You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहिंग्या प्रश्न : आंतरराष्ट्रीय दबावाची भीती वाटत नाही - सू ची
रोहिंग्या मुस्लिम प्रश्नाच्या हाताळणीप्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येत असलेल्या दबावाची भीती वाटत नाही असं मत म्यानमारच्या नेत्या आँग साँग सू ची यांनी व्यक्त केलं.
म्यानमारच्या नागरिकांना संबोधून केलेल्या भाषणात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
राखिन प्रांताचा प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्राचं सहाय्य घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बांगलादेशात आश्रय घेतलेल्या नागरिकांना देशात परत घेण्यासाठी तयार असल्याचं सू ची यांनी सांगितलं.
धर्म, वंशाच्या मुद्यावरून देशाची विभागणी होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.
म्यानमारच्या राखिन प्रांतातील चार लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर आतापर्यंत आँग यांनी मौन बाळगलं होतं.
मंगळवारी पहिल्यांदाच सू ची यांनी रोहिंग्याप्रकरणी म्यानमार सरकारची भूमिका स्पष्ट केली.
सर्व मुस्लिमांनी म्यानमार सोडलेलं नाही. तसंच रोहिंग्याप्रकरणी देशात उसळलेला हिंसाचार आटोक्यात आला आहे असं सू चीा यांनी म्हंटलं आहे.
रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीनं हाताळल्याप्रकरणी सू ची यांच्यावर जगभरातून टीका होत आहे.
मला रोहिंग्या मुस्लिमांशी बोलायचं आहे. ते देश सोडून का जात आहेत यामागचं कारण समजून घ्यायचं आहे असं आँग यांनी स्पष्ट केलं आहे.
सू ची यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेली गावं राखिन प्रांतात आहेत. यापैकी सगळ्यांनी देश सोडलेला नाही. आंतरराष्ट्रीय समुदायातील सदस्यांना या भागात येण्याचं आम्ही आमंत्रण देतो.
- राखिन प्रांतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती का चिघळली हे समजून घ्यायचं आहे. देश सोडून जाणाऱ्या नागरिकांशी बोलण्यासाठी आम्ही तयार आहोत.
- राखिन प्रांतात जे घडलं ते निश्चितच दुर्देवी आहे. पीडितांच्या दु:खाची आम्हाला कल्पना आहे. बांगलादेशला जात असलेल्या मुसलमानांबद्दल आम्हाला चिंता वाटते.
- म्यानमारमध्ये शांतता असावी याकरता आपण सगळ्यांनी 70 वर्ष संघर्ष केला आहे. मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा आम्ही निषेध करतो. कायद्याचं राज्य आणि शांततापूर्ण वातावरण नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- म्यानमारची संरचना जटिल आहे. देशातल्या विविध स्वरुपाच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात असं नागरिकांना वाटतं. राखिन प्रांतातील प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रस्तरीय समितीची स्थापना केली आहे.
- राखिन प्रांतातला अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव डॉ. कॉफी अन्नान यांना बोलावलं आहे.
- राखिन प्रांतात स्थिरता यावी आणि विकासाचं चक्र फिरतं व्हावं यासाठी गेल्यावर्षीपासून आम्ही प्रयत्नशील आहोत. म्यानमारमधील राखिन म्हणजे पीडितांचा परिसर असं जगानं पाहू नये. संपूर्ण म्यानमारचा विचार करावा.
- जे नागरिक देशात परत येण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ओळख प्रक्रिया सुरू करण्यासाठी आम्ही तयार आहोत. धर्म तसंच वंशाच्या मुद्यावरून म्यानमारची फाळणी होऊ नये असं आम्हाला वाटतं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)