You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आयकर विभागाकडून थेट विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला योग्य तो प्रतिसाद देऊ- बीबीसी
बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयांमधील सर्वेक्षण 3 दिवसांनी संपलं. त्यानंतर भारताच्या आयकर विभागाने यांसदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
प्राप्तीकर विभागाने एक पत्रक जारी करून दावा केला आहे की 'एका प्रमुख आंतरराष्ट्रीय माध्यमसमुहाच्या' कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर करभरण्याबाबत अनियमितता आढळून आली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधीन राहून काम करणाऱ्या केंद्रीय प्राप्तीकर खात्याकडून जारी करण्यात आलेल्या या पत्रकात कुठेही बीबीसीचं नाव घेण्यात आलेलं नाही.
प्राप्तीकर विभागाचा हा दावा केंद्रीय माहिती विभागाने म्हणजेच पीआयबीने प्रसिद्ध केला आहे. हा दावा आणि हे पत्रक बीबीसीमध्ये झालेल्या सर्वेक्षणबद्दल आहे असं मानलं जातंय.
दुसरीकडे, प्राप्तीकर विभागाच्या या कारवाईवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर टीका झाली होती. संसदेत विरोधी पक्षांनी ही कारवाई चूक आहे असं म्हटलं होतं.
दरम्यान, यासंदर्भात आयकर विभागाकडून थेट औपचारिक माहिती दिल्यास योग्य ती प्रतिक्रिया देऊ असं बीबीसीनं म्हटलं आहे.
आयकर विभागाने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं की, दैनंदिन कामात कोणताही अडथळा न आणता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं.
या काळात बीबीसीच्या पत्रकारांना अनेक तास काम करू दिलं गेलं नाही. अनेक पत्रकारांसोबत आयकर विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी गैरवर्तन केलं. पत्रकारांचे संगणक शोधले गेले, त्यांचे फोन ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल विचारलं गेलं.दिल्ली कार्यालयात काम करणाऱ्या पत्रकारांना या सर्वेक्षणाबाबत काहीही लिहिण्यापासून रोखण्यात आलं.
वरिष्ठ संपादकांनी सातत्यानं विचारणा केल्यानंतरही काम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या पत्रकारांना जास्त काळ काम करण्यापासून रोखण्यात आलं. या दोन्ही भाषांमधील पत्रकारांना त्यांचे कार्यक्रम प्रसारित करण्याची वेळ जवळ आल्यानंतरच काम करण्याची परवानगी देण्यात आली.
आयकर विभागाचं सर्वेक्षण 3 दिवसांनी संपलं
बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयातील आयकर विभागाचे सर्वेक्षण तीन दिवसांनंतर संपले. 14 फेब्रुवारीपासून दिल्ली आणि मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांनी येऊन सर्व्हे केला. हे सर्वेक्षण 16 फेब्रुवारीला रात्री संपलं.
14 फेब्रुवारीला सकाळी 11.30 च्या सुमारास बीबीसीच्या भारतातील दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण सुरू झाले होते. या सर्वेक्षणात बीबीसीनं आयकर विभागाला पूर्णपणे सहकार्य केलं आहे.
आयकर विभागाचं सर्वेक्षण संपल्यानंतर बीबीसीनं शुक्रवारी रात्री प्रतिक्रिया दिली होती. बीबीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितल्यानुसार, "आयकर विभागाचे अधिकारी दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातून बाहेर पडले आहेत. आम्ही त्यांना यापुढेही सहकार्य करत राहू आणि आशा करतो की ही परिस्थिती निवळेल. "
"आम्ही चौकशीला सहकार्य केले. काही जणांना प्रश्नोत्तरासाठी बराच काळ थांबावे लागले, काहींना रात्री देखील थांबावे लागले. त्यांची प्रकृती चांगली राहणे याला आमचे प्राधान्य आहे. आमची वृत्तप्रसारण सेवा पूर्ववत सुरू झाली आहे आणि आम्ही आमच्या भारतीय प्रेक्षकांच्या, वाचकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत.
"बीबीसी एक विश्वासार्ह आणि स्वतंत्र माध्यम कंपनी आहे. आम्ही आमचे कर्मचारी आणि पत्रकारांच्या पाठीशी आहोत, जे कुठलीही भीती अथवा वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता भविष्यात वृत्तांकन करतील," असे बीबीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)