एखाद्या मालमत्तेचे आतापर्यंतचे सगळे व्यवहार एकाच ठिकाणी कसे पाहायचे?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

एखादी मालमत्ता खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी तिचा व्यवहार आधीच दुसऱ्या व्यक्तीसोबत झाल्याचं आपल्या लक्षात येतं.

किंबहुना मालमत्तेच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या बातम्या नेहमी वाचायला मिळतात.

त्यामुळे एखादी मालमत्ता खरेदी करण्याआधी तिच्याशी संबंधित सगळे व्यवहार जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

हे व्यवहार तुम्ही एकाच ठिकाणी पाहू शकता. त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानं ई-सर्च नावाची प्रणाली विकसित केली आहे.

ही प्रणाली काय आहे, ती काम कसं करते आणि तिच्या माध्यमातून जमिनीचे पूर्वीचे व्यवहार कसे जाणून पाहायचे, ते आता जाणून घेऊया.

ई-सर्च म्हणजे काय?

एखादया मालमत्तेबाबत नोंदणी विभागाकडे याआधी नोंदवलेला दस्त राज्य सरकारच्या नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावरुन शोधण्यासाठीची सुविधा म्हणजेच ई-सर्च होय.

एखाद्या मिळकतीच्या क्रमांकावरुन किंवा दस्ताच्या क्रमांकावरून पूर्वीचे व्यवहार शोधण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नोंदणी विभाग महाराष्ट्र

फोटो स्रोत, Igr

कोणत्याही मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल तपासणे खरेदीदाराच्या हिताचं असतं.

पूर्वी असे बदल तपासण्यासाठी संबंधित कार्यालयास भेट देऊन शोध घेणे गरजेचे होते. आता मात्र ई-सर्चच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी 2002 नंतर संगणकीकृत पद्धतीने नोंदवलेल्या सर्व दस्तांचा शोध ई-सर्च द्वारे उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ई-सर्चद्वारे घरबसल्या 24 तास असा शोध घेता येतो.

ई-सर्च कसं करायचं?

मालमत्तेसंबंधी जुने व्यवहार पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला igrmaharashtra.gov.in असं सर्च करायचं.

त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर खाली स्क्रोल केलं की ऑनलाईन सुविधा नावाचा एक रकाना तुम्हाला दिसेल.

येथे अभिलेख व भरणा या रकान्यातील ई- शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

तेथील विनाशुल्क सेवा रकान्यातील फ्री सर्च 1.9 वर क्लिक करायचं आहे. (2.0 नवीन व्हर्जन आहे, जे अंडर मेंटेनन्स आहे.)

त्यानंतर ई-सर्च नावाचं पेज ओपन होईल.

इथं तुम्ही मिळकत निहाय आणि दस्त निहाय जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता. मुंबई, उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शहरी भाग अशा 3 प्रकारांमध्ये तो सर्च करता येतो.

नोंदणी विभाग महाराष्ट्र

फोटो स्रोत, Igr

आता आपण मिळकत निहाय जमिनीचा रेकॉर्ड सर्च कसा करायचा ते पाहूया.

समजा आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहायचा असल्यानं इथं उर्वरित महाराष्ट्र निवडायचं आहे.

इथं सुरुवातीला वर्षं निवडायचं आहे. तुम्ही पाहू शकता की, इथं 1985 पासूनच्या जमिनीच्या दस्ताऐवजांचा रेकॉर्ड उपलब्ध आहे.

त्यानंतर जिल्हा, तहसील कार्यालय आणि गाव निवडायचं आहे. मग मिळकत क्रमांक टाकायचा आहे. इथं कंसात लाल अक्षरात स्पष्ट लिहिलंय की, सर्व्हे नंबर / मिळकत नंबर / गट नंबर / प्लॉट नंबर टाकू शकता.

पुढच्या रकान्यात कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक, अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

पण, तुम्हाला मिळकत क्रमांक माहिती नसेल तर Do you want to take Name Based Search:(Optional) या रकान्यासमोरील YES या पर्यायावर क्लिक करून सर्च करू शकता. म्हणजे नाव टाकून सर्च करू शकता.

मिळकत क्रमांक टाकला की, शोधा किंवा सर्च यावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला जुन्या दस्तांची माहिती दिसेल. यात दस्ताचा क्रमांक सुरुवातीला दिलेला असेल. त्यानंतर दस्ताचा प्रकार दिलेला असेल. यामध्ये संबंधित मालमत्तेवर कोणत्या प्रकारचा व्यवहार झाला त्यानुसार दस्ताचं नाव असेल. उदाहरणार्थ खरेदी खत, गहाणखत, अभिहस्तांतरणपत्र इत्यादी. अशाप्रकारे वर्षागणिक तुम्ही संबंधित मालमत्ते संबंधीचे व्यवहार तपासू शकता.

पुढे कोणत्या तारखेला आणि कोणत्या कार्यालयात या व्यवहाराची नोंदणी झालीय, ज्या व्यक्तींमध्ये व्यवहार झालाय त्यांचा तपशील, किती क्षेत्रासाठी व्यवहार झालाय याचं वर्णन दिलेलं दिसेल.

याच लाईनमधील शेवटच्या इंडेक्स-2 या पर्यायावर क्लिक करून तुम्ही हे दस्त डाऊनलोड करू शकता.

ई-सर्च का महत्त्वाचं?

महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड सांगतात, "मालमत्तेसंबंधी आतापर्यंत झालेले सगळे व्यवहार ई-सर्चच्या माध्यमातून पाहता येऊ शकतात. मालमत्तेसंबंधीचे दस्त, करार ही सगळी कागदपत्रं इथं ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत."

जमीन व्यवहारात ई-सर्चचं महत्त्व काय आहे, या प्रश्नावर कराड सांगतात, "एखाद्या मालमत्तेचा आधीच व्यवहार झालेला असेल आणि दुसऱ्यांदा तो करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर ई- सर्चच्या माध्यमातून ही बाब आधीच जाणून घेता येऊ शकते. यामुळे फसवणूक टळू शकते."

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)