मुगाबे यांची WHO च्या सदिच्छा दूतपदी झालेली नियुक्ती रद्द

फोटो स्रोत, Reuters
जगभरातून टीकेची झोड उठल्यानंतर WHO नं रॉबर्ट मुगाबे यांची सदिच्छादूत म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
WHO चे नवे प्रमुख टॉडरॉस अॅडनाम यांनी मुगाबे यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली होती.
पण, मुगाबे यांच्या नियुक्तीला वेलकम ट्रस्ट, एनसीडी अलायंस, यूएन वॉच, द वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि अॅक्शन अगेंस्ट स्मोकिंग या संस्थांनी तीव्र विरोध दर्शवला होता.
मुगाबे यांच्या तीस वर्षांच्या कार्यकाळात झिम्बाब्वेची सार्वजनिक आरोग्यसेवा पूर्णतः कोलडमडली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. औषधींचा तुडवडा आहे. असं टीकाकारांच म्हणणं आहे.
झिम्बाब्वेमधले मानवाधिकार कार्यकर्ते आणि विधीज्ज्ञ डग कोल्टर्ट यांनी "देशाच्या आरोग्य क्षेत्राचं उच्चाटन करणाऱ्या सदिच्छादुता विषयी WHO ला कसं वाटतं? असा प्रश्नही ट्विटरवर उपस्थित केला होता.

फोटो स्रोत, Twitter
93 वर्षांचे मुगाबे स्वतः उपचारासाठी गेल्या तीस वर्षांपासून विदेशात जात असल्याचं काही लोकांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.
ब्रिटीश सरकारनं मुगाबे यांची निवड "आश्चर्यकारक आणि तेवढीच निराशाजनक" असल्याचं म्हटलं होतं. या निवडीमुळे WHOची कामगिरी झाकोळली जाऊ शकते असा इशाराही दिला होता.
तर "मला वाटलं हा एप्रिल फूलचा एक खराब जोक होता", असं कॅनडियन पंतप्रधान जस्टीन ट्रुडाव यांनी म्हंटलं होतं.
"मानवी हक्क आणि मानवी सन्मानासाठी झटणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या मूल्यांचा हा स्पष्टपणे विरोधाभास आहे", असं अमेरिकेनं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
युरोपियन युनियन आणि अमेरिकेनं वेळोवेळी रॉबर्ट मुगाबे यांनी केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात टीका केली आहे.
पण, आता WHO चे नवे प्रमुख टॉडरॉस अॅडनाम यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून रॉबर्ट मुगाबे यांची नियुक्ती रद्द केली आहे.
टॉडरॉस अॅडनाम हे WHO च्या प्रमुखपदी विराजमान होणारे पहिले आफ्रिकन व्यक्ती आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








