You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गिरीश बापट यांचं निधन, नगरसेवक ते खासदारकीपर्यंत असा होता प्रवास
भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांचं निधन आज (29 मार्च) पुण्यात निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते.
गिरीश बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवरच होते.
गिरीश बापट यांचं जाणं हा भाजपच्या पुणे आणि राज्यातील कार्यकर्त्यांसाठी धक्का असल्याचं सांगत भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जगदीश मुळीक यांनी म्हटलं की, जवळपास एक ते दीड वर्षं त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ते उपचार घेत होते. त्यांनी अतिशय धाडसाने आजारपणाशी झुंज दिली.
गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे
गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास
गिरीश बापट यांनी नगरसेवक म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
नगरसेवक ते खासदार असा जवळपास चाळीस वर्षांचा त्यांचा प्रवास होता.
टेल्को कंपनीत कामाला असलेले गिरीश बापट राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत आपल्या सार्वजनिक आयुष्याला सुरूवात केली होती.
1980 साली त्यांची पुणे शहर भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती झाली.
1983 साली ते पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले
1983 पासून राजकारणात सक्रीय असलेले गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार राहिले आहेत.
ते 1995 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
2014 साली देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
2019 च्या निवडणुकीत बापट खासदार म्हणून निवडून आले.
नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी आजारपण बाजूला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.
या मेळाव्याला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. या परिस्थितीमध्येही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.
सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले- एकनाथ शिंदे
राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, "दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो.
त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला."
'जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले'
खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले आणि राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, "पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती."
"पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असताना सुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे."
गिरीश बापट यांना राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ट्वीट करून गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली.
आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी म्हटलं, "लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला."
"गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांनी म्हटलं, "राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आजाराशी ते निर्धारानं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. त्यांच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं आहे."
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, "गेली अनेक महिने गिरीश बापट आजारी होते. ते आजारी असताना मी त्यांना भेटायला दवाखान्यात गेलो होतो त्यांची प्रकृती पाहिल्यानंतर मला चिंता वाटत होती गिरीश बापट यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत पुणे शहराचे प्रतिनिधित्व केलं आहे शहराच्या विकासाचा कोणताही मुद्दा असला तर त्यात गिरीश बापट आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडत होते महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक वर्ष त्यांनी काम केल्यानंतर त्यांनी लोकसभेत यायला हवं असं सुचवण्यात आलं होतं ती सूचना त्यांनी स्वीकारली आणि त्यानंतर लोकसभेमध्ये त्यांनी पुण्याचे प्रश्न मांडले राजकारणात मतभेद असतात परंतु गिरीश बापट यांनी सर्वपक्षीय सलोखा चांगल्या प्रकारे जपला होता एका चांगल्या संसदपटटू ला आज आपण मुकलो आहे. मी कुटुंबासह त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जात आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)