दहावीत काठावर पास होऊन नंतर IAS अधिकारी होणारे तुषार सुमेरा

फोटो स्रोत, FACEBOOK/TUSHAR SUMERA
- Author, भार्गव पारीख
- Role, बीबीसी गुजराती
"दहावीच्या बोर्ड परीक्षेत मला इंग्रजीत 35 आणि गणितात 36 मार्क्स मिळाले. कॉलेजमध्ये अॅडमिशनचा फॉर्म भरायला गेलो. इंग्लिशच्या कॅपिटल लेटर्समध्ये नाव लिहिताना माझ्याकडून चूक झाली. पण प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर मी IAS अधिकारी झालो."
हे शब्द आहेत गुजरातमधील भरूचचे जिल्हा दंडाधिकारी तुषार सुमेरा यांचे. तुषार सुमेरांचं दहावीचं मार्कशीट अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
सुमेरांच्या मते, तुमचे शाळेतले मार्क्स आणि जीवनातील यश यांचा दुरान्वये संबंध नसतो.
तुषार सुमेरा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील चोटीला या छोट्या खेड्यात लहानाचे मोठे झाले. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत.
दलपतभाई आणि गौरीबेन यांचे ते जेष्ठ चिरंजीव. दलपतभाई सरकारी विभागात वर्ग तीनचे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. तर सुमेरांच्या आई गौरीबेन शाळेत शिक्षिका होत्या. तुषार सुमेरा हे शाळेत एकदम सुमार विद्यार्थी होते.
एक सुमार विद्यार्थी ते IAS ऑफिसर बनण्यापर्यंतची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीबीसी गुजरातीने त्यांच्याशी संपर्क साधला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शाळेच्या आठवणी सांगताना तुषार सुमेरा म्हणतात, "मला 12 वीतही चांगले मार्क्स मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांच्या सल्ल्यानुसार मी आर्ट्सला अॅडमिशन घ्यायचं ठरवलं.
"मला माझं ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र, अॅडमिशन फॉर्म भरताना माझ्याकडून चूक झाली. पहिलं लेटर कॅपिटल लिहिण्याऐवजी मी स्मॉल लेटर्स वापरले आणि शेवटचे लेटर्स कॅपिटल लिहिले. माझ्या चुका झाल्या पण मी आशा सोडली नाही आणि माझा अभ्यास सुरू ठेवला."
ते पुढे सांगतात, "मी प्रोफेसर गुप्ता यांना भेटलो, त्यांनी मला इंग्रजी सुधारायचं असेल तर इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सल्ला दिला. कॉलेजच्या दिवसात मी दिवसातून तीन तास इंग्रजी वर्तमानपत्रे वाचायचो. वाचताना मी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचो. शब्दांचे अर्थ समजून घ्यायचा आणि वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायचो."
"वर्तमानपत्रे वाचल्यामुळे मला जागतिक अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, अर्थशास्त्र आणि सोशल ट्रेंड यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती मिळाली. वर्तमानपत्रांमुळेचं मी आर्टस् इंग्लिशचं पहिलं वर्ष पूर्ण शकलो."

फोटो स्रोत, Twitter/Tushar Sumera
"नंतर मी मास्टर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ एज्युकेशन पूर्ण केलं. माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, मला प्रति महिना 2500 रुपये पगार असलेली शिक्षण सहाय्यकाची नोकरी लागली."
"इतरांप्रमाणे मलाही सरकारी नोकरीत समाधान मिळालं असतं आणि शांततेने जगता आलं असतं, पण मला काहीतरी वेगळे करायचं होतं. मला एक ठसा उमटवायचा होता."
'आणि मग शिक्षकाची नोकरी सोडून UPSC ची तयारी सुरू केली'
सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना तुषार सुमेरा सांगतात, "त्या दिवसांत विनोद राव सुरेंद्रनगर जिल्ह्यात जिल्हा विकास अधिकारी (DDO) म्हणून तैनात होते. मी त्यांना भेटलो आणि मला आयएएस व्हायचं आहे असं सांगितलं."
"ते माझ्याशी थोडा वेळ बोलले आणि म्हणाले, तू आयएएस अधिकारी होऊ शकतोस. मला पुन्हा भेटायला येताना प्लीज तुझ्या वडिलांना घेऊन ये."

फोटो स्रोत, FACEBOOK/TUSHAR SUMERA
"एखादी नोकरी करण्याऐवजी आयएएस अधिकारी बनण्यातच खरी ताकद आहे हे त्यांनी माझ्या वडिलांना समजावून सांगितलं. त्यांच्या बोलण्याने माझा आत्मविश्वास वाढला."
"जशी मी माहिती घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मला समजलं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रोफेसर आम्रपाली मर्चंट आयएएस अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना मदत करतात. मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा मी आयएएस अधिकारी होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."
वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यावर तुषार सुमेरा सांगतात, "माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, तुला कोणत्याही किंमतीत ध्येय गाठायचं आहे आणि तुझी स्वप्न अर्धवट सोडू नकोस."
अशातच एक पेच निर्माण झाला. शिक्षक म्हणून सुरक्षित सरकारी नोकरी सोडण्याची वेळ आली होती. आणि हाच आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय होता.
सुमेरा म्हणतात, "माझ्याकडे दोन पर्याय होते. एकतर कामाच्या ठिकाणी रजा टाकणे किंवा सेवेतून बाहेर पडणे. रजा घेतली तर मी शिकवत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मी नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला"
UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी अहमदाबादमधील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (SPIPA) मध्ये प्रवेश घेतला. SPIPA मधले शिक्षक सतीश पटेल आणि जसवंत आचार्य यांच्याबद्दल सुमेरा आजही कृतज्ञता व्यक्त करतात.
UPSC च्या तयारी दरम्यान, त्यांनी आपली कौशल्य विकसित करण्यावर भर दिला.
'तुमची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी मार्कशीटचा आधार असू नये.'
परीक्षेच्या काळात कौटुंबिक अडचणींबद्दल बोलताना सुमेरा सांगतात, "सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर मी सुरेंद्रनगरला राहायला लागलो. एकदा माझा भाऊ मला घ्यायला आला, तेव्हा मला सांगण्यात आलं की वडिलांचं ऑपरेशन करण्यासाठी अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मी माझं ध्येय कोणत्याही परिस्थितीत साध्य करावं यासाठी मला माझ्या वडिलांनी प्रेरित केलं."

फोटो स्रोत, FACEBOOK/TUSHAR SUMERA
अधिकारी होण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागली त्याबद्दल बोलताना सुमेरा म्हणतात, "मी आमच्या भावंडांमध्ये मोठा आहे मात्र त्यावेळी माझे दोन्ही धाकटे भाऊ घर सांभाळत होते. मी मेहनत करायला सुरुवात केली आणि फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. पाच वर्ष मी कोणताही सण साजरा केला नाही किंवा सुट्टीही घेतली नाही. माझं ठाम मतं आहे की तुमचं मार्कशीट तुमच्या बुद्धिमत्तेचं मोजमाप ठरू शकत नाही. तुमचा आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि कौटुंबिक पाठबळ तुम्हाला ही लढाई जिंकण्यास मदत करते."
'यशाची गुरुकिल्ली म्हणून मार्क्सकडे बघू नाही'
तुषार सुमेरांचं हे मत वजुभाई परसाना आणि भाग्येश झा या दोघांनी ही पटतं. परसाना आणि झा दोघेही निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, वजुभाई परसाना त्यांचा संघर्ष आणि शालांत परीक्षेत त्यांनी जे मार्क्स मिळवलेत त्याबद्दल सांगतात.
ते म्हणतात, "आम्ही अगदी लहानशा खेड्यात राहत होतो. आम्हाला अनेक गोष्टींबद्दल माहिती नव्हती. लहानपणी मला जो काही आत्मविश्वास मिळाला त्यामुळे मला सिव्हिल सर्व्हंट बनण्यास मदत झाली. माझा ठाम विश्वास आहे की जर तुमचं संवाद कौशल्य चांगलं असेल आणि तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल तर तुमची मार्कशीट महत्त्वाचं नाही. जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम याच गोष्टी यश मिळवून देतात."
निवृत्त आयएएस अधिकारी भाग्येश झा सुद्धा मार्कशीटच्या मुद्द्यावर सहमत आहेत. ते म्हणतात, "जेव्हा मी आयएएस परीक्षेचा अभ्यास करत होतो, तेव्हा मी टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करत होतो. तुमची जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.
"म्हणून मार्कशीटपेक्षा तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत जास्त महत्त्वाची आहे," असं ते म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








