बीबीसीची '100 वुमेन ऑफ द ईयर' सीरिज लवरकच तुमच्या भेटीला

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीच्या '100 वुमेन ऑफ द ईयर' तुमच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहेत. आतापर्यंत 60 जणींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
शिक्षणतज्ज्ञ ऊर्वशी साहनी, लेखक आणि कार्यकर्त्या ईरा त्रिवेदी, भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आदी भारतीय महिलांचा यात समावेश आहे.
तसंच नासाच्या अंतराळवीर पॅगी व्हिस्टन, लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्ष एलन जॉन्सन सरलीफ तसंच इंग्लंडच्या फुटबॉलपटू स्टेफ हॉटन यांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरित 40 जणींची नावं लवकरच जाहीर करण्यात येतील.
जगभरातील महिलांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचं काम बीबीसीची '100 वुमेन ऑफ द ईयर' ही सीरिज करत असते. या सिरीजच्या माध्यमातून यावर्षी महिलांना बदल घडवण्यासाठी प्रेरित केलं जाणार आहे.
यामध्ये कवयित्री रुपी कौर, असिड हल्ल्यातून वाचलेली रेशम खान आणि टीव्ही स्टार जिन झिंग यांच्या नावांचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
न संपणारा छळ, असमानता आणि समाजात बहुतेक स्तरांवर होणारं दुर्लक्ष, यामुळं महिलांमध्ये निराशेची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळं याप्रकारच्या भेदभावांना हाताळण्यासाठी आम्ही या वर्षीच्या सत्रात महिलांना नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्याबद्दल विचारत आहोत.
काय आहेत महिलांच्या मुख्य समस्या?
100 वुमेन ऑफ द ईयर या सीरिजचं हे पाचवं वर्षं आहे.
यंदा या सीरिजमध्ये "ग्लास सिलिंग" म्हणजेच महिलांच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करणारे विविध समज, महिलांमधील निरक्षरता, सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ आणि खेळांमध्ये होणारा स्त्री-पुरुष भेदभाव, या चार बाबींवर भर देण्यात येणार आहे.

काय आहे 100 वुमेन?
जगभरातल्या प्रतिभावान आणि प्रेरणादायी अशा 100 महिलांचा समावेश बीबीसीच्या '100 वुमेन ऑफ द ईयर'मध्ये दरवर्षी केला जातो.
सध्या महिला प्रामुख्यानं ग्लास सिलिंग, महिलांमधील निरक्षरता, सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ आणि खेळांमध्ये होणारा स्त्री-पुरुष भेदभाव या चार समस्यांना सामोरं जात आहेत.
2017 साली निवडण्यात आलेल्या 100 जणींना आम्ही या समस्या हाताळण्याचं आव्हान करत आहोत.
ज्याद्वारे वास्तविक जीवनात अंमलबजावणी करता येतील, असे उपाय त्या घेऊन येतील. तसंच तुम्हीही स्वत:च्या कल्पना मांडून यात सहभागी व्हाल, अशी आमची अपेक्षा आहे.
काय करणार 100 वुमेन?
या यादीतील काही जणी ऑक्टोबर महिन्यातंल्या चार आठवड्यांत, चार वेगवेगळ्या शहरांत काम करण्यासाठी एकत्र येतील. यातून वरील समस्या भेडसावत असलेल्या महिलांना मदत होईल असा उपक्रम सुरु करतील.
बाकी त्यांच्या-त्यांच्या प्रदेशातून या एकत्र आलेल्या महिलांना पाठिंबा आणि प्रेरणा देण्याचं काम करतील.

फोटो स्रोत, Getty Images
जर अधिकाधिक महिलांनी त्यांच्या कल्पना आणि कौशल्यं आमच्यासोबत शेयर केली तर राहिलेल्या 40 महिलांची नावेही याच आठवड्यांत समाविष्ट करण्यात येईल.
ही चारही आव्हानं पार करण्यात 100 वुमेन यशस्वी झाल्या तर त्याचं श्रेय जगभरातल्या महिलांना जाईल. ज्यांनी या समस्या का आणि कशामुळं महत्त्वाच्या आहेत, याबद्दलच्या समजुतीला विशिष्ट आकार दिला.
कारण, दृष्टीस पडलेल्या उत्तमोत्तम कल्पना त्यांनी शेयर केल्या आहेत किंवा त्या स्वत: त्यांच्याबरोबर वेगळं काहीतरी घेऊन आल्या आहेत.
जगाशी संवाद साधणार 100 वुमेन
हे फक्त कल्पनांपुरतंच मर्यादित नाही. 100 वुमेन रेडियो, ऑनलाईन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ग्लास सीलिंग हे सॅन फ्रान्सिस्कोसाठी मोठं आव्हान आहे, महिलांमधील निरक्षरता हे दिल्लीतील मोठं आव्हान आहे, सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ हे लंडनमधील मोठं आव्हान आहे, तर खेळांमध्ये होणारा स्त्री-पुरुष भेदभाव हे रिओमधील मोठं आव्हान आहे.
असं असलं तरी या समस्यांबद्दल वैश्विक स्तरावर संवाद साधला जाणार आहे आणि आम्हाला यात जगभरातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.
तुम्हीही सहभागी होऊ शकता
"2015 साली 10 भाषा आणि 30 देशांमध्ये महिलांनी एकूण 150 डिबेट होस्ट केल्या होत्या. 2016 साली ही संख्या 450 एवढी होती आणि यंदा मात्र आम्ही याला नवीन पातळीवर घेउन जाणार आहोत," असं 100 वुमेनच्या संपादक फियोना क्रॅक यांनी सांगितलं.
"या 100 जणी कोण-कोणते उपाय घेऊन येतील आणि या एका महिन्यात त्या या समस्यांचं कसं निराकरण करतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल," असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
या बाबींकडे पाहून आम्हाला या उपक्रमासाठी प्रेरणा मिळाली.
तेव्हा सोशल मीडिया किंवा खालील फॉर्मद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. तसंच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातूनही तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








