कर्नाटकात दोन महिला IAS-IPS अधिकाऱ्यांमध्ये वाद, दोघींवरही पदमुक्तीची कारवाई

फोटो स्रोत, @D_Roopa_IPS/K Venkatesh
- Author, इम्रान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
कर्नाटकातील दोन उच्चपदस्थ महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भांडणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आयपीएस अधिकारी रूपा मौदगिल आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यात वैयक्तिक कारणावरून सुरू झालेल्या वादानं मोठं रूप घेतलंय.
या दोन्ही उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांमधील वाद समोर आल्यानंतर, कर्नाटक सरकारनं दोघींवरही कारवाई केलीय. या रूपा मौदगिल आणि रोहिणी सिंधुरी यांना पदमुक्त केलंय. दोघींनाही नवीन नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.
रूपा मौदगिल या कर्नाटक हातमाग विकास प्राधिकारणाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यांना या पदावरून मुक्त केलंय. तर रोहिणी सिंधुरी या हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय विभागाच्या आयुक्त होत्या. त्यांनाही पदमुक्त करण्यात आलंय.
रूपा मौदगिल यांचे पती मुनिश मौदगिल हे पर्सोनेल अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म (DPAR) विभागाचे प्रधान सचिव आहेत.
रूपा मौदगिल यांनी रोहिणी सिंधुरी यांच्यावर सोशल मीडियावरून जाहीर आरोप केले. त्यानंतर दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.
या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी काल मुख्य सचिव वंदिता शर्मांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली. त्यानंतर सार्वजनिकरित्याही आरोप-प्रत्यारोप केले.
हे प्रकरण नेमकं काय आहे?
कर्नाटकात दोन हाय प्रोफाईल महिला अधिकाऱ्यांचं भांडण सध्या चव्हाट्यावर आलं आहे. या अधिकाऱ्यांच्या भांडणामुळे कर्नाटक प्रशासनसाची नाचक्की झाली आहे आणि राजकीय नेते हैराण झाले आहेत.
एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने एका आयएएस अधिकाऱ्यावर काही खासगी आणि काही कामासंबंधी आरोप लावले आहेत.
वैयक्तिक आरोपांमध्ये तीन-चार पुरुष अधिकाऱ्यांबरोबर काही खासगी फोटो शेअर करण्यासारखा अनुचित व्यवहार केल्याचा आरोप आहे.
आयपीएस अधिकारी डी. रुपा मौदगिल यापूर्वी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल असं काही बोलल्या की त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) या पदावरून जावं लागलं होतं.
ताज्या प्रकरणात त्यांनी आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यावर आरोप लावले आहे. सिंधुरी मांड्या जिल्ह्यात 2015 मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या तेव्हा त्यांना एक लाख स्वच्छतागृह बांधल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कारही मिळाला होता.
रुपा मौदगिल यांचा दावा आहे की रोहिणी सिंधुरी यांनी एक लाख स्वच्छतागृह हा आकडा चुकीचा सांगितला होता.
मौदगिल सध्या कर्नाटक हस्तमाग विकास कॉर्पोरेशनच्या महासंचालक आहेत. सिंधूरी हिंदू रिलिजिअस इन्स्टिट्यूशन अँड चॅरिटेबल इनडॉवमेंट डिपार्टमेंटच्या आयुक्त आहेत.
नोकरशाहीची फजिती
आपल्यावर लावलेल्या आरोपांच्या उत्तरादाखल सिंधुरी यांनी पत्रकारांना सांगितलं की त्या योग्य प्लॅटफॉर्मवर त्याचं उत्तर देतील आणि सध्या त्या म्हणतात की मौदगिल 'लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात'.
बीबीसी हिंदी बरोबर शेअर केलेल्या एका निवेदनात त्या म्हणतात, "मानसिक आजार ही एक मोठी समस्या आहे. ते बरे होण्यासाठी औषधं आणि समुपदेशन करायला हवं."
कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी या मुद्द्यावर मत नोंदवलं आहे.

फोटो स्रोत, K Venkatesh
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "हे अधिकारी त्यांचे खासगी वाद सार्वजनिक करू शकत नाहीत. कर्नाटकातल्या नोकरशाहीचा हा अपमान आहे. मी मुख्य सचिवांशी बोललो आहे आणि त्यांना तातडीने कारवाई करायला सांगितलं आहे."
यादरम्यान मौदगिल यांनी रोहिणी सिंधुरी यांच्या विरुद्ध 19 आरोपांची सूची एका पत्राच्या माध्यमातून मुख्य सचिव आणि कार्मिक मंत्रालयाच्या सचिवांना पाठवली आहे.
तर दुसरीकडे सिंधुरी यांचे पती सुधीर रेड्डी यांनी मौदगिल यांच्या विरुद्ध हॅकिंग आणि त्यांच्या पत्नीचे फोटो वापरल्याची तक्रार दाखल केली आहे.
रेड्डी म्हणतात, "हे सगळं मुद्दे उपस्थित करणारी रुपा कोण आहे? त्यांच्या मते सिंधुरीने काही फोटो पाठवलेत. कोणाला पाठवलेत? ज्या तीन अधिकाऱ्यांना फोटो पाठवलेत ते कोण आहेत?"
या वादाबद्दल ज्येष्ठ अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. बीबीसी हिंदीने कमीत कमी तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. नाव न छापण्याच्या अटीवर ते म्हणाले, "आम्हाला या वादाचं मूळ माहिती आहे. पण ते सगळं इतकं खासगी आहे की आम्ही ते सांगू शकत नाही."
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना नियम नीट समजावून सांगितले आहेत. एकमेकांविरुद्ध अशी आरोपांची राळ उठवणं हे अखिल भारतीय सेवांच्या नियमावलीत बसत नाही.
आरोप काय आहेत?
मौदगिल यांनी सिंधुरी यांच्यावर जे 19 आरोप लावले आहेत. त्यात काही खासगी आहेत आणि काही त्यांच्या कामाशी संबंधित.
ताज्या आरोपात त्यांनी म्हटलंय की सिंधुरी यांनी काही असभ्य फोटो तीन-चार अधिकाऱ्यांना पाठवले आहेत.
मौदगिल यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "सिंधुरी लोकायुक्तांच्या नोटिशीला उत्तर देत नाहीयेत, मात्र आयएएस अधिकाऱ्यांना फोटो पाठवत आहेत."
सिंधुरी यांनी आरोपांना लेखी उत्तर दिलं आहे. त्यांनी मुख्य सचिवांना सांगितलं की, "आरोप खोटे आहेत आणि मी तुम्हाला कारवाई करण्याची विनंती करते."
मौदगिल यांनी डी. के. रवी यांचाही मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयने केली होती.

फोटो स्रोत, @D_Roopa_IPS
मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात मौदगिल लिहितात, "जर रवी यांनी सोशल मीडियावर चॅट करताना मर्यादांचं उल्लंघन केलं त्यावेळी सिंधुरी यांनी त्यांना ब्लॉक का केलं नाही?"
मौदगिल यांनी कोरोना काळात चमराजनगर जनरल हॉस्पिटल मध्ये म्हैसूरहून आणललेल्या ऑक्सिजन सिलिंडर्सवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावेळी सिंधुरी म्हैसूरच्या जिल्हाधिकारी होत्या.
तेव्हा ऑक्सिजन सिलिंडरच्या अभावी 24 लोकांचा मृत्यू झाला होता.
आरोपांची सुरुवात कशी झाली?
सिंधुरी आणि जेडीएस आमदार एस. आर. महेश एका हॉटेलमध्ये भेटल्याचे फोटो व्हायरल झाले. तिथे एक ज्येष्ठ आयएएस अधिकारीही उपस्थित होते.
हा फोटो यासाठी रंजक आहे कारण जेव्हा सिंधुरी म्हैसूरच्या जिल्हाधिकारी होत्या तेव्हा त्यांनी घरात स्विमिंग पूल बांधल्याचा आरोप महेश यांनी केला होता.

फोटो स्रोत, K Venkatesh
या फोटोचा संदर्भ देत मौदगिल यांनी विचारलंय की, ही बैठक तडजोड करण्यासाठी केली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मौदगिल यांनी सिंधुरी यांच्यावर मांड्या आणि हसन या जिल्ह्यातील काम करताना तिथे अनियमितता केल्याचा आरोप केला आहे.
हे सगळे आरोप आहेत म्हणून फोटो शेअर करणं हे काही खासगी प्रकरण असू शकत नाही, असा युक्तिवाद मौदगिल यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
आरोपांवर सिंधुरी यांनी काय उत्तर दिलं?
त्यांच्यावर लावलेल्या आरोपांबद्दल सिंधुरी म्हणाल्या, "माझ्याविरुद्ध एक खोटी आणि वैयक्तिक बदनामीची मोहिम सुरू केली आहे. ही त्यांच्या कामाची नेहमीची पद्धत आहे. त्यांनी प्रत्येक पोस्टिंग दरम्यान हे केलं आहे. त्या कायम प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं सोशल मीडियाचं प्रोफाईल याचा पुरावा आहे. त्या कायमच कोणाला तरी टार्गेट करत असतात. आपलं काम सोडून हे सगळं करणं त्यांना फार आवडतं."
फोटो शेअर करण्याच्या आरोपावर त्या म्हणतात, "हे फोटो नाहीत स्क्रीनशॉट्स आहेत ते सोशल मीडियावरून घेतले आहेत. मला बदनाम करण्यासाठी त्यांचा गैरवापर करण्यात येत आहे. मी हे फोटो कोणाला पाठवले आहेत हे मौदगिलच सांगू शकतात."
सिंधुरी यांचे पती सुधीर रेड्डी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "सर्वांत आधी तर ही रुपा कोण आहे? ती सिंधुरीची सिनिअर आहे की ती स्वत:च एक सरकार आहे.? ती एक अधिकारी आहे. इथे शेकडो अधिकारी आहेत. तिला काय हवंय? हा तिचा खासगी अजेंडा आहे? आधी आम्हाला हेच जाणून घ्याचं आहे. तिचा दूरदूरपर्यंत सिंधूरीशी काहीही संबंध नाही. माझ्यामते हे सगळं प्रकरण ईर्ष्येतून आलं आहे. तिच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यताही आहे."

फोटो स्रोत, Banglore news photos
"रुपा यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स असू शकतील. सिंधुरीचं सोशल मीडिया अकाऊंटही नाही. तिला पब्लिसिटीत काहीही रस नाही. तिचा फोकस कामावर आहे. असं म्हणतात की तिने काही फोटो पाठवलेत. हे फोटो कोणाला पाठवलेत? कोण आहेत हे अधिकारी? मुळात हे सगळं विचारण्याचा अधिकार रुपाला कोणी दिला आहे?"
सिंधुरी या सगळ्या आरोपांच्या विरोधात कायदेशीर करवाई करणार आहेत. आयपीसीच्या विविध कलमांअंतर्गत त्या ही कारवाई करणार आहेत. मुख्य सचिव वंदिता शर्मा यांना पत्र लिहून सिंधुरी यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
त्या पत्रकारांना म्हणाल्या, "रुपा मौदगिल माझ्या वरिष्ठ नाहीत आणि माझ्या बॉसही नाहीत. त्यांनी जे केलं आहे ते सेवा कायद्याच्या नियमांच्या विरोधात आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








