस-सेकले विद्यापीठाचे संशोधक सेबेस्टियन प्रोक्युरेअर यांनी सांगितलं.

"मुयॉन्समुळे एकात्मिक घनतेचं मोजमाप करता येतं. जर त्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी छिद्र असतील तर सर्व दिशांना एकात्मिक घनता ही कमी-अधिक असू शकते."

"कारण आपल्याला याठिकाणी सरासरी गृहीत धरावी लागेल. पण जर मुयॉन्स हे प्रमाणाबाहेर दिसले तर त्या ठिकाणी मोठी पोकळी आहे असा अर्थ निघतो," असं ते सांगतात.

आता प्रश्न हा आहे की पुढील शोध कसा घ्यावा?

"शोध कसा घ्यावा याची संशोधकांना माहिती आहे. पण, आम्हाला इजिप्तच्या अधिकाऱ्यांकडून पुढील शोधाला परवानगी हवी," असं जीन बाप्टीज मॉरे यांनी म्हटलं आहे.

मॉरे हे फ्रेंच नॅशनल इंस्टिट्यूट फॉर कम्प्युटर सायंस अॅंड अप्लाइड मॅथेमॅटिक्समध्ये संशोधक आहेत.

"रोबोच्या मदतीनं पुढील संशोधन करण्याचा आमचा विचार आहे. या वास्तूला 3 सेंटीमीटरचं छिद्र करायचं. त्यात एक छोटा रोबो फिट करायचा आणि अभ्यास करायचा. सध्या आम्ही उडत्या रोबोंवर काम करत आहोत," असं ते म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)